वजनाचे वजन बदलले!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Nov-2018   
Total Views |


 


किलोग्रॅमचे हे नवीन मूल्य ‘किबल बॅलन्स’ या मूल्यांकन पद्धतीनुरूप निर्धारित केले जाईल. म्हणजेच, किलोग्रॅमच्या मानकाचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक तरंगांच्या आधारे अचूक वस्तुमान निश्चित केले जाईल. भारतात आगामी तीन ते चार वर्षांत किबल बॅलेन्सवर वजन मोजणारी मशीन्सही दाखल होतील. पण, आधी सांगितल्याप्रमाणे याचा सामान्य ग्राहकांवर कुठलाही परिणाम जाणवणार नाही. मग साहजिकच हाच प्रश्न पडतो की, किलोग्रॅमच्या मानकाच्या अचूक वजननिश्चितीसाठी एवढा खटाटोप का बरं?

 

वजन... हल्ली कुणालाही अगदी धडकी भरवणारा हा एक शब्द. बहुतांशी लोकांना तर आपले वजन कधी वाढू नये, असंच वाटतं असतं. त्यात अंग अजून भरण्यासाठी वजन वाढावे, म्हणून शारीरिक संस्कार करणारेही कमी नाहीतच. थोडक्यात काय, अगदी आपल्या शरीरापासून ते बाजारातील कोणत्याही वस्तूच्या खरेदीपर्यंत वजनाचे मोजमाप हे तसे अपरिहार्य. मानवी देवाणघेवाण, व्यवहार आणि व्यापाराला एका समान साच्यात ढाळण्याचे काम करणारे एकक म्हणजे वजन. हे वजन आपण मायक्रोग्रॅम, ग्रॅम, किलोग्रॅम या एककांमध्ये मोजत असतो. भाजीवाल्या-फळवाल्याकडील त्या लोखंडाच्या गोळ्यांवर लिहिलेल्या १ किलोग्रॅमवर विश्वास ठेवून आपली किलो किलोने खरेदीही सुरू असते. पण, आता जर तुम्हाला कोणी सांगितले की, या किलोग्रॅमचेच वजन बदलणार आहे तर... कोणी म्हणेल हे कसं बरं शक्य आहे? किलोग्रॅम तर किलोग्रॅमच राहणार ना? त्याचं निश्चित माप असं अचानक कसं काय बदलू शकतं? पण, गेल्याच आठवड्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय वजन आणि मापन संघटनेतील ६० देशांच्या सदस्यांनी या किलोग्रॅमचेच मूळ मानक बदलायचे ठरवले आहे. परंतु, याचा तुम्हा-आम्हा सर्वसामान्यांवर वस्तू खरेदी करताना कोणताही परिणाम जाणवणार नाही, हेही तितकेच खरे. त्यामुळे प्रत्यक्षात किलोग्रॅमचे वजन कमी किंवा जास्त न होता, त्याचे मानक अथवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील ठरलेल्या मापात मात्र बदल होणार आहे. हा बदल लगेच आज किंवा उद्या होणार नसून २० मे २०१९ पासून किलोग्रॅमचे बदललेले मानक जागतिक स्तरावर अमलात आणले जाईल.

 

हा विषय साहजिकच भौतिकशास्त्राशी निगडित असला तरी समजायला फारसा अवघड नाही. फार सुरुवातीला किलोग्रॅम म्हणजे एक लिटर पाण्याचे वस्तुमान, असा ढोबळमानाने एक नियम होता. त्यानंतर १८८९ साली शास्त्रज्ञांनी किलोग्रॅमचे हे मानक एका भौतिक वस्तूमध्ये निर्धारित केले. ही वस्तू म्हणजे प्लॅटिनम आणि इरिडियम या धातूंचा एक चमकदार लंबवर्तुळाकार आकार. किलोग्रॅमचे हे मानक आजतागायत म्हणजे तब्बल १३० वर्षं फ्रान्समध्ये काचेच्या एकावर एक अशा तीन पारदर्शक बरण्यांमध्ये अगदी सुरक्षित ठेवण्यात आले. साधारणपणे या धातूची झीज वगैरे झाली नसली तरी स्वच्छता करताना किंवा एका जागेवरून दुसऱ्या जागी नेताना अगदी धूलिकण किंवा हवेतील सूक्ष्म अणुंमुळे या मानकाच्या वस्तुमानात सूक्ष्म फरक पडत असे. तेव्हा, मानकातील ही सूक्ष्म स्थित्यंतरेदेखील शास्त्रज्ञांना अयोग्य वाटली. कारण, त्या वजनाच्या मानकातील अणू-रेणू, वस्तुमानातील हे सूक्ष्म बदलही स्वीकारार्ह नाहीत. त्यात तंत्रज्ञानात झालेले बदल लक्षात घेता, केवळ एका वस्तूच्या आधारावर वजनाचे अशाप्रकारे मोजमाप करणेही शास्त्रज्ञांना अप्रस्तुत वाटू लागले. म्हणूनच, किलोग्रॅमचे स्थिर मानक ठरवण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.

 

आता हे नवीन किलोग्रॅमप्लॅन्क कॉन्स्टंटनावाच्या एका लहान अपरिवर्तनीय मूलभूत मूल्यावर आधारित असेल. किलोग्रॅमचे हे नवीन मूल्य ‘किबल बॅलन्स’ या मूल्यांकन पद्धतीनुरूप निर्धारित केले जाईल. म्हणजेच, किलोग्रॅमच्या मानकाचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक तरंगांच्या आधारे अचूक वस्तुमान निश्चित केले जाईल. भारतात आगामी तीन ते चार वर्षांत किबल बॅलेन्सवर वजन मोजणारी मशीन्सही दाखल होतील. पण, आधी सांगितल्याप्रमाणे याचा सामान्य ग्राहकांवर कुठलाही परिणाम जाणवणार नाही. मग साहजिकच हाच प्रश्न पडतो की, किलोग्रॅमच्या मानकाच्या अचूक वजननिश्चितीसाठी एवढा खटाटोप का बरं? पण, याचे शास्त्रज्ञांनी दिलेले सोपे उत्तर म्हणजे, कुठल्याही वैज्ञानिक शोधाची, संशोधनाची सुरुवात ही स्थिर असणे गरजेचे आहे. जर ही सुरुवातच मुळात अस्थिर असेल, तर पुढची सगळी गणितं आपसूकच कोलमडतात. त्यामुळे अशाप्रकारे मानकांचे प्रमाणीकरण करणे कालसुसंगत ठरते. त्यात माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या आमूलाग्र बदलांमुळे दररोज विविध क्षेत्रातील नवनवीन शोध समोर येत आहेत. तेव्हा, या वैज्ञानिक प्रगतीचा सर्वार्थाने मानवाच्या दैनंदिन जीवनात शिरकाव झाल्यास, ते हिताचेच ठरेल यात शंका नाही. अशाप्रकारे किलोग्रॅमचे वजन पुनर्निधारित करण्याबरोबरच अॅम्पर, केल्विन आणि मोल या एककांच्या मानकांमध्येही बदल करण्यात आले आहेत. तेव्हा, कालप्रवाहात प्रगती करताना जे मूळ, ठोस, स्थिर, निरंतर मानून आपण वाटचाल करतो, तेही कालपरत्वे बदलू शकते, बदलत राहील, यावर या संशोधनाने एकप्रकारे शिक्कामोर्तबच केले.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@