पंतप्रधानांच्या कॅनडा दौऱ्यापूर्वी खलिस्तान्यांच्या मुसक्या आवळण्यास प्रारंभ

    12-Jun-2025   
Total Views |

नवी दिल्ली,
पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘जी७’ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी कॅनडास जाणार आहेत. तत्पूर्वीच कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या सरकारने भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या खलिस्तान्यांना पकडण्यासाठी 'प्रोजेक्ट पेलिकन' नावाची मोहीम सुरू केली आहे, ज्या अंतर्गत कॅनडाच्या पोलिसांनी मोठी कारवाई करत खलिस्तान समर्थक अंमली पदार्थ आणि दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे.

कॅनडाच्या पोलिसांनी प्रोजेक्ट पेलिकन अंतर्गत आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे, ज्यामध्ये पोलिसांनी ४७९ किलो कोकेन जप्त केले आहे. त्याची किंमत सुमारे ४७.९ दशलक्ष डॉलर्स आहे. यासोबतच, पोलिसांनी कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या सात लोकांसह एकूण नऊ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सजीजित योगेंद्रराजा (३१), मनप्रीत सिंग (४४), फिलिप टेप (३९), अरविंदर पोवार (२९), करमजित सिंग (३६), गुरतेज सिंग (३६), सरताज सिंग (२७), शिव ओंकार सिंग (३१) आणि हाओ टॉमी हुयन्ह (२७) यांचा समावेश आहे.

कॅनडा पोलिसांच्या माहितीनुसार, ही टोळी अमेरिका आणि कॅनडा दरम्यान व्यावसायिक ट्रकद्वारे अंमली पदार्थ पाठवत असे. या गटाचे अमेरिकेतील मेक्सिकन अंमली पदार्थ कार्टेल आणि अंमली पदार्थ वितरकांशी संबंध होते. अंमली पदार्थ विकून मिळवलेले पैसे निदर्शने, जनमत चाचणी, शस्त्रे खरेदी इत्यादी भारतविरोधी कारवायांमध्ये वापरले जात होते. गुप्तचर संस्थांना असा संशय आहे की पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय या अंमली पदार्थ नेटवर्कला पाठिंबा देत आहे, जे कॅनडामधील खलिस्तानी गटांचा वापर मेक्सिकन कोकेन आणि अफगाण हेरॉइनची तस्करी करण्यासाठी करत आहे.