विलेपार्लेत जैन समुदायाची तीव्र निदर्शने

पालिकेच्या कारवाईविरोधात हजारोंच्या संख्येत लोक एकवटले

    19-Apr-2025
Total Views | 36

Vile Parle Jain Community Protest

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Vile Parle Jain Community Protest)
विलेपार्ले येथे असलेले ३५ वर्षे जुने पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर बुधवारी मुंबई महापालिकेकडून पाडण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण जैन समाज संतप्त झाला आहे. मंदिर पाडण्याच्या निषेधार्थ शनिवार, दि. १९ एप्रिल रोजी सकाळी निषेध रॅली काढण्यात आली. या रॅलीत राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार पराग अळवणी आणि जैन समाजाचे संत सहभागी झाले होते. पालिकेच्या कारवाईमुळे जैन समाजात तीव्र संताप व्यक्त होत असून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

हे मंदिर कांबळीवाडीतील नेमिनाथ कोऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमध्ये स्थित होते. मंदिराचे विश्वस्त अनिल शाह यांच्या म्हणण्यानुसार, मंदिराची रचना १९६० च्या दशकातील असून पालिकेच्या परवानगीने त्याचे नूतनीकरणही करण्यात आले. अनिल शाह यांनी असा दावा केला की, एक सरकारी प्रस्ताव आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की अशा संरचना नियमित केल्या जाऊ शकतात. तुम्हाला फक्त बीएमसीकडे नियमितीकरणाचा प्रस्ताव द्यावा लागेल आणि आम्ही तसा प्रस्ताव सादर केला होता. मंदिर पाडण्याबाबत पालिकेने व्यवस्थापन समितीला नोटीस बजावली होती. याविरोधात जैन समाजाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असता, पालिकेने गुरुवारी होणारी कारवाई बुधवारीच केली. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानंतर पालिका प्रशासनाने कारवाई करायला हवी होती, असे जैन समाजाने म्हटले आहे.

मुंबई महापालिकेने न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहिली नाही, असे विश्वस्त अनिल शहा यांनी सांगितले. ते म्हणाले की, आम्ही हायकोर्टात अपील केल्याचे बीएमसीला माहीत होते, पण बीएमसी प्रशासनाने घाईगडबडीत मंदिर पाडले. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जैन समाजाकडून करण्यात येत आहे. मंदिर पाडताना काही धार्मिक पुस्तके आणि मंदिरातील वस्तूंचेही नुकसान झाल्याचा दावा अनिल शाह यांनी केला. स्थानिक हॉटेल व्यावसायिकाच्या सांगण्यावरून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

पुढे ते म्हणाले, आम्ही मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत थांबण्याची विनंती केली होती, मात्र त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले नाही. मंदिर पाडण्याच्या विरोधात जैन बांधवांनी अहिंसक आंदोलन केले. या आंदोलनापूर्वी जैन बांधवांनी ज्या मंदिरात ही कारवाई करण्यात आली तेथे आरती केली. याशिवाय जैन बांधवांनी प्रश्न विचारला आहे की हे मंदिर कोणाच्या आदेशावरून पाडण्यात आले?

धर्मावर झालेला हल्ला
न्यायालयात सुनावणी बाकी असनाताही पालिकेकडून कारवाई होणे, चूकीचे आहे. जोपर्यंत मंदिराची पुनर्स्थापना त्याठिकाणी होत नाही, तोपर्यंत समाजाचे आंदोलन सुरूच राहणार. असे कृत्य मुघलशाहीमध्ये सुद्धा झाले नसतील. मुंबई महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई व्हायलाच हवी. हा केवळ मंदिरावर नाही तर आमच्या श्रद्धा, संस्कृती आणि धर्मावर झालेला हल्ला आहे!
- मंगलप्रभात लोढा, कौशल्य विकास मंत्री


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121