अँथेन्स : जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेसनुसार, बुधवार १३ मे २०२५ रोजी ग्रीसमधील क्रेते बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप झाला. हा भूकंप ८३ किलोमीटर खोलवर झाला असल्याचे जीएफझेडने सांगितले आहे. कोणत्याही जीवितहानी किंवा मोठ्या मालमत्तेच्या नुकसानीची नोंद नाही. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन पथकांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या भूकंपानंतर ग्रीसमध्ये ५.९ तीव्रतेच्या समुद्रकिनाऱ्यावरील भूकंपामुळे त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. कासोस बेटाच्या ४८ किलोमीटर अंतरावर हा भूकंप झाला होता. हवामान आणि नागरी संरक्षण मंत्रालयाने ११२ आपत्कालीन संदेश प्रणालीद्वारे नागरिकांना किनाऱ्यापासून दूर जाण्याचे आवाहन केले आहे.
ग्रीस हा भूकंपीय हालचालींसाठी संवेदनशील देश असून, जानेवारी २६ ते फेब्रुवारी १३ दरम्यान सायक्लेडस बेटांच्या जवळपास अथेन्स विद्यापीठाच्या भूकंपशास्त्र प्रयोगशाळेने १८४०० लहान भूकंपांची नोंद केली होती. त्या काळात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तरी स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
त्याचवेळी, इजिप्तमध्येही नागरिकांनी भूकंपाचे धक्के जाणवले. इजिप्तच्या नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोनॉमी अँड जिओफिजिक्सने कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झाल्याचे सांगितले नाही. इजिप्तमध्ये ६.४ तीव्रतेचा भूकंप उत्तर किनाऱ्यापासून ४३१ किलोमीटर अंतरावर झाला असल्याचे नोंदवले आहे.