
नवी दिल्ली : भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही तर राष्ट्राचा आत्मा आहे. भाषा जिवंत ठेवणे आणि त्यांना समृद्ध करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी गुरुवारी केले. दिल्लीतील अधिकृत भाषा विभागाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभात ते बोलत होते.
देशाच्या बाबतीत, भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही; ती राष्ट्राचा आत्मा आहे. भाषा जिवंत ठेवणे आणि त्यांना समृद्ध करणे महत्वाचे आहे. येत्या काळात आपण सर्व भारतीय भाषांसाठी आणि विशेषतः अधिकृत भाषेसाठी हे सर्व प्रयत्न केले पाहिजेत. हिंदी ही सर्व भारतीय भाषांची मैत्रीण असून हिंदी आणि भारतीय भाषा एकत्रितपणे राष्ट्राचा स्वाभिमान वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. कोणत्याही भाषेला विरोध नसावा; कोणत्याही परदेशी भाषेला विरोध नसावा, परंतु आपल्या भाषेचा गौरव करण्याचा आग्रहही असला पाहिजे. आपली भाषा बोलण्याचा आणि आपल्या भाषेत विचार करण्याचा आग्रह असला पाहिजे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.
संपूर्ण देशाला मानसिक गुलामगिरीतून मुक्त होण्याची गरज असल्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, जोपर्यंत एखादी व्यक्ती आपल्या भाषेवर अभिमान बाळगत नाही, आपल्या भाषेत स्वतःला व्यक्त करत नाही, तोपर्यंत आपण गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त होऊ शकत नाही. त्यासाठीच केंद्र सरकारने जेईई, नीट, सीयूईटी आता १३ भाषांमध्ये घेतल्या जात आहेत. यापूर्वी या परिक्षा केवळ इंग्रजी अथवा हिंदीत घेतल्या जात असत. त्यामुळे येत्या काळात भारतीय भाषांचे भविष्य उज्ज्वल आहे, असेही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नमूद केले.