मुदत संपलेली नाही, हे दाखवून देण्याचे आव्हान!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2019   
Total Views |



भाजपची सत्ता असल्याने विरोधी नेत्यांची डाळ काही शिजत नसल्याने आणि आपल्याला हव्या त्या गोष्टी करता येत नसल्याने खोटेनाटे आरोप करून भाजपला बदनाम करण्याचे सत्र विरोधकांनी बऱ्याच आधीपासून आरंभिले आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने शनिवारी आयोजित केलेली महारॅली हा त्याचाच पुढचा अध्याय होता, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.


कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानावर भाजपविरोधी पक्षांच्या विविध नेत्यांना एकत्रित आणून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवरून हटविण्याची हाळी देण्यात आली. या महामेळाव्यात सहभागी झालेल्या विविध पक्षांच्या नेत्यांनी, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्याचे आवाहन जनतेला केले. ममता बॅनर्जी यांनी तर या सभेत, देशात महाआणीबाणीची परिस्थिती असल्याचे सांगताना, इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीपेक्षा ही सध्याची आणीबाणी भयानक असल्याचे नमूद केले. त्याचवेळी ‘बदल दो, बदल दो, दिल्ली में सरकार बदल दो’चा नाराही ममतादीदी यांनी दिला. सध्या ज्या विरोधी पक्षांच्या नेत्यांचे गैरव्यवहार चव्हाट्यावर आणले जात आहेत, अशा सर्वांना देशात आणीबाणीची परिस्थिती असल्याचे वाटणे अगदी स्वाभाविक आहे. मात्र, सर्वसामान्य जनतेला मात्र तसे वाटत असल्याचे दिसत नाही. कोणताही विधायक कार्यक्रम नाही, योजना नाही, फक्त भारतीय जनता पक्षाला विरोध करण्यासाठी विविध पक्षांचे नेते या महामेळाव्यात सहभागी झाले होते. ममता बॅनर्जी यांनी तर भाजप सरकारची मुदत संपली असल्याने ते सरकार हटविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. ममता बॅनर्जी यांना असे भाष्य करताना एका गोष्टीचा विसर पडला आणि ती गोष्ट म्हणजे, ममता बॅनर्जी वा त्या मेळाव्यास उपस्थित असलेल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या नाकावर टिच्चून लोकशाही मार्गाने भाजपचे सरकार सत्तेवर आले आहे. जनतेने ज्या भाजपच्या हाती सत्ता दिली, त्या सरकारची मुदत संपल्याचे सांगणारे तुम्ही कोण टिकोजीराव? तुम्ही म्हणालात म्हणून जनता हुरळून थोडीच देशाला लुबाडणाऱ्या या लबाडांच्या मागे लागणार आहे? त्यामुळे कोणाची मुदत संपली, हे तुम्ही नका ठरवू ममतादीदी!

 

भाजपची सत्ता असल्याने विरोधी नेत्यांची डाळ काही शिजत नसल्याने आणि आपल्याला हव्या त्या गोष्टी करता येत नसल्याने खोटेनाटे आरोप करून भाजपला बदनाम करण्याचे सत्र विरोधकांनी बऱ्याच आधीपासून आरंभिले आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने शनिवारी आयोजित केलेली महारॅली हा त्याचाच पुढचा अध्याय होता, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. भाजपला सत्तेवरून घालवायचे असेल तर विरोधकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे या मेळाव्यात सांगण्यात आले. पण तीच कर्मकठीण बाब आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी, आगामी काळ अत्यंत कठीण आहे, असे सांगताना, समान कार्यक्रम आणि जागावाटप यावर चर्चा करण्यासाठी, त्याबाबतचे मतभेद मिटविण्यासाठी विरोधी नेत्यांनी वारंवार भेटण्याची गरज असल्याचे सांगितले. “माझा आधीचा अनुभव लक्षात घेता, हे महाप्रचंड काम आहे. आता आपल्याकडे जेपी वा आचार्य कृपलानी नाहीत,” असे देवेगौडा म्हणाले. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादल्यानंतर देशात जशी स्थिती होती तशी आता आहे, असेच त्यांना अप्रत्यक्षपणे म्हणावयाचे आहे काय? त्याचबरोबर आम्ही सर्व राजकारणी मंडळी अगदी धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असून भाजप सरकार आमचा विनाकारण छळ करीत आहे, असे त्यांना भासवायचे आहे की काय? विद्यमान भाजप सरकारने भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यांच्या भानगडी बाहेर काढण्यास प्रारंभ केल्यानंतर त्या सर्वांना एकदम आणीबाणीचा भास होण्यास सुरुवात झाली. जेपी आणि आचार्य कृपलानी यांची आठवण येऊ लागली. पण, असल्या भूलथापांना जनता भुलणारी राहिली नाही, हे या लबाड नेतेमंडळींच्या कधी लक्षात येणार?

 

ममता बॅनर्जी यांनी आयोजित केलेली सभा म्हणजे तृणमूल काँग्रेसचे शक्तीप्रदर्शन होते. प. बंगालमध्येच नव्हे, तर राष्ट्रीय राजकारणातही ममता बॅनर्जी यांना डावलून चालणार नाही, असे त्यांनी या निमित्ताने लक्षात आणून दिले आहे. महाआघाडीचा पंतप्रधान कोण हे आम्ही नंतर ठरवू, असे अनेक नेत्यांनी म्हटले असले तरी, आपणही या शर्यतीत आहोत, हे ममता बॅनर्जी यांनी या निमित्ताने दाखवून दिले आहे. या सभेस काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी उपस्थित नव्हत्या. काँग्रेसने मल्लिकार्जुन खरगे आणि अभिषेक मनू सिंघवी यांना प्रतिनिधी म्हणून पाठविले होते. आपल्या संदेशात सोनिया गांधी यांनी आगामी निवडणुका या साध्यासुध्या नसून जनतेची लोकशाहीवरील श्रद्धा पुन्हा दृढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असल्याचे सांगताना, देशाच्या घटनेस घातपात करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींना पराभूत करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. ज्या पक्षाने देशात आणीबाणी लादली होती, त्या पक्षाच्या अध्यक्षपदी १९ वर्षे राहिलेल्या सोनिया गांधी यांनी लोकशाही धोक्यात आल्याचे भाष्य करावे? घटनेस घातपात केल्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप करावा? लोकशाही संकटात असल्याची आवई उठविणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या सरकारने भाजपच्या रथयात्रांवर अलीकडेच बंदी घातली होती, हे जनता अजून विसरलेली नाही, हे ममतादीदी यांच्यासह अन्य नेत्यांच्या कधी लक्षात येणार? या सभेला यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा आणि अरुण शौरी उपस्थित होते. या तिघांनीही भाजपवर तोंडसुख घेण्याची संधी सोडली नाही. भाजपमुळे राजकारणात आपले नाव झाले, याचा विसर त्यांना पडला. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्रिपद भूषविलेल्या या तिघांनी भाजपच्या विद्यमान नेतृत्वावर टीका करण्यासाठी त्या व्यासपीठाचा वापर केला. शत्रुघ्न सिन्हा तर अजून भाजपचे खासदार आहेत. पण, तरीही ते त्या सभेस उपस्थित राहिले आणि भाजपविरुद्ध त्यांनी गरळ ओकली. यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली. अरुण शौरी यांनी विरोधकांनी भाजपविरुद्ध एकास एक उमेदवार उभा करण्याचे आवाहन केले. त्याचवेळी असे करणे कठीण असल्याचेही लक्षात आणून दिले! शत्रुघ्न सिन्हा यांना भाजपमध्ये कोणी विचारात नाही. या सभेच्या निमित्ताने त्यांनी चमकोगिरी करून टाळ्या मिळविण्यापलीकडे काही साधले नाही.

 

तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आयोजित सभेची दखल माध्यमांनी मोठ्या प्रमाणात घेतली. त्याचवेळी या महाआघाडीकडे भाजपला सत्तेवरून घालविण्यापलीकडे अन्य काही कार्यक्रम नसल्याचे दिसून येत असल्याकडेही लक्ष वेधले आहे. आपल्याला देशात काय घडवायचे आहे, आपला कार्यक्रम काय आहे, याची चर्चा हा सर्व गोतावळा करताना दिसत नाही. केवळ भाजप, नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणे, हा एककलमी कार्यक्रम विरोधकांकडे आहे. लोकशाहीतील विविध संस्थांचे खच्चीकरण होत असल्याचा डांगोरा पिटून जनतेची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे. आता आंध्रमध्ये अमरावती येथे आणि राजधानी दिल्लीत अशाच महासभांचे आयोजन करण्याचा विरोधकांचा मानस आहे. कोलकाता येथील सभेस मायावती उपस्थित नव्हत्या. मार्क्सवादीही नव्हते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने निवडणुकीनंतर युतीसाठी प्रयत्न करू, असे म्हटले आहे. भाजपला केंद्रातून आणि तृणमूल काँग्रेसला प. बंगालमधून घालविणे हे आमचे ध्येय आहे, असे मार्क्सवादी पक्षाने म्हटल्याचे लक्षात घेता विरोधकांची युती कशी होणार याची कल्पना आताच येऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर, आमची मुदत संपलेली नाही, हे ममता बॅनर्जी आणि अन्य विरोधकांना दाखवून देण्याचे आव्हान भाजपपुढे आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@