भाषा हे संवादाचे माध्यम आहे हा भाषेविषयीचा व्यावहारिक दृष्टीकोन आज सर्वमान्य दिसतो. तो योग्यही असला तरीही, यामुळे भाषा शिकण्याकडे बघण्याच्या दृष्टीकोनातही फरक हा पडतोच. संस्कृत सारख्या ज्ञानभाषा शिकण्याकडे अधिक कल वाढावा असे वाटत असेल, तर भाषा हे माध्यम व्यवहाराबरोबरच ज्ञानार्जनाचेही माध्यम झाले पाहिजे. ‘कृपया रांगेत बसमध्ये चढावे’ हे वाक्य आपण सहजगत्या मराठीत वाचतो. या वाक्यामधील ‘कृपया’ आणि ‘मध्ये’ हे दोन शब्द मराठी नाहीत, हे आपल्या कधी ध्यानात आले आहे काय? हे शब्द केवळ संस्कृत आहेत असेही नाही. तसे पाहता ‘वाक्य, शब्द, ध्यानात’ असे इतरही अनेक शब्द या वायांमध्ये आहेत. आपण त्यांना ‘तत्सम शब्द’ म्हणतो. परंतु, तत्सम शब्दांचीही जी रूपे मराठीत वापरली जातात, ती मराठी व्याकरणानुसार असतात. ‘कृपया’ आणि ‘मध्ये’ यांचे तसे नाही. या शब्दांची रूपे संस्कृत व्याकरणानुसार आहेत. परंतु, त्यांचा अर्थ आता मराठी मनात स्पष्ट आहे. ‘सहजगत्या’ हा शब्दही तसाच आहे, हे काहींच्या लक्षात आले असेल. अधिक डोळसपणे पाहायला लागल्यावर असे अनेक शब्द आपल्याला बोली मराठीत दिसतील. संस्कृत शब्द त्यांच्या व्याकरणासकट आपण मराठीत का सामावून घेतले, याचे आकलन भाषा, संस्कृती आणि निर्वसाहतीकरण यांच्यातील परस्परसंबंध समजून घेण्यासाठी आवश्यक आहे.
भारतासारखी भाषिक विविधता जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठेही आढळत नाही. आढळलीच तर ती आग्नेय आशियात, जेथील संस्कृती ही भारतीय संस्कृतीशीच साधर्म्य सांगणारी आहे. असे असताना भारतात जे सांस्कृतिक ऐय दिसते आणि त्याच्या मुळाशी गेल्यास जे संकल्पनात्मक ऐय जाणवते ते कशामुळे निर्माण झाले असावे? याचा विचार केल्यास असे लक्षात येते की, या भाषांचा विकास एकमेकांपासून विलग अशाप्रकारे झालेला नसून, एकाच प्रकारच्या आशयाचे भिन्न भिन्न स्थानिक अनुभवांच्या आधारे झालेले प्रकटीकरणच भिन्न भाषांच्या निर्मितीचे कारण असावे. हिंदू संस्कृती ही गेली काही सहस्रके विकसित होत आलेली आहे. वेदकाळापासून आपली संस्कृती चालत आल्याचे जरी आपण मानत असलो, तरी ती त्या काळात गोठलेली संस्कृती नव्हे. पृथ्वीवरील अन्य प्राचीन संस्कृतींच्या तुलनेत जिवंतपणा हा महत्त्वाचा फरक ध्यानात घेतला, तर त्यातील संस्कृतीच्या विकसनाच्या काळाचा प्रवाह ध्यानात येतो. त्याचबरोबर त्या संस्कृतीने विकसित केलेल्या भाषा बदलाचाही प्रवाह दिसतो. भारतीय भाषांच्या विकासाचा इतिहास एकरेषीय नसावा. प्राचीन काळात बोलल्या जाणार्या कित्येक भाषा आज. अजिबात प्रचलित नाहीत परंतु, त्याही भाषांमधील उपलब्ध साहित्य पाहिल्यास या सर्व भाषांच्या अभिव्यक्तीतील वेगळेपणा सोडला, तर त्यांच्या आशयाचे एकत्व दिसून येते.
भाषांच्या वापरातील सतत होत असलेल्या बदलांमध्ये एक स्थिरपद असणारी भाषा म्हणून, आपण संस्कृत भाषेकडे पाहू शकतो. या भाषिक सातत्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे, संस्कृत ही पुरातन काळापासून भारतातील ज्ञानभाषा राहिलेली आहे. सर्व प्रमुख भारतीय साहित्य ज्यामध्ये धर्मशास्त्रांपासून काव्य, नाटक इथपर्यंतचे सर्व साहित्यप्रकार अंतर्भूत होतात, हे सर्व संस्कृत भाषेत आहेत. स्वाभाविकपणे बौद्ध मताचा प्रभाव असणार्या काळातील पालीसारख्या ‘प्राकृत भाषेतील साहित्य’ किंवा तामिळ भाषेतील ‘संगम साहित्य’ हेही भारतातील ‘सनातन साहित्य’ म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु, इथे प्रश्न भारतीय भाषाकुलामधील सर्वाधिक महत्त्वाची किंवा सर्वांत जुनी भाषा कोणती हा नाही. संस्कृत ही भारतात कुठल्याही काळात बोली भाषा म्हणून अस्तित्वात होती का नाही? यासारखे प्रश्नही इथे महत्त्वाचे नाहीत. आपण ज्या निर्वसाहतीकरणाच्या दृष्टिकोनातून भाषेच्या वापराकडे पाहात आहोत त्याचा विचार करता, आमच्या सांस्कृतिक संचिताचे जतन आणि संवहन करण्याच्या दृष्टीने ती सर्वाधिक महत्त्वाची ठरते. लेखाच्या शीर्षकात संस्कृत भाषेला भारतीय भाषांची जननी म्हटले आहे, ते अशा अर्थाने नाही की, संस्कृत ही भारतातील सर्वांत जुनी भाषा असून, इतर सर्व भाषा तिच्यातून उत्पन्न झाल्या आहेत. प्रत्यक्ष वस्तुस्थिती कदाचित याच्या सर्वथा उलटही असू शकते कारण, माणूस आधी बोलायला लागतो आणि मग त्या बोलींना काही समान रूप आले की, त्यांच्या भाषा बनतात आणि अशा भाषांवर व्याकरणादि विषयांचे विशिष्ट संस्कार करून बनते ती संस्कृत भाषा, असा कालक्रम असण्याची शयता अधिक. मात्र, आजच्या संदर्भात विचार करताना, सर्वच भारतीय भाषा नवीन ज्ञानाचा प्रवाह आणून समृद्ध बनवायच्या असतील, तर ही समृद्धता संस्कृत भाषेच्या मार्गानेच येते. आज मराठीत ‘महापौर’ किंवा हिंदीत ‘विधायक’ हे शब्द रूढ होताना, आपण संस्कृतचा आधार सहजपणे घेत असतो. संस्कृत ही आजच्या काळात सर्व भारतीय भाषांची जननी ठरते, ती याच अर्थाने.
वसाहतींच्या काळात वसाहतकर्त्या देशांनी त्यांच्या भाषा परतंत्र देशांना स्वीकारण्यास कसे भाग पाडले, त्याचा इतिहास पाहिल्यास त्यात दोन मुख्य भाग आपल्याला दिसतात. पहिले म्हणजे शिक्षणाचे माध्यम. शिक्षणाचे, विशेषतः उच्चशिक्षणाचे माध्यम इंग्रजी भाषेत असल्याने, भारतीय समाजाचे जे शैक्षणिक नुकसान झाले आहे ते आपण पूर्वी पाहिले आहे. परंतु, भाषेच्या आणि अभिव्यक्तीच्या क्षेत्रातही या धोरणाचा प्रभाव खोलवर उमटला. गेल्या दोन-तीन शतकांत जे मानवी समाजाला नवीन ज्ञान झाले आहे, ते सर्व आज केवळ इंग्रजी भाषेतच आपल्यासाठी उपलब्ध आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील नवीन ज्ञान हे संस्कृतीनिरपेक्ष प्रकारचे संपूर्ण मानवजातीस लागू पडणारे असे असल्याने, त्याची अभिव्यक्तीची भाषा ही इंग्रजी असल्याने विशेष फरक पडू नये, असा आपला समज असतो आणि तो बव्हंशी बरोबरही आहे. मात्र, सामाजिक शास्त्रांचेही ज्ञान आपण इंग्रजी भाषेमधूनच घेतो आणि त्यामुळे किती प्रकारचे संकल्पनात्मक र्हास होतात, ते आपण पाहिलेले आहे. प्रथमतः या विषयांमधील ज्ञान हे सर्वथा नवीन प्रकारचे असे नसते. अनेक प्राचीन तत्त्ववेत्त्यांनी मांडलेले विचार आजच्या समाजस्थितीसही लागू पडतात मात्र, ते जर संस्कृत किंवा तत्सम प्राचीन भाषांमध्ये असेल, तर त्याचे प्रथम इंग्रजीत भाषांतर होऊन मगच त्या विवेचनाचा अभ्यास करता येऊ शकतो. अशा भाषांतरातून होणार्या अर्थलोपाविषयी आपण पाहिले आहे. परंतु, सर्वच ज्ञानशाखांमध्ये आज इंग्रजी भाषेतून व्यवहार होणे हे स्वाभाविक झाले आहे. इंग्रजी ही संपूर्ण जगभरात ज्ञानभाषा म्हणून प्रस्थापित होण्यास, गेल्या दोन-तीन शतकांमधील वसाहतवादी धोरणे अशा प्रकारे कारणीभूत ठरली आहेत. भाषिक निर्वसाहतीकरण हे जर आपले उद्दिष्ट असेल, तर आपल्या भाषा केवळ सामान्य व्यवहाराच्या भाषा म्हणून प्रस्थापित होणे पुरेसे नाही. त्या ज्ञानभाषा म्हणून किमान संस्कृतीसापेक्ष ज्ञानशाखांमध्ये तरी प्रस्थापित होणे, ही सांस्कृतिक निर्वसाहतीकरणासाठी पूर्वअट आहे.
भाषिक वसाहतवादाचे दोन पैलू आतापर्यंतच्या लेखांमधून आपण पाहिले आहेत, ते म्हणजे आपल्या संस्कृतीसापेक्ष संकल्पनांची अपूर्ण अभिव्यक्ती आणि भाषेच्या व्यवहाराच्या अवकाशाचे संकुचन आणि त्यामुळे संपूर्ण भाषेलाच येणारे एक प्रकारचे पंगुत्व. आपण हेही म्हटले की, भारतीय समाज हा बहुभाषक पण एक सांस्कृतिक अशा प्रकारचा समाज आहे. या परिस्थितीत आपल्या सर्व स्थानिक भाषांचे समृद्धीकरण आणि अधिकाधिक उपयोजन हे आवश्यकच आहे. परंतु, राष्ट्रीय दृष्टिकोनातून विचार करताना संस्कृत भाषेचे महत्त्व नाकारता येत नाही. संस्कृत भाषा ही मुळातच हिंदू समाजाची ज्ञानभाषा राहिलेली असल्याने, विविध शास्त्र व कला याविषयीचे साहित्य मुळातच संस्कृत भाषेत उपलब्ध आहे. त्यामुळे नवीन ज्ञानाची मांडणी ही संस्कृत भाषेत करताना, विशेष समृद्धी करण्याची आवश्यकता पडू नये. त्यामुळे भारताच्या भाषिक पुनरुज्जीवनाची स्वाभाविक भाषा ही संस्कृत ठरते. दुसरे म्हणजे, संस्कृत ही तिच्या वैशिष्ट्यपूर्ण व्याकरणामुळे एकाचवेळी नेमकेपणा आणि लवचिकपणा असलेली भाषा आहे. त्यामुळे ज्या संकल्पनांचे अस्तित्व संस्कृतमध्ये नाही, त्यांनाही आत्मसात करण्याचे सामर्थ्य संस्कृत भाषेत आहे. आज इंग्रजीच्या श्रेष्ठत्वाचे एक महत्त्वाचे लक्षण, तिने अन्य भाषांमधून ग्रहण केलेल्या शब्दांचे असल्याचे सांगितले जाते. संस्कृत भाषेला त्याप्रकारे जागतिक ज्ञानभाषा होता येईल का? ते काळ ठरवेल. पण, आता आवश्यकता आहे ती भारतीय तत्त्वज्ञान, सामाजिकशास्त्रे, कला इत्यादी विषयांतील संस्कृतीसापेक्ष ज्ञान कोणताही अर्थ लोप न होता, किमान भारतीय समाजास उपलब्ध असणे. याकरिता संस्कृत भाषेचे भारतीय समाजासाठी असणारे केंद्रगामीस्थान नाकारता येत नाही.
दुर्दैवाने आज आपण कोणतीही भाषा ही केवळ प्राथमिक संवाद आणि सामान्य व्यवहारांतील क्रियाकलापांसाठी आवश्यक संभाषण, इतयापुरती मर्यादित केली आहे. अशा परिस्थितीत बोली नसलेली संस्कृत भाषा शिकणे, हे केवळ शालेय शिक्षणातील किमान अपेक्षा पूर्ण करण्यापुरतेच होऊन बसले आहे. आपल्या रोजच्या पठणातील साध्या संस्कृत श्लोकांचे अर्थही आपल्याला माहीत नसतात आणि कोणी ते आपल्याला व्हॉट्सअॅपवर पाठवले, तर मोठे तत्त्वज्ञान कळल्याच्या आविर्भावात आपण ते इतरांना पाठवतो. परंतु, किमान सामान्यस्तराचे संस्कृत शिकावे, जेणेकरून हे अर्थ आपले आपल्यालाच कळतील असे आपल्याला वाटत नाही. या परिस्थितीतून संपूर्ण समाजाला जर मुक्त व्हायचे असेल आणि आपल्या सांस्कृतिक संचिताचे सुयोग्य आकलन जर आपल्याच पुढच्या पिढ्यांना करून द्यायचे असेल, तर संस्कृत भाषेकडे पाहण्याचा हा उपयुक्ततावादी संकुचित दृष्टिकोन सोडून देऊन, सर्व भारतीय भाषांना अद्ययावत बनवण्यासाठीचे प्रमुख वाहन आणि नवीन काळासाठीच्या त्यांच्या रूपाची जननी या तिच्या स्थानाला एक समाज म्हणून मान्यता देणे आवश्यक आहे. ज्या भाषेला आपण देवभाषा म्हणून गौरवतो, त्याच भाषेतून आपल्या वैचारिक मुक्तीचा उद्घोष सुयोग्य ठरेल.
डॉ. हर्षल भडकमकर
(लेखकाने मुंबईतील ‘टीआयएफआर’ येथून खगोलशास्त्रात ‘पीएच.डी’ प्राप्त केली आहे. सध्या एका खासगी वित्तसंस्थेत नोकरी करत असून, ‘प्रज्ञा प्रवाह’ या संस्थेचे कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत.)
९७६९९२३९७३