
नवी दिल्ली : पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांवनी पहलगामन येथे केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे दहशतवाद असेल तेथे नष्ट करण्याचे धोरण स्पष्ट केले आहे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेत केले आहे.
सद्यस्थितीत या प्रदेशासमोर शांतता, सुरक्षा आणि विश्वासाच्या अभावाशी संबंधित मोठी आव्हाने आहेत, वाढता कट्टरतावाद, अतिरेकीपणा आणि दहशतवाद हेच या सर्वांचे मूळ आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणूनच भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. या मोहीमेद्वारे भारताने, दहशतवादापासून स्वतःचा बचाव करण्याचा आणि सीमेपलिकडून भविष्यात होणारे हल्ले रोखण्याचा आणि त्यांना प्रतिबंध घालण्याच्या आपल्या अधिकाराचा भारताने वापर केला, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यादरम्यान, धार्मिक अस्मितेचा आधार घेत पीडितांना गोळ्या घातल्या गेल्या. संयुक्त राष्ट्रसंघाने दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केलेल्या लष्कर-ए-तैयबा या संघटनेच्याच द रेसिस्टन्स फ्रंट या गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. पहलगाम हल्ल्याचे स्वरुप हे लष्कर-ए-तैयबाने भारतावर यापूर्वी केलेल्या दहशतवादी हल्ल्यांशी जुळणारे आहे अशी माहिती त्यांनी दिली. अशा दहशतवारी कृत्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर सारख्या मोहिमेतून दहशतवादाप्रति भारताची शून्य सहिष्णुता दिसून आली. ही मोहिम म्हणजे स्वतःचा बचाव करण्याचा भारताचा अधिकारच आहे. यापुढे दहशतवादाची केंद्रे सुरक्षित असणार नाही आणि त्यांना लक्ष्य करण्यात आता भारत मागेपुढे पाहणार नाही हा संदेश भारताने दिला असल्याचेही राजनाथ सिंह सांगितले.
संयुक्त घोषणापत्रावर स्वाक्षरी करण्यास भारताचा नकार
शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत भारताने गुरुवारी संयुक्त घोषणापत्रावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, त्यात २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख नव्हता, परंतु पाकिस्तानमधील घटनांचा उल्लेख होता.