मुंबई : आणीबाणीला ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दिल्ली विद्यापीठ परिसरात एक भव्य मशाल मोर्चा आयोजित केला होता. यावेळी १९७५ मध्ये लादलेल्या आणीबाणीतील अत्याचार आणि अमानवी आठवणींना उजाळा देण्यात आला. हा मोर्चा रामजस कॉलेजपासून सुरू होऊन क्रांती चौक येथे संपला.
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दि. २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी लागू केली. या काळात लोकशाही संस्था, मानवाधिकार आणि संविधानिक मूल्यांचे उघडपणे उल्लंघन केले गेले. युवक, विद्यार्थी, नेते आणि सामान्य नागरिकांवर दडपशाही लादण्यात आली. या हुकूमशाहीविरोधात तेव्हा अभाविपने आघाडीवर राहून लढा दिला होता. तेव्हापासून दरवर्षी २५ जून रोजी अभाविप हा दिवस "संविधान हत्या दिन" म्हणून पाळते आणि त्या क्रूर अत्याचारांची आठवण करतो.
या प्रसंगी अभाविपच्या राष्ट्रीय मंत्री सुश्री शिवांगी खरवाल यांनी सांगितले की, “आपत्काल हा केवळ असह्य अत्याचारांचा किंवा मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा एक भाग नाही, तर तो भारतीय लोकशाहीच्या आत्म्यावर केलेल्या पायउताराचा आणि भारताच्या जागतिक प्रतिमेवर उमटलेल्या डागांचा एक काळा अध्याय आहे. विद्यार्थी परिषदेने नेहमीच आपत्काळाचा विरोध केला. मशाल मोर्चा हाच त्याचाच एक भाग आहे, ज्यामधून अभाविप लोकशाहीच्या रक्षणाचा निर्धार पुन्हा अधोरेखित करतो.”
अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. वीरेंद्र सिंह सोलंकी यांनी सांगितले, “आपत्काल हे त्या २१ महिन्यांचे हुकूमशाहीचे पर्व होते, जे भारतीय प्रजासत्ताकावर सत्तेच्या गर्वातून लादले गेले होते, ज्या काळात भारताची लोकशाही श्वास घेत होती. त्या काळात बोलणे गुन्हा होता, पोस्टर्स लावल्याबद्दल 'त्या गुन्ह्यासाठी' अभाविपचे कार्यकर्ते तुरुंगात टाकले गेले, त्यांनी भूमिगत राहून जनजागृती केली आणि लोकशाहीचा दिवा विझू दिला नाही.
पुढे ते म्हणाले, "आज, जेव्हा आपण आणीबाणीच्या ५० व्या वर्षात उभे आहोत, तेव्हा हे लक्षात घेणे आवश्यक आहे की अभाविपचा संघर्ष केवळ सत्तेविरुद्ध नव्हता, तर तो भारताच्या आत्म्यासाठी, संविधानाच्या प्रतिष्ठेसाठी आणि युवकांच्या भविष्यासाठी होता. आजच्या तरुण पिढीने पुन्हा हा संकल्प करायला हवा की भारत कोणत्याही स्वरूपातील सत्तावाद (हुकूमशाही) स्वीकारणार नाही, आणि अभाविप नेहमीच लोकशाही, स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय हितासाठी अग्रभागी उभी राहील."
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक