उत्तन-विरार सागरी सेतूच्या पहिल्या टप्प्याला गती

वर्सोवा ते उत्तन हा भाग संरेखनातून वगळला सुधारित जोडणी, डिझाइन आणि आर्थिक लाभांसह प्रकल्पाला गती

    02-May-2025
Total Views | 23
उत्तन-विरार सागरी सेतूच्या पहिल्या टप्प्याला गती

मुंबई, उत्तन–विरार सागरी सेतू या परिवर्तन घडविणाऱ्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी करण्याला मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणामार्फत वेग देण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे उत्तर मुंबई महानगर क्षेत्राचा सर्वांगीण लाभ होणार आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या १५९व्या प्राधिकरण बैठकीत सविस्तर आढावा घेतल्यानंतर, सुधारित टप्पा-१ प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. १५९व्या प्राधिकरण बैठकीत तांत्रिक आणि आर्थिक पैलूंचा सविस्तर आढावा घेण्यात आला. त्यानंतर ₹८७,४२७.१७ कोटी इतक्या सुधारित प्रकल्प खर्चाला मंजुरी देण्यात आली.

सुरुवातीला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अखत्यारीत वर्सोवा–विरार सागरी सेतू (व्हीव्हीएसएल) म्हणून या प्रकल्पाची संकल्पना मांडण्यात आली होती. मात्र, ऑक्टोबर, २०२२ मध्ये झालेल्या १५३व्या प्राधिकरण बैठकीत हा प्रकल्प एमएमआरडीएकडे हस्तांतरित करण्यात आला. त्यानंतर फेब्रुवारी, २०२४ मध्ये दोन अंमलबजावणी योग्य टप्प्यांमध्ये प्रकल्पाची रचना विभागण्यात आली. यातील टप्पा-१च्या (उत्तन ते विरार) अंमलबजावणीसाठी तातडीने मंजुरी देण्यात आली असून टप्पा-२बाबत (विरार ते पालघर) सध्या व्यवहार्यता अभ्यास करण्यात येत आहे. हा भाग मुंबई महानगरपालिकेच्या उत्तर सागरी किनारा मार्ग प्रकल्पात समाविष्ट असल्यामुळे तो सध्याच्या संरेखनातून वगळण्यात आला आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये:
१. विनाअडथळा आणि वेगवान जोडणी
२. वाहतूक कमी होऊन प्रदूषणात घट
३. आर्थिक एकात्मीकरण आणि प्रवेश सुलभता
४. गुंतवणुकीला चालना
५. रोजगारनिर्मिती आणि आर्थिक सक्षमीकरण
६. वेगवान आपत्कालीन सेवा
७. रिअल इस्टेटच्या किमतीत वाढ
८. पर्यावरणपूरक विकास
९. पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण

यूव्हीएसएल टप्पा-१विषयी

यूव्हीएसएल टप्पा-१ची एकूण लांबी (सागरी सेतू आणि जोडरस्त्यांसह) ५५.१२ किमी असून यात खालील जोडरस्त्याचा समावेश आहे.

• उत्तन ते विरार सागरी सेतू : २४.३५ किमी
• उत्तन जोडरस्ता : ९.३२ किमी
• वसई जोडरस्ता : २.५ किमी
• विरार जोडरस्ता : १८.९५ किमी
"महाराष्ट्राच्या पायाभूत विकासाचा विचार करता हा प्रकल्प ही एक मोठी झेप आहे. सर्वांसाठी अधिक चांगली कनेक्टिव्हिटी निर्माण करण्याचा, आर्थिक प्रगतीला चालना देण्याचा आणि मुंबईत पर्यावरणपूरक विकास करण्याचा आमचा निर्धार या प्रकल्पातून दिसून येतो. उत्तन–विरार सागरी सेतूमुळे या भागासाठी अधिक उज्वल आणि सर्वांशी जोडलेल्या भविष्यासाठीचा मार्ग तयार झाला आहे."

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

"उत्तन–विरार सागरी सेतू (यूव्हीएसएल) जोडणीद्वारे मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर हे महत्त्वाचे जिल्हे पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे जोडले जाणार आहेत. या प्रकल्पामुळे प्रवास सुकर होणारच आहे, शिवाय आर्थिक संधी वाढतील, आपत्कालीन सेवां अधिक सुलभपणे पोहोचू शकतील आणि संपूर्ण भाग परस्परांच्या अधिक जवळ येईल आणि ‘वन एमएमआर, वन ग्रोथ स्टोरी’ (एक एमएमआर, एक यशोगाथा) हे व्हिजन या प्रकल्पातून साकार होत आहे."

एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व एमएमआरडीए, अध्यक्ष

"उत्तन–विरार सागरी सेतूच्या (यूव्हीएसएल) माध्यमातून आम्ही कमी करण्यासोबतच आयुष्यही बदलत आहोत. विरार आणि मुंबई काही मिनिटांत जोडणाऱ्या या महत्त्वपूर्ण कॉरिडॉरमुळे दैनंदिन प्रवास अधिक सुलभ होईल, कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास वेळ कमी लागेल आणि वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगी वेळेत वैद्यकीय सुविधेपर्यंत पोहोचता येईल. अधिक समावेशक, अधिक जोडलेला आणि अधिक सक्षम असा मुंबई महानगर प्रदेश घडविण्याच्या दिशेने हा प्रकल्प ही एक मोठी झेप आहे."

- डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121