संरक्षण मंत्री आजपासून चीन दौऱ्यावर, शांघाय सहकार्य बैठकीत सहभागी होणार
24-Jun-2025
Total Views |
नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी चीनमधील किंगदाओ येथे २५ ते २६ जून २०२५ या कालावधीत यंदाची शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) संरक्षण मंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भारताच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील.
या बैठकीत, संरक्षण मंत्री प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा, दहशतवादविरोधी प्रयत्न आणि शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य राष्ट्रांच्या संरक्षण मंत्रालयांमधील परस्पर सहकार्य यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा करतील अशी अपेक्षा आहे.
बैठकीत संरक्षण मंत्री शांघाय सहकार्य संघटनेची तत्वे आणि नियमांप्रती भारताची बांधिलकी, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा प्रस्थापित करण्यासंबंधीचा भारताचा दृष्टीकोन, या प्रदेशातील दहशतवाद आणि कट्टरवादाचे उच्चाटन करण्यासाठी एकत्रित आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे आवाहन, तसेच शांघाय सहकार्य संघटनेअंतर्गत अधिकाधिक व्यापार, आर्थिक सहकार्य आणि दळणवळणी जोडणीची गरज अधोरेखित करतील अशी अपेक्षा आहे. ते या बैठकीच्या पार्श्वभूमीवर चीन आणि रशियासह काही सहभागी देशांच्या संरक्षण मंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठकाही घेणार आहेत.
या प्रदेशातली बहुपक्षीयता, राजकीय, सुरक्षा, आर्थिक तसेच नागरिकांमधील परस्पर संपर्क वाढवण्याच्या अनुषंगाने भारत शांघाय सहकार्य संघटनेला विशेष महत्त्वाचे मानतो. शांघाय सहकार्य संघटनेचे धोरण राष्ट्रांचे सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता, अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप टाळणे, परस्पर आदर, समंजसपणा आणि सर्व सदस्य राष्ट्रांच्या समानतेच्या तत्त्वांवर आधारलेले आहे.
भारत – रशिया एनएसएस्तरीय चर्चा
मंगळवारी बीजिंगमध्ये झालेल्या एससीओ सुरक्षा परिषदेच्या सचिवांच्या २० व्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर रशियन सुरक्षा परिषदेचे उपसचिव अलेक्झांडर वेनेडिक्टोव्ह यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची भेट घेतली. दोन्ही अधिकाऱ्यांनी नेत्यांच्या दृष्टिकोनानुसार भारत-रशिया विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारीवर आधारित द्विपक्षीय सहकार्य पुढे नेण्याचे महत्त्व पुन्हा सांगितले. बीजिंगमधील भारतीय दूतावासाने शेअर केलेल्या निवेदनानुसार, बैठकीदरम्यान एनएसए डोभाल आणि वेनेडिक्टोव्ह यांनी द्विपक्षीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली