नाशिकनंतर कोकणातही असंतोषाचे वादळ!

भास्कर जाधव यांनी दंड थोपटले; ‘उबाठा’ गटात नव्या नाराजीची चाहूल

    07-Jun-2025
Total Views |
 
Bhaskar Jadhav displeasure ubt group
 
मुंबई: उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना राजकीय रंग चढत असतानाच, ’उबाठा’ गटात नव्या नाराजीचा स्वर उमटू लागला आहे. नाशिकनंतर आता कोकणातही असंतोषाचे वादळ उठले आहे.
 
ज्येष्ठ नेते आणि उबाठाचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव यांनी 2019 साली मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याची खंत व्यक्त केली आहे. त्यांच्या या जाहीर विधानामुळे ’उबाठा’ गटातील अंतर्गत विसंवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, संघटनात्मक स्थैर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.चिपळूणमधील एका कार्यक्रमात बोलताना भास्कर जाधव म्हणाले, 2019 मध्ये मंत्रिमंडळात मला घ्यायला हवे होते. मी सर्वांत जुना आणि सर्वाधिक वेळा निवडून आलेला आमदार होतो. तो माझा अधिकार होता. पण मला संधीच मिळाली नाही. तरीदेखील मी कधीही नाराजी बोलून दाखवली नाही. पुढे बोलताना त्यांनी पक्षात राहून गद्दारी करणार्‍यांना टोला लगावला.
 
माझ्या पुढ्यातील ताट अनेकांनी ओढण्याचा प्रयत्न केला, पण मी कधीच कोणासमोरील ताट ओढले नाही. पक्षात राहून पक्षाच्या विरोधात काम करणारे हे ‘महागद्दार’ आहेत, असा रोखठोक इशारा त्यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्याचा रोख कुणाकडे होता, यावर विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.जाधव यांचे विधान केवळ त्यांच्या वैयक्तिक नाराजीचे प्रतीक नाही, तर कोकणातील कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेल्या अस्वस्थतेचाही तो स्पष्ट संकेत आहे. उबाठा-मनसे युतीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांचे हे वक्तव्य अतिशय महत्त्वाचे ठरते. कारण, नाशिकनंतर कोकणातही नाराजीचे पडसाद उमटू लागल्याने, महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ‘उबाठा’ गटासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.