उभयसृपशास्त्र : एक गरज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2019   
Total Views |



जैवसाखळी अखंडित ठेवण्याकरिता निसर्गामधील प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे. निसर्गातील सुंदर दिसणाऱ्या गोष्टी आपल्याला आवडतात. कारण, आपले प्राधान्य सौंदर्यशास्त्राला असते. साप, सरडे, पाल, बेडूक असे उभयसृप आपण नजरेसमोरदेखील धरत नाही. का? तर त्यांना सौंदर्य नाही. तसेच या जीवांविषयी सुरुवातीपासून समाजमनात अनेक अंधश्रद्धा रुजलेल्या आहेत. वन्यजीव संशोधनाच्या क्षेत्रातही उभयसृपांच्या अभ्यासाबाबत बरेच दुर्लक्ष झालेले दिसते. त्यामुळेच उभयसृपांच्या जैवविविधतेमध्ये भारत जगामध्ये आज पाचव्या क्रमांकावर आहे. वाघ-बिबट्या या प्राण्यांच्या संशोधनामध्ये आर्थिक स्थिरता तर आहेच. पण, महत्त्वाचे म्हणजे त्याला प्रसिद्धीचे वलय आहे. त्यामुळे संशोधनामध्ये रस असणाऱ्या तरुण संशोधकांचा कल सस्तन प्राण्यांच्या अभ्यासाकडे अधिक आहे. मात्र, हा कल जैवविविधतेमधील उभयसृपांच्या अस्तित्वाकरिता एका अर्थाने घातक ठरणारा आहे. 'द रेप्टाईल डाटाबेस' यांच्या हवाल्यानुसार सरीसृपांच्या जैवविविधतेत भारत जगामध्ये पाचव्या स्थानावर आहे. देशात सरपटणाऱ्या प्रजातींची संख्या ६८९ एवढी आहे. भौगोलिक क्षेत्राच्या अनुषंगाने पहिल्या पाच देशांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचे भौगोलिक क्षेत्र ३,२८७ ,२६३ चौ.किमी. आहे. हे क्षेत्रफळ सरीसृपांच्या जैवविविधतेत चौथ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या इंडोनेशिया आणि ब्राझील या देशांहून दुप्पट आहे. म्हणजेच क्षेत्रफळ आणि त्यामध्ये सामावलेली जैवविविधता संपन्न असूनही केवळ दुर्लक्षितपणामुळे उभयसृप संशोधनाचे क्षेत्र मागे पडले. एखाद्या नव्या जीवाची निश्चिती करण्यासाठी गुणसूत्र चाचणी (डीएनए) जेवढी महत्त्वाची आहे, तितकेच वर्गीकरणाचे विज्ञानही आवश्यक आहे. परंतु, आज आपल्या देशात उभयसृपांच्या ५० टक्के वर्गीकरणाचे (टॅक्सोनॉमी) कामही झालेले नाही. एखाद्या जीवाची शरीररचना आणि त्याच्या अंगभूत वैशिष्ट्यांकरिता वर्गीकरणाची गरज असते. मात्र, उभयसृपांच्या बहुतांश प्रजातींबाबत वर्गीकरणाचे हे काम अजूनही आपल्या देशात पूर्ण झालेले नाही. अपुरे संशोधन हेच यामागील एकमेव कारण आहे. आजघडीला सस्तन प्राण्यांच्या संशोधनाबाबत शासकीय पातळीवर आर्थिक रसदीची तरतूद आहे. शिवाय अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांचे त्याला कोटींच्या घरातील आर्थिक पाठबळ आहे. उभयसृपशास्त्र संशोधनाबाबत शासन आणि सामाजिक स्तरावर कोणत्याही प्रकारचे पाठबळ नसल्याने हा विषय अंधारलेलाच आहे.

सक्षम, तरीही दुर्लक्षित!

गेल्या कित्येक वर्षांपासून दुर्लक्षिलेले उभयसृपांचे संशोधनकार्य आता कुठे प्रकाशझोतात येत आहे. भारतात या क्षेत्रामध्ये रस असणारी तरुण संशोधकांची एक फळी तयार झाली आहे. मात्र, या फळीत हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच संशोधक आहेत. महत्त्वाचे म्हणजे, त्यामधील बहुतांश संशोधक हे महाराष्ट्रातील आहेत. या संशोधकांनी गेल्या तीन महिन्यांमध्ये कासवाच्या एका, सापाच्या दोन आणि पालीच्या आठ नव्या प्रजातींचा शोध लावला आहे. अरुणाचल प्रदेशातून कासवाच्या नव्या प्रजातीचा शोध लागला असून मिझोराम आणि महाराष्ट्रामधून सापाची नवी प्रजात उलगडण्यात आली आहे. याशिवाय, तामिळनाडू आणि महाराष्ट्रामधून पालीच्या आठ प्रजाती जगासमोर नव्याने आल्या आहेत. असे का झाले, तर गेल्या कित्येक दशकांमध्ये 'उभयसृपशास्त्र' हा विषय वन्यजीव संशोधनाच्या मुख्य प्रवाहापासून विलग झाला होता. मात्र, काही संशोधकांमुळे हा विषय पुन्हा प्रकाशात आला आहे. त्यांनी शासकीय किंवा सामाजिक संस्थेच्या आर्थिक पाठबळाशिवाय या विषयात काम करण्यास सुरुवात केली आहे. 'वर्गीकरण' या विज्ञानशाखेकडे दुर्लक्ष झाल्याने यासाठी फारसा निधी उपलब्ध होत नाही. अनेकदा संशोधक स्वतःच्या खिशातून पैसे घालतात. त्यामुळे निसर्गसंवर्धन क्षेत्रातील संस्था यांच्याबरोबरच शासनानेही वर्गीकरणाची ही गरज लक्षात घेणे आवश्यक आहे. मानव संघर्षाशी निगडित असणाऱ्या सस्तन प्राण्यांच्या संशोधनाकरिता शासनदरबारी आज काही कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, संपदर्शाने मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांमध्ये जगात भारत पहिल्या क्रमांकावर असूनही त्यासंदर्भात ठोस उपाययोजना आखण्याबाबत कोणतेही पाऊल उचलले जात नाही. भारतात पश्चिम आणि पूर्व घाट उभयसृपांच्या जैवविविधतेच्या अनुषंगाने समृद्ध आहे. तीन महिन्यांमध्ये उभयसृपांच्या उलगडण्यात आलेल्या ११ नव्या प्रजाती याचा पुरावा आहेत. त्यामुळे वर नमूद केल्याप्रमाणे भारताचे क्षेत्रफळ आणि जैववैविध्य संपन्न असूनही केवळ अपुऱ्या संशोधनामुळे आपल्याला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.

@@AUTHORINFO_V1@@