अखेर ब्लॅक बॉक्सचा डेटा मिळाला! एअर इंडिया विमान अपघाताच्या तपासाला मोठं यश

    26-Jun-2025   
Total Views |

नवी दिल्ली : (Ahmedabad Air India Plane Crash) दोन आठवड्यांपूर्वी एअर इंडियाच्या दुर्घटनाग्रस्त झालेल्या विमानाच्या अवशेषांमधून दुसऱ्या दिवशी ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आला होता. भीषण स्फोटामुळे या ब्लॅक बॉक्सचे काही प्रमाणात नुकसान झाल्यामुळे त्यातील माहिती मिळवणे आव्हानात्मक होते. मात्र, आता त्यातील माहिती यशस्वीरीत्या डाउनलोड करण्यात आल्याचे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

अहमदाबादमध्ये एअर इंडिया विमानाच्या ब्लॅक बॉक्समधून डेटा डाऊनलोड करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असल्याचे सरकारने गुरुवारी स्पष्ट केले आहे, असे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. "पुढील ब्लॅक बॉक्समधून क्रॅश प्रोटेक्शन मॉड्यूल (सीपीएम) सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले असून, २५ जून रोजी मेमरी मॉड्यूलमधील माहिती यशस्वीपणे मिळवण्यास सुरुवात केली आहे. त्याचा डेटा एएआयबी लॅबमध्ये डाउनलोड करण्यात आला असून सीव्हीआर आणि एफडीआर डेटाचे विश्लेषण सुरू आहे. अपघातापूर्वीच्या घटनांचा संपूर्ण क्रम पुन्हा समजून घेण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत. विश्लेषणातून हे निश्चित होईल की, अपघातामागे तांत्रिक बिघाड, पायलटची चूक की कोणते बाह्य कारण होते. याचा उद्देश हवाई सुरक्षा अधिक उत्तम करणे आणि भविष्यात अशा घटना टाळणे हा आहे", असे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.



या अपघाताच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या पथकाबाबत माहिती देताना नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने सांगितले की, "आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलनुसार स्थापन केलेल्या या पथकाचे नेतृत्व एअरक्राफ्ट ऑक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचे प्रमुख करत आहेत व या पथकात एक विमान औषध तज्ज्ञ, एक एटीसी अधिकारी आणि राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे."




अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\