
नवी दिल्ली : भारतीय लष्करास मंगळवारी अपाचे लढाऊ हेलिकॉप्टरची पहिली तुकडी मिळाली आहे. भारतीय लष्कराने ‘एक्स’वरून त्याची माहिती दिली असून यामुळे भारतीय लष्कराच्या क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ होईल, असे म्हटले आहे.
अपाचे हेलिकॉप्टरची ही पहिली तुकडी हिंडन एअरबेसवर दाखल झाली. याबाबत भारतीय लष्कराकडून जारी करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, भारतीय लष्करासाठी ऐतिहासिक क्षण आहे. लष्कराच्या एव्हिएशनसाठी पहिली ‘अपाचे’ हेलिकॉप्टरची तुकडी आज भारतात दाखल झाली. या अत्याधुनिक साधनांमुळे लष्कराची ताकद लक्षणीयरीत्या वाढेल.
यापूर्वी भारतीय हवाई दलाकडे आधीच २२ ‘अपाचे’ हेलिकॉप्टर्सचा ताफा आहे. हे हेलिकॉप्टर्स लडाख आणि पश्चिमेकडील सीमांवर तैनात करण्यात आले आहेत. आता लष्कराच्या ताफ्यातही त्यांची भर पडल्याने संरक्षण क्षमतांना बळकटी मिळणार आहे.
अपाचे हेलिकॉप्टरची वैशिष्ट्ये
· हेलिकॉप्टर विविध शस्त्रास्त्रे नेण्यास सक्षम आहे, ज्यात हेलफायर क्षेपणास्त्रे, ७० मिमी हायड्रा रॉकेट्स आणि एअर टू एअर स्टिंगर क्षेपणास्त्रे यांचा समावेश आहे.
· अपाचेमध्ये ३० मिमी चेनगन असून, १२०० राऊंड्ससह एरिया वेपन सब सिस्टिमचा भाग आहे.
· हेलिकॉप्टरमध्ये फायर कंट्रोल रडार असून, ते ३६० अंशांचे कव्हरेज देते आणि टार्गेट अॅक्विझिशन व नाईट व्हिजनसाठी नाकावर सेन्सर सूट बसवलेले आहे.
· एएच-६४ई ही अपाचेची सर्वात आधुनिक कॉन्फिगरेशन आहे व मल्टी-डोमेन ऑपरेशन्स युद्धासाठी सज्ज आहे.
· एएच-६४ई मध्ये विमानाच्या सेन्सर्स, सॉफ्टवेअर व शस्त्रांच्या कामगिरीत अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत.
· हे नेटवर्क-केंद्रित, पूर्णतः एकत्रित शस्त्रप्रणाली आहे जी अतिशय स्पर्धात्मक व गुंतागुंतीच्या युद्धभूमीवर वर्चस्व गाजवण्यासाठी डिझाइन केली आहे.
· जमिनीवरच्या दलांना आवश्यक असलेली पोहोच, हालचालक्षमता व कामगिरी देत हे हेलिकॉप्टर सामूहिक मोहिमांच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावते.
· ऑन-बोर्ड व ऑफ-बोर्ड सेन्सर्स, स्टँड-ऑफ लॉंग रेंज वेपन्स व अत्याधुनिक कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून एएच-६४ई हे एक प्रगत, लढाऊ हेलिकॉप्टर आहे.
अखेर मिग २१ लढाऊ विमाने निवृत्त होणार
मिग-२१ लढाऊ विमाने आता भारतात इतिहासजमा होणार आहेत. भारतातील उर्वरित मिग-२१ लढाऊ विमाने सप्टेंबर २०२५ मध्ये हवाई दलाकडून निवृत्त केली जातील, म्हणजेच ती जमिनीवर टाकली जातील. गेल्या अनेक दशकांपासून भारताच्या आकाशाचे रक्षण करण्यासाठी हवाई दलाचे मुख्य शस्त्र असलेले मिग-२१ आता स्वदेशी विकसित आणि निर्मित तेजस एमके१ए लढाऊ विमान वापरणार आहे. भारतीय हवाई दलाकडे सध्या ३६ मिग-२१ विमाने शिल्लक आहेत. मिग-२१ प्रथम १९६३ मध्ये चाचणी तत्वावर सेवेत आणण्यात आले. २००० च्या दशकाच्या मध्यापर्यंत हे रशियन बनावटीचे जेट हवाई दलाचा कणा राहिले होते.