नागपूर : संत्रानगरी ते स्मार्ट शहर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Dec-2018   
Total Views |



ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स संशोधन संस्थेतर्फे जाहीर करण्यात आलेल्या जगातील वेगाने विकसित होणाऱ्या शहरांच्या यादीत भारतातील १०, तर महाराष्ट्रातील नागपूर या उपराजधानीला बहुमान मिळाला. त्यानिमित्ताने ‘संत्रानगरी’ ते ‘स्मार्ट’ शहर ठरलेल्या नागपूर शहरातील विकासप्रवाहाचा घेतलेला हा आढावा...


महाराष्ट्राचे राजकीय व शासकीय भवितव्य स्थापित करणारे एक महत्त्वाचे शहर म्हणजे नारिंगी नागपूर. नागपूरला तीन हजार वर्षांची परंपरा आहे. हे शहर ब्रिटिशकाळात मध्य भारत व वर्‍हाड भागाची सुमारे १०० वर्षे व काही वर्षे जुन्या मध्यप्रदेशाची राजधानी म्हणून व आता महाराष्ट्राची दुसरी राजधानी शहर म्हणून प्रख्यात आहे. हे शहर २०१३ मध्ये राहण्याजोगे, हरितविशेष व आरोग्याचे स्थान या गोष्टींमध्ये निर्देशक केंद्र म्हणून, तसेच २०१८ मधील स्वच्छता सर्वेक्षणातील उत्तम शहर म्हणून गणले गेले आहे. विशेष म्हणजे, ऑक्सबर्ड इकॉनॉमिक्स संस्थेतर्फे वेगाने विकास करणाऱ्या जगातील २० शहरांतील पाचवे शहर म्हणून जाहीर झाले आहे. नागपूर शहर हे विद्येचे माहेरघर आहेच पण, तेथे मिहानसारखे सरकारी व खाजगी विविध प्रकल्प पण बनत आहेत. नागपूरला महत्त्वाच्या सरकारी संस्थांमध्ये राष्ट्रीय पर्यावरणीय अभियांत्रिकी आणि संशोधन संस्था (NEERI), राष्ट्रीय हवाई विभागाचे देखभालीचे केंद्र, नागपूर विमानतळाच्या ठिकाणी बहुउद्योगी आंतरराष्ट्रीय हब (MIHAN) व विशेष आर्थिक विभाग (SEZ) इत्यादी संस्था आहेत. हे शहर विदर्भातील एक औद्योगिक केंद्र म्हणून विकसित झाले आहे. शहरापासून २५ किमी अंतरावरील बुटीबोरी हे एक मोठे औद्योगिक केंद्र तसेच कांपती, हिंगणा, वाडी, खापरी, कामेश्वर इत्यादी औद्योगिक केंद्रे आहेत. आरोग्यदक्षता, आदरसत्कार, परिवहन, उच्चतम विद्या आणि आर्थिक क्षेत्रात हे शहर पुढारलेले आहे. वनजन्य प्राण्यांची आश्रयस्थाने (sanctuary) असल्याने देशी-विदेशी पर्यटक आकर्षित होऊन येथे येत असतात. म्हणूनच नागपूर शहराला सर्वजण भारताच्या हृदयाच्या ठिकाणी मानतात.

 

जगातील वेगाने विकास

पावणारी भारतातील पहिली १० शहरे

 

एकूण जीडीपी आधारित वेगाने विकसित होणाऱ्या २० पैकी १७ शहरे भारतातील असतील, असा अहवाल ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स संशोधन संस्थेने दिला आहे. त्यातील पहिली १० शहरे क्रमवारित पुढीलप्रमाणे- सुरत, आग्रा, बंगळुरू, हैद्राबाद, नागपूर, तिरुप्पूर, राजकोट, त्रिची, चेन्नई, विजयवाडा

 

‘सेझ’सह ‘मिहान’ प्रकल्प

 

राज्य सरकारने बहुउद्देशीय आंतरराष्ट्रीय विमानतळ हब आणि औद्योगिक वाढीकरिता १,२३३ हेक्टर क्षेत्रात ‘सेझ’ची आखणी केली आहे. यात टाटा समुदायाने एरो स्ट्रक्चर उत्पादन, धीरुभाई अंबानींकडून एरोस्पेस पार्क बनविला जाणार, महिंद्र सत्यम, एअर इंडिया इत्यादी विविध उद्योग येथे बनणार. मिहान प्रकल्पामध्ये नागपूरच्या बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर पुढील काही वर्षांत वार्षिक १४० लाख प्रवासी व ८.७ लाख टन मालवाहतुकीचे लक्ष ठेवले आहे. या प्रकल्पाचे स्थूल मूल्य दोन हजार, ५८१ कोटी रुपये आहे व प्राप्ती पाच हजार, २८० कोटी रुपये अपेक्षित आहे.

 

‘स्मार्ट’ नागपूर

 

हे शहर अवाढव्यरीत्या वाढले असल्याने स्मार्ट बनण्याकरिता तीन प्रकारे प्रयत्न होत आहेतजुना विकसित भाग करणे (retrofitting) - ५०० एकरांहून मोठे क्षेत्र असलेला यातील भाग राहण्याजोगा, कार्यक्षम व ‘स्मार्ट’ बनविणे जसे अहमदाबाद शहर ‘स्मार्ट’ बनत आहे तसे. जुना भाग पुनर्विकसित करणे (redevelopment) सध्या विकसित असलेल्या ५० एकरांहून जास्त भागाचे पुनर्वसन करण्याकरिता काही आधुनिक पायाभूत व अतिरिक्त सेवांचा अंतर्भाव करून त्या भूमीचा सरमिसळ विकास साधणे, जसा मुंबईच्या भेंडीबाजार भागात बनत आहे तसा.

 

हरित अविकसित भाग विकसित करणे (greenfield)

 

२५० एकरांहून अधिक मोठ्या अविकसित भागात नूतन पद्धती वापरून, नियोजित निधीमधून व आधुनिक तंत्राने विकास साधणे. यात गरिबांकरिता परवडणारी घरे बांधण्याचासुद्धा अंतर्भाव होणार, जसे कोलकात्याजवळ नवीन महाजालाचे शहर बनत आहे तसे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायाभूत सेवा वाकबगार पद्धतीने बांधणाऱ्या एल अॅण्ड टी या कंपनीकडे नागपूर ‘स्मार्ट’ बनविण्याच्या कामाचे कंत्राट दिले आहे. पहिल्या टप्प्याच्या कामात ‘स्मार्ट’ पद्धतीने विश्व संपर्क साधण्याकरिता १२०० किमी लांबीचे ऑप्टिकल फायबरचे महाजाल बांधणे व त्यातून शहरातील १३० ठिकाणी प्रभावी वाय-फाय केंद्रे निर्माण करणे, १०० ठिकाणी अंकीय (Digital) दक्ष समन्वय केंद्रे स्थापणे आणि विकसित होणाऱ्या शहरात सुरक्षिततेकरिता तीन हजार, ८०० ठिकाणी सर्वेक्षण कॅमेरे बसविणे. शहरातील जपानी उद्यान चौकापासून ऑरेन्ज शहर रुग्णालय चौकापर्यंत माहिती व संपर्क तंत्रज्ञानांनी प्रेरित केलेली सहा किमी लांब प्रणाली बांधणे, ज्यातून स्मार्ट परिवहन, घनकचरा व्यवस्थापन, स्मार्ट पथदीप प्रकाश योजना, महत्त्वाचे संदेश पाठविणे इत्यादी पायाभूत वाहिन्या कार्यक्षमरीत्या सेवा देऊ शकतील. हे अशाच प्रकारे ‘स्मार्ट’ काम जयपूर, पुणे व विशाखापट्टणमला करण्यात आले आहे. एल अॅण्ड टी कंपनी शहराची महानगरपालिका, पोलीस खाते व इतर शासकीय खात्यांचे सहकार्य घेऊन हे ‘स्मार्ट’ शहर बनविण्याचे काम टप्प्याटप्प्याने करून संपूर्ण शहराला व्यापेल. या ‘स्मार्ट’ शहराच्या प्रक्रियांनी परिवहन वा वाहतूक व्यवस्थेत सुरुवातीला कदाचित सरमिसळ राहून शेवटी ‘स्मार्ट’ व्यवस्था बनेल. निवासी वस्त्यांजवळ ऊर्जारहित वाहनांचा वापर व जवळच्या कामाच्या ठिकाणी चालत जाता येईल अशी व्यवस्था होईल. शहर विभाग हरित बनेल, नाग नदीठिकाणी पर्यावरण सुदृढ व सुशोभित होण्याची कामे होतील, कार्यक्षम घनकचरा व्यवस्थापन होईलइलेक्ट्रॉनिक प्रणालीने सुशासन बनेल व जीआयएस प्रणालीमुळे अनधिकृत कामे बंद होण्यास मदत होईलशहर उत्तम राहण्याजोगे व ते बहुउद्देशीय बनण्याकरिता सर्वांना विकासाच्या सारख्याच संधी मिळतील. तसेच सर्व नागरिकांकरिता आरोग्यदक्षता, शिक्षण व राहायला घरे मिळतील.

 

नागपूर शहराची इतर माहिती

 

लोकसंख्या - २००१ मध्ये २० लाख, सध्या २५ लाख व २०४१ मध्ये ४३ लाख अपेक्षित आहे. शिक्षणक्षेत्र व आरोग्यदक्षता क्षेत्राचे ‘हब’ स्थापित केले जाईल. हे शहर दक्षिण पठाराच्या मध्यावर असल्याने ब्रिटिशांच्या काळात सोईकरिता अंतर गणतीकरिता नकाशात शून्य मैल या शहरात दर्शविला जायचा. येथे नैसर्गिक (अंबाझारी, गोरेवाडा, तेलंगखेडीसारखे) व कृत्रिम (सोनेगाव, गांधीनगरसारखे) असे मोठाले तलाव आहेत. येथे तापमान मात्र उन्हाळ्यात ४५ अंश व हिवाळ्यात ४ अंशापर्यंत असते. पाऊस वार्षिक १२०० मिमीपर्यंत पडतो. येथे संत्र्यांचे मोठे पीक येते व मोठा व्यापार होतो. हलदीरामनी संत्र्याची मिठाई करून विकण्याची सोय केली आहे. टाटा समुदायाने १८७७ मध्ये येथे देशातील पहिली कापडगिरणी एम्प्रेस मिल स्थापली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालयही याच नागपूर शहरात आहे. नागपूर महानगरपालिकेने पाणीपुरवठा व घनकचरा व्यवस्थापनाकरिता खाजकीकरण केले आहे. व्हेवोलिया व विश्वराज संयुक्त कंपनी पाणीपुरवठा, गारेवाडा येथील जल प्रक्रिया केंद्र, जमिनीजवळील व उंच जलाशय आणि मुख्य (Master) जलाशयाची ते देखरेख करतात. दुसरी कंपनी घनकचऱ्याचे काम बघते, घरोघरचा कचरा जमा करते व भांडेवाडी कचराभूमीत फेकते. मलजल निस्सारणाकरिता व मलजलप्रक्रियेकरिता एसएमएस एनव्होकेअर कंपनीला कंत्राट दिले जाईल. मलजलाची प्रक्रिया करून पुनर्वापर करण्याचे तंत्र पण कंपनीकडे आहे. घरातील मलजल, औद्योगिक मलजल वा जैवमलजलावर प्रक्रिया करण्याची जरूरी पडेल व या कंपनीने ही कामे केलेली आहेत. हे शहर विद्येचे माहेरघर आहे.

 

आयुर्वेदीय व दंतवैद्यक धरून चार सरकारी वैद्यकीय महाविद्यालये नागपूरमध्ये आहेत. कर्करोग व इतर रोगांकरिता येथे विशेष उपचाराकरिता रुग्णालये आहेत व सर्व देशभरातून म्हणजे उत्तरेकडून उत्तरप्रदेश दिल्लीमधील, पूर्वेकडील कोलकाता, पश्चिमेकडील मुंबई पुणे येथील व दक्षिणेकडील हैद्राबादचे रुग्ण येथे वैद्यकीय उपचाराकरिता येत असतात. चार सरकारी विद्यापीठे आहेत. १९२३ पासून असलेल्या तुकडोजी महाराज विद्यापीठाला अभियांत्रिकी व अभितांत्रिकी महाविद्यालयासकट ६०० महाविद्यालये जोडली आहेत. प्राणी व मत्स्य विज्ञानाकरिता विद्यापीठ, कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ व महाराष्ट्र राष्ट्रीय कायदेविषयक विद्यापीठ आहे. जीएच रायसोनी आधुनिक विद्यापीठ पण आहे. कृषी, औषधी, अभियांत्रिकी, मॅनेजमेंट इत्यादी शिक्षण त्यात मिळते. इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी (IMT) ही एक प्रख्यात मॅनेजमेंट शिक्षण देणारी प्रख्यात संस्था आहे. देशातील ३० संस्थामध्ये तिचा गुणवत्ता क्रमांक वरचा आहे. नागपूरला दीक्षाभूमी म्हणून सर्वात मोठे बौद्धस्तूप व घुमट आहे. ३० जैन विख्यातमंदिरे आहेत. स्वयंभू असे टेकडी गणेश मंदिर, रामटेक फोर्ट मंदिर अशी अनेक मंदिरे आहेत. उमरेड वाईल्डलाईफ अभयारण्य ही वाघांकरिता, महाराजबाग प्राणीसंग्रहालय वाघ, माकडे, मगरी, हरणे इत्यादीकरिता (हे सातही वार उघडे असते) तसेच गोरेवाडा प्राणिसंग्रहालय प्रख्यात आहेत. अशा या नागूपर आणि संपूर्ण विदर्भ, मराठवाड्याचा समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून विकास होऊन महाराष्ट्राची विकासप्रक्रिया गतिमान होईल, हे निश्चित.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@