कुर्दी लोकांची तुर्कीश कोंडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Oct-2019   
Total Views |



तुर्कीने उत्तर सीरियातील कुर्द प्रदेशांवर हल्ला करून एक आठवडा उलटला आहे. जगातील ९ वे सर्वात मोठे सैन्यदल असणारा तुर्की विरुद्ध सीरियाच्या काही जिल्ह्यांएवढ्या भागांत आपले प्रभावक्षेत्र निर्माण केलेले कुर्दी लढवय्ये यांच्यात सामरिकदृष्ट्या तुलनाही होऊ शकत नाही.


कुर्द लोकांच्या दुर्दैवाचे दशावतार संपण्याचे नाव घेत नाहीयेत. कुदिर्र्स्तान हा पश्चिम आशियातील न होऊ शकलेला सर्वात मोठा आणि पुरोगामी मुस्लीम देश. आज जगाच्या नकाशावर कुर्दिस्तान अस्तित्वात नाही. पहिल्या महायुद्धानंतर ओटोमन साम्राज्याचे विभाजन करून त्याच्या ब्रिटन, फ्रान्स आणि त्यांच्या अंकित काही राष्ट्रे अशा वाटणीत आकाराने आणि लोकसंख्येने सर्वात मोठा असलेला कुर्दिस्तान किंवा कुर्द लोकांचा प्रदेश तुर्की, सीरिया, आर्मेनिया, इराक आणि इराण या देशांमध्ये वाटला गेला. कुर्द लोक देशोधडीला लागले. या सर्व देशांत अल्पसंख्याक म्हणून गेली शंभर वर्षं त्यांनी अनेक हालअपेष्टा सहन केल्या. सद्दाम हुसेनने तर रासायनिक अस्त्रांचा वापर करून लाखो कुर्द लोकांना मारले. त्याच्या राजवटीच्या पतनानंतर स्वतःची स्वायत्तता राखून एक राष्ट्र म्हणून पुढे येणाऱ्या कुर्दांना इसिसच्या जिहादी दहशतवाद्यांकडून अमानवी छळाला सामोरे जावे लागले. अमेरिका, इस्रायल आणि अन्य मित्रराष्ट्रांच्या उघड किंवा छुप्या मदतीच्या जोरावर मोठ्या शौर्याने 'इसिस'ला पराभूत करणाऱ्या सीरियातील कुर्दांवर आता तुर्कीने आक्रमण केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प राजकीय स्वार्थापोटी किंवा मग अज्ञानापोटी गाफील राहिल्याची खूप मोठी किंमत केवळ कुर्दांनाच नाही, तर पश्चिम आशियातील अनेक देशांना चुकवावी लागणार आहे. तुर्कीने उत्तर सीरियातील कुर्द प्रदेशांवर हल्ला करून एक आठवडा उलटला आहे. जगातील ९ वे सर्वात मोठे सैन्यदल असणारा तुर्की विरुद्ध सीरियाच्या काही जिल्ह्यांएवढ्या भागांत आपले प्रभावक्षेत्र निर्माण केलेले कुर्दी लढवय्ये यांच्यात सामरिकदृष्ट्या तुलनाही होऊ शकत नाही.

 

पुढे काय होणार, हे पाहण्यापूर्वी थोडे माघारी जाऊ. डोनाल्ड ट्रम्प पुढील वर्षाच्या अखेरीस पुनर्निवडणुकीला सामोरे जात आहेत. निवडून येताना अमेरिकेचे सैन्य जगभरातून मागे बोलवू, असे आश्वासन त्यांनी दिले होते. उत्तर कोरिया आणि अफगाणिस्तानातील प्रश्नांवर सैन्य माघारी घेण्यात अपयश आल्यानंतर उत्तर सीरियात असलेले विशेष दलांचे सुमारे दोन हजार सैनिक माघारी बोलावण्याचे त्यांच्या मनात घोळत होते. 6 ऑक्टोबर रोजी, म्हणजेच रविवारी त्यांना तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगान यांचा थेट फोन आला. त्यांनी उत्तर सीरियातील कुर्द दहशतवाद्यांचा बिमोड करून तिथे सुरक्षित जागा तयार करण्यासाठी 'नाटो'चा सदस्य असलेला तुर्की एकतर्फी सैन्य पाठवणार असल्याचे सांगितले. अमेरिकेने तेथे तैनात आपले सैन्य मागे घेतल्यास ही कारवाई करणे सोपे जाईल, असे सांगितल्यावर व्यापारी वृत्तीच्या ट्रम्प यांना त्यात संधी दिसली. उत्तर सीरियातून 'इसिस'चा पाडाव झाला असल्यामुळे तिथे सैन्य ठेवण्यावर होणारा वायफळ खर्च टाळता येईल, असा विचार करून ट्रम्प यांनी एर्दोगान यांना हिरवा कंदील दाखवला असावा. असे करताना ट्रम्प यांनी आपल्या संरक्षण मंत्रालयाचे मत विचारात घेतले नाही. इथेच त्यांची चूक झाली. कारण, तुर्की ज्यांना 'कुर्द दहशतवादी' म्हणते, ते प्रत्यक्षात अमेरिकेच्या पाठिंब्यावर स्वतःच्या पायावर उभे राहिलेले लढवय्ये होते. त्यांच्या ताब्यातील बंदीखान्यात 'इसिस'चे १० हजारांहून अधिक दहशतवादी आणि सुमारे ७० हजार कुटुंबीय होते. तुर्कीने कुर्द लोकांवर हल्ला केल्यावर निर्माण झालेल्या संधीचा फायदा घेऊन यातील काही दहशतवाद्यांना पळ काढण्यात यश आले.

 

तुर्कीने हल्ला करायचे कारण म्हणजे कुर्द लोक हे तुर्कीतील सर्वात मोठे अल्पसंख्याक असून त्यांची लोकसंख्या तुर्कीच्या लोकसंख्येच्या सुमारे २० टक्के इतकी आहे. तुर्कीच्या पूर्वेकडील आकारमानाने सुमारे तेवढ्याच प्रदेशात त्यांचे बाहुल्य आहे. 'पीकेके' या कुर्दिश राष्ट्रवाद्यांशी तुर्कीची लढाई चालू असते. 'पीकेके'ने वेळोवेळी तुर्कीमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत. तुर्की सर्व देशांतील कुर्द लोकांना दहशतवादी समजते, पण अमेरिका आणि अन्य देश तसे समजत नाहीत. कारण, कुठेतरी कुर्द लोकांचा राष्ट्रवाद सच्चा आहे. अमेरिकेने जगभरातील अफगाणिस्तान, इराक, सीरिया इ. देशांत आपल्या शत्रूंविरुद्ध लढण्यासाठी अनेक सशस्त्र गटांना साहाय्य केले आहे. पण, यातील बहुतांश गट एकतर फुसके बार ठरले किंवा मग अमेरिकेकडून मदत मिळवून ते स्वतःच उन्माद पसरवू लागले. याला अपवाद आहे कुर्दांचा. कुर्दांनी 'इसिस'शी लढताना अचाट शौर्य गाजवले. स्वभावाने उदारमतवादी असलेल्या कुर्दांनी इराक आणि सीरियामध्ये आपली स्वायत्तता असलेल्या प्रदेशात चांगल्या प्रकारे कारभार चालवला आहे. एर्दोगान यांनी सांगण्यासाठी कुर्द दहशतवाद्यांच्या बिमोड करण्याचे कारण दिले असले तरी असे म्हणतात की, या कारवाईमागचे खरे कारण म्हणजे 'इसिस'मुळे तुर्कीमध्ये निर्वासित म्हणून राहणाऱ्या लाखो लोकांना पुन्हा एकदा सीरियात पाठवण्यासाठी तुर्कीला जमिनीचा तुकडा हवा आहे. त्यासाठीही हे आक्रमण केलेले असू शकते. डोनाल्ड ट्रम्प यांनी पाठीत खंजीर खुपसल्यामुळे कुर्द लोकांनी मदतीसाठी सीरियात कशीबशी सत्ता टिकवलेल्या बशर अल असाद यांच्याशी संधान बांधले. असाद यांनीही कुर्दांना मदतीचे आश्वासन दिले. भूतकाळात कुर्दांचे हाल करण्यात असाद राजवटीचाही सहभाग असला तरी सध्या ते मेटाकुटीला आल्यामुळे दोघांनाही एकमेकांचा आधार निर्माण झाला आहे. गंमत म्हणजे, असाद यांची राजवट टिकली आहे ती इराण आणि पुतीनच्या म्हणजे अमेरिकेच्या कट्टर विरोधकांच्या जोरावर. म्हणजे अमेरिकेने अब्जावधी डॉलर खर्च करून शस्त्रसज्ज केलेले कुर्द लोक या गोटात सामील झाले तर ती अमेरिकेची मोठी फजिती ठरेल.

 

इराणलाही आपल्याकडील कुर्दांना स्वातंत्र्य द्यायचे नसले तरी सीरियातील कुर्दांना मदत करून अमेरिकेचा काटा काढण्याचे समाधान आणि या तेलसमृद्ध भागातील काळ्या बाजारात स्वतःकडील तेल तस्करी करून विकण्याची संधी मिळेल. ट्रम्प यांच्या निर्णयाला पेंटागॉनसह त्यांच्याच रिपब्लिकन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही विरोध केला आहे. आपली फसगत झाली, हे लक्षात आल्यावर ट्रम्प यांनी ट्विटरवरच एर्दोगान यांना कंबरतोड निर्बंध घालण्याची धमकी दिली. पण,एर्दोगान यांनी त्यास भीक घातली नाही. युरोपीय महासंघाने याबाबत आपल्याला सहकार्य न केल्यास आपल्याकडे स्थायिक झालेले निर्वासित युरोपात सोडण्याची चेतावणी त्यांनी दिली आहे. सध्याचे निर्वासितांचे लोंढे पेलवायला असमर्थ असलेल्या युरोपला आणखी लाखो निर्वासित येण्याची कल्पनादेखील सहन होणारी नाही. त्यामुळे ते बोटचेपी भूमिका घेतील, असे वाटते. तुर्कीच्या चढाईनंतर 'अरब लीग'ने तातडीची बैठक बोलावली आणि एका गैर अरब देशाने अरब देशाविरुद्ध केलेल्या आक्रमणाचा निषेध केला. सप्टेंबरमध्ये झालेल्या निवडणुकांनंतर अजूनही इस्रायलमध्ये सरकार अस्तित्त्वात आले नसले तरी बेंजामिन नेतान्याहूंसह महत्त्वाच्या इस्रायली नेत्यांनी तुर्कीचा निषेध केला आहे. काहींनी तर कुर्दांना मदत देण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानने याबाबत तुर्कीची तळी उचलून धरली आहे. हे साहजिकच आहे, कारण सध्या काश्मीर प्रश्नावर केवळ तुर्की आणि मलेशियाच त्यातल्या त्यात पाकिस्तानच्या बाजूने उभे आहेत. अमेरिकेत इमरान खान यांनी या दोन देशांसोबत इस्लामबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी एक टीव्ही चॅनल काढण्याची घोषणा केल्यानंतर रागावून सौदीने त्यांना प्रवासासाठी दिलेल्या खाजगी विमानाला हवेतून जमिनीवर उतरवून इमरान खान यांना सामान्य माणसांप्रमाणे प्रवासी विमानाने जायला भाग पाडले. हे सांगण्याचे कारण म्हणजे भारताने पाकिस्तान सौदीतील वाढत्या दरीचा फायदा उठवायला हवा, तसेच तुर्कीलाही पाकिस्तानशी जवळीक केल्याचा फटका द्यायला हवा. कुर्दी लोकांचे भारतीय संस्कृती आणि इंडो-इराणी भाषांशी अनेक शतकांचे नाते आहे. भारताचे कुर्दिस्तानशी स्वतंत्र संबंध नसले तरी अनेक भारतीय कुर्दिस्तानात काम करतात तसेच तुर्कीश कंपन्यांकडून कुर्दिस्तानमधील तेलाची खरेदी करतात. त्यामुळे भारताने या प्रश्नावर तुर्कीच्या युद्धखोरीचा निषेध करून कुर्दी लोकांना नैतिक पाठबळ द्यायला हवे.

@@AUTHORINFO_V1@@