उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Oct-2019
Total Views |



ये भक्षयन्तो न वसून्यानृधुर्यानग्नयो अन्वतप्यन्त धिष्ण्या:।

या तेषामवया दुरिष्टि:

नस्तां कृणवद् विश्वकर्मा॥

(अथर्ववेद-२.३५.१)

 

अन्वयार्थ

या मानवी समाजव्यवस्थेत म्हणजेच संपूर्ण जगात (ये) जे लोक (भक्षयन्त:) विविध पदार्थांचा उपभोग घेत-घेत (वसूनि) त्या भोग्य वस्तूंना, ऐश्वर्यांना (न आनृधु:) वाढवित नाहीत किंवा त्यात वृद्धी करीत नाहीत. अशा प्रकारे (यान्) ज्या लोकांना (धिष्ण्या: अग्नय:) परमेश्वराद्वारे जगात स्थापन झालेल्या प्राण-अपान इ. अग्नी (अनु अतप्यन्त) भोगानंतर संतप्त करतात, जाळून टाकतात. (तेषाम्) अशा त्या लोकांच्या (या अवया) ज्या काही अधोगतीला नेणार्‍या, खाली खेचणार्‍या (दुरिष्टि:) वाईट यजन क्रिया, अनिष्ट वृत्ती आहेत. (तान्) त्या सर्वांना (विश्वकर्मा) तो समग्र विश्वाचा कर्त्ता परमेश्वर (स्विष्टिम्) श्रेष्ठ यजन कार्यात म्हणजेच पवित्र कर्मांमध्ये, सत्प्रवृत्तीमध्ये (कृणवत्) रुपांतरीत करो.

 

विवेचन

या जगात माणूस केवळ सुख-दु:खे भोगण्यासाठीच आलेला नाही, तर त्याबरोबरच काहीतरी कर्म करण्यासाठीसुद्धा आलेला आहे. उपभोगासोबतच कर्माशीही त्याचे नाते जडले आहे. निरनिराळ्या वस्तूंचा किंवा धनाचा संग्रह करणे, ऐश्वर्य मिळविणे, संपत्ती कमविणे आणि त्यांचा मनसोक्तपणे उपभोग घेणे, हे सर्व जसे तो मोठ्या उत्साहाने करतो, त्याचबरोबर त्यांच्या भोगानंतर पुन्हा त्या पदार्थांना वाढविणे, हेदेखील त्याचे कर्तव्य आहे. उपभोगल्यानंतर माणूस थांबतो, थकतो. पण असे न थांबता पुन्हा त्यात वृद्धी केली पाहिजे. जसे भक्षणे किंवा उपयोगात आणणे यांस आपण प्राधान्य देतो, तसेच त्यात वाढ करणे किंवा स्वत:हून काहीतरी प्रगती करणे, यालाही अग्रक्रम द्यावयास हवा. हेच तर खरे यज्ञकर्म आहे. संतांनी म्हटलेच आहे-

 

'उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म!'

या सृष्टीमधील सर्व जड-चेतन समूह या यज्ञकार्यात सदैव तत्पर आहेत. भूमिमाता मोठ्या प्रमाणात नभोमंडळातून बरसणार्‍या ढगांकडून पाणी घेते. आर्द्र झालेल्या आपल्या जमिनीतून धान्यरूपाने सोने पिकविते. त्याद्वारे समग्र प्राणिसमूहाला जीवनदान मिळते. धान्य, फुले, फळे, औषधी, गोड पाणी आणि एवढेच नव्हे, तर आपल्या गर्भातून विविध इंधने व सोने, चांदी, तांबे, लोह यांसारखे मौल्यवान धातूही मानवांना प्रदान करणारी ही वसुंधरा या यज्ञकर्मात अखंडितपणे प्रयत्नशील आहे.

 

पृथ्वीमातेसोबतच त्यावरील समुद्र, पर्वत, नद्या-नाले, सूर्य-चंद्र किंवा झाडे हे सर्व स्वत:कडे काही प्रमाणात घेतात, पण मोठ्या प्रमाणात इतरांना देतात. त्याचे घेणे किंवा भक्षणे हे स्वार्थाकरिता नव्हे, तर परमार्थाकरिता असते. त्याच्याकडील धन, वैभव हे इतरांना वितरण करण्यासाठी आहे. असेच असते महापुरुषांचे आणि देवतांचे! हे सज्जनलोक जगावर उपकार करण्यात दंग असतात. दुसर्‍यांनी केलेल्या उपकारांची जाणीव ठेवून ते सत्कर्मांच्या अनुष्ठानाद्वारे त्यांची परतफेड करण्यात नेहमीच व्यस्त असतात.

 

'न हि कृतमुपकारं साधवो विस्मरन्ति।'

सामान्य लोक मात्र केवळ 'पोटार्थी' होऊन जगतात. आपल्याला ज्या सुखसुविधा मिळतात, त्यांची आठवण ठेवून आपणदेखील जगाचे काहीतरी भले करावे, असे कोणासही वाटत नाही. आपले काम झाले की संपले. 'गरज सरो अन् वैद्य मरो' अशी म्हण प्रचलित आहेच. इतरांचा साधा विचारसुद्धा करण्यास त्यांच्याकडे पुरेसा वेळ नसतो. ऋषिमुनी, विद्वान, संत व सुधारकांनी यांनी सत्यज्ञानाची, आध्यात्मिक विचारांची, शुद्ध आचार-व्यवहारांची जी परंपरा निर्माण केली आहे, त्यांच्या महनीय कार्याची व अगाध साधनेची आठवण ठेवून त्या परंपरेला अखंडितपणे पुढे नेण्याकरिता प्रयत्न करणे नको का? ज्या वैज्ञानिकांनी व शास्त्रज्ञांनी असंख्य यातना व हालअपेष्टा सहन करीत विविध संशोधने केली. निरनिराळे शोध लावले आणि समग्र मानव समूहास ज्या काही भौतिक सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या, त्यांचा उपभोग तर आम्ही घेतोच. पण, घेण्याबरोबरच ते इतरांना देण्याचा जराही विचार करीत नाही. एवढेच काय, तर त्यांच्या सदुपयोगाऐवजी दुरुपयोगच करतो. हा त्या थोर पुरुषांनी केलेल्या सत्कार्याचा अवमान नव्हे का?

 

उपभोगासोबतच दातृत्वभावसुद्धा तितकाच महत्त्वाचा ठरतो. यज्ञोपवीताची तीन सूत्र हाच संकेत करतात. देवऋण, ऋषिऋण आणि पितृऋण यांचा उद्देश देवांनी, ऋषींनी व पितृजनांनी केलेल्या सत्कर्मांना वाढविणे आहे. जर आम्ही केवळ त्यांच्या ऋणांतच राहिलो आणि त्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न केलाच नाही तर ही कृतघ्नता आम्हास मारक ठरेल. परमेश्वराने या जगात स्थापन केलेल्या प्राण व अपान हे अग्नी आमचे जगणे असह्य करतील. यामुळे आमची अधोगती होते. सदरील मंत्रात वरील कर्महीन कृतघ्न माणसांच्या दुर्वत्तींकरिता 'दुरिष्टि' असा शब्द आला आहे. 'दुरिष्टि' म्हणजे 'अनिष्ट प्रवृत्ती!' 'दुर्' म्हणजे वाईट, अपवित्र, निकृष्ट किंवा हीन दर्जाचे, तर 'इष्टि' म्हणजे 'यज्ञ.'
 

लोक मोठ्या परिश्रमाने कार्ये तर करतात, पण ती सर्व चांगली असतातच असे नव्हे. चोर अत्यधिक परिश्रम घेतो. बुद्धीने, चतुराईने व चपळाइने चौर्यकर्म करतो. याला यज्ञ नव्हे, तर 'दुर्यज्ञ' किंवा 'दुरिष्टि' असे म्हणतात. अनेक लोक वाईट कार्यात मोठ्या साहसाने व धाडसाने अग्रगण्य असतात, त्यांची ही 'दुरिष्टि' फारच घातक व अनिष्ट आहे. इतिहासात डोकावल्यास आपल्याला अशी असंख्य उदाहरणे सापडतात. देवासुर संग्रामात देवांपेक्षा ही राक्षसांची शक्ती, युक्ती आणि कृती मोठ्या प्रमाणावर दिसून येते, पण त्यांच्या मुळाशी असते 'दुरिष्टि.' अशी 'दुरिष्टि' दूर होऊन 'स्विष्टि'(सु-इष्टि=सुव्यवस्थित पवित्र यज्ञ) आम्हाला लाभो, अशी कामना इथे करण्यात आली आहे.

 

भगवंताकरिता इथे 'विश्वकर्मा' हे संबोधन आले आहे, जे की फारच उपयुक्त आहे. पाहा या विश्वाकडे व त्यातील जड-चेतन निसर्गाकडे! त्याचे बुद्धिकौशल्य किती आश्चर्यकारक आहे! सर्व प्राणी, वनस्पती, पर्वत-नद्या, भूमी, समुद्र हे व या सर्वांचे अंतर्बाह्य जग किती अगाध आहे? त्या सर्वांमधील सुव्यवस्थित रचना ही अगम्य असून आजपर्यंत त्या विश्वकर्माशिवाय कोणालाही करता आली नाही? त्या परमेश्वराच्या या दिव्यकर्मांना पाहून माणसाची बुद्धी आणि ज्ञानचक्षू अजूनही उघडत नाहीत, ही दुर्दैवाची गोष्ट! त्या ईश्वराने आरंभिलेल्या विश्वाचा हा बृहद्यज्ञ अगदी प्राचीन काळापासून अनवरतपणे सुरू आहे. याचा ब्रह्मा म्हणजे कर्ता-संचालक परमेश्वर आहे. अशा या विश्वकर्म्याच्या हाती आहे ते 'दुरिष्टि'ला 'स्विष्टि'करण्याचे कार्य! अशा सुयोग्य वैश्विक यज्ञाच्या पुरोहितास शतश: वंदन...!


- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य

@@AUTHORINFO_V1@@