नवी दिल्ली : बिहारमध्ये निवडणूक आयोगाकडून सध्या सुरू असलेल्या विशेष व्यापक पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेवर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मंगळवारी स्पष्ट केले की, भारतात मतदानाचा अधिकार फक्त भारतीय नागरिकांना आहे. त्यामुळे यादीतून घुसखोर आणि परप्रांतीयांचे नाव वगळण्यासाठी होणाऱ्या तपासणीवर विरोध करणे हेच चुकीचे असल्याची टीका त्यांनी केली.
संसद भवन परिसरात माध्यमांशी बोलताना रविशंकर प्रसाद म्हणाले, भारतीय संविधानानुसार केवळ या देशाचा नागरिक असलेल्या व्यक्तीलाच मतदानाचा अधिकार आहे. मग जर हे तपासले जात असेल की कोण रहिवासी आहे आणि कोण नाही, तर विरोधकांना त्यात अडचण का वाटते, असा सवाल त्यांनी विचारला. जो व्यक्ती एखाद्या मतदारसंघात सामान्यपणे राहत आहे, त्यालाच मतदानाचा हक्क आहे. त्यामुळे रहिवासी नसलेल्या व्यक्तींची नोंदणी का झाली आहे, हे तपासण्यात गैर काय; असेही ते म्हणाले.
बिहारमधील काही जिल्ह्यांत घुसखोरीच्या प्रमाणावर गंभीर चिंता व्यक्त करताना रविशंकर प्रसादम्हणाले, अररिया, पूर्णिया आणि किशनगंजसारख्या जिल्ह्यांमध्ये आधारकार्डचे वितरण लोकसंख्येपेक्षा जास्त म्हणजेच १२५ टक्क्यांपर्यंत झाले आहे. हेच दाखवते की मोठ्या प्रमाणावर बाहेरचे लोक येथे राहात आहेत. निवडणूक आयोगानेही हे मान्य केले आहे की, बहुतांश लोक बाहेरचे आहेत. भारत कोणतीही ‘धर्मशाळा’ नाही की कोणालाही यायचे आणि रहायचे आणि मग मतदान करायचे. जे नेते बांगलादेशी आणि घुसखोरांच्या नावावर राजकारण करतात, तेच आज घाबरलेले दिसत आहेत,” अशी जोरदार टीकाही त्यांनी केली.
सध्या बिहारमध्ये सुरू असलेल्या या विशेष व्यापक पुनरीक्षण मोहिमेमुळे निवडणूक यादीत फेरतपासणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी संसद परिसरात जोरदार निदर्शने करत निवडणूक आयोगावर टीका केली. विरोधकांचा आरोप आहे की, या मोहिमेद्वारे लोकांचे मतदानाचे अधिकार हिरावून घेतले जात आहेत. मात्र, रविशंकर प्रसाद यांनी हे आरोप फेटाळून लावत विरोधकांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.