नवी दिल्ली : भारताचे उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी दिलेला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी स्वीकारल्याची घोषणा राज्यसभेत करण्यात आली. दरम्यान, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सदिच्छा भेट घेतली.
धनखड यांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी सभेचे कामकाज पुढे चालवले. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत भारतीय संविधानाच्या कलम ६७(अ) अंतर्गत धनखड यांचा राजीनामा तात्काळ प्रभावाने स्वीकारल्याचे सांगण्यात आले.
राज्यसभेचे कामकाज ही घोषणा झाल्यानंतर दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून धनखड यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी लिहिले की, ‘जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपतीसह विविध जबाबदाऱ्यांद्वारे देशसेवेची अनेक संधी लाभल्या. त्यांना उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा देतो.’
धनखड यांनी राजीनाम्यासोबत राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात प्रकृती सुधारण्यासाठी आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे नमूद केले आहे. त्यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि सर्व संसद सदस्यांचे आभार मानले आहेत.