
‘नाकापेक्षा मोती जड’ व्हायला लागला की, तो अलगद बाजूला काढावा लागतो, अन्यथा इजा होण्याची भीती असते. उद्धव ठाकरे ते कधी करणार आहेत, देव जाणो! भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेते करण्याचे गाजर काय दाखवले, ते इतके हवेत गेले की, विचारायची सोय नाही. विधिमंडळाचे कामकाज आपल्याइतके कोणालाच समजत नाही, याच अविर्भावात ते वावरताना दिसतात. कालचीच गोष्ट, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी गोवंडी ‘आयटीआय’च्या नामांतर सोहळ्यात केलेल्या भाषणाची चर्चा विधानसभेत झाली. त्यांच्या भाषणाविषयी मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी जाधव यांना करायची होती. हातवारे करीत, ‘आता दाखवतोच’ या अविर्भावात ते उठले खरे; पण त्यांनी स्वतःचीच फजिती करून घेतली. सुरुवातीला त्यांनी ‘ऑर्डर ऑफ डे’चा उल्लेख केला. पण, असा काही नियम नसल्याचे लक्षात येताच ते गांगरले. आता ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’ मांडावा की, ‘हरकतीचा मुद्दा’ असा त्यांचा गोंधळ उडाला. कसेबसे सावरत त्यांनी मुद्दा दामटवला खरा, पण त्यांचे पुरते हसे झाले. बरे, बाजूला बसलेले आदित्य ठाकरे इशारे करीत असताना, चूक कबूल करण्याची यांची मानसिकताच नाही.
‘तुझ्यापेक्षा कितीतरी पावसाळे अधिक पाहिलेत,’ असा अविर्भाव दाखवत भास्करशेठनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. आदित्यसह उबाठाच्या आमदारांनाही ही बाब खटकली. अनेकांनी त्याची तक्रार पक्षप्रमुखांकडे केली. विधानभवनाच्या तळमजल्यावरील अंबादास दानवेंच्या दालनात उद्धव ठाकरे बसले होतेच. तेथे भास्कर जाधव वगळून अन्य चेल्याचपाट्यांचा दरबार भरला. भास्करशेठ आदित्यला दाबण्याचा कसा प्रयत्न करतात, हे एकात चार घालून पक्षप्रमुखांना सांगण्यात आले. ‘मीच मोठा’ हे दाखवण्याच्या नादात भास्कर जाधव विरोधी पक्षाचा अर्धा वेळ वाया घालवला, असा सूर काहींनी आळवला. ‘यांना आवरले नाही, तर आदित्य ठाकरेंचे राजकारण झाकोळले जाईल,’ ‘आदित्यची मीडिया स्पेसदेखील ते व्यापतील. त्याचे दीर्घकालीन परिणाम आदित्यच्या करिअरवर होतील,’ अशी भीती वर्तवण्यात आली. त्यावर आता करावे काय? असा प्रतिप्रश्न उद्धव ठाकरेंनी केला. भास्करशेठ विरोधी पक्षनेते होणार नाहीत, याची काळजी घेण्याचा सल्ला एकाने दिला. उद्धवरावांनाही तो बहुदा पटला. त्यामुळे भास्करशेठच्या पदरी पुन्हा निराशाच येते का, ते पाहायचे!
आदित्य ठाकरेंची बॅनरबाजी
दुसर्याकडे बोट दाखवताना स्वतःकडे चार बोटे असतात, याचा विसर अनेकांना पडतो. उबाठा गटाचे युवराज आदित्य ठाकरे हेही त्यांपैकीच एक. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी गोवंडी ’आयटीआय’च्या नामांतर सोहळ्यात केलेल्या विधानाचा विपर्यास करून विधानसभेत चर्चा घडवण्यात आली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केल्यानंतरही आदित्य ठाकरेंनी पराचा कावळा करण्याचा प्रयत्न केला. पण, ते करण्याआधी आपण मराठी भाषेचा किती आणि कुठे-कुठे उद्धार केला, याचा जाणीवपूर्वक विसर त्यांना पडला. २०२४च्या विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघात पराभव समोर दिसत असल्यामुळे त्यांनी भाषिक अस्त्र बाहेर काढले. एकेकाळी मराठीच्या मुद्द्यावर लढणार्या बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाने चक्क गुजराती भाषेतील बॅनर संपूर्ण वरळीत लावले होते. ’केम छो वरळी’ असा मजकूर छापून गुजराती मतदारांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या फसवेगिरीला गुजराती भाषिक बळी पडले, त्यांनी आदित्य ठाकरेंना एकतर्फी मतदान केले; अन्यथा युवराजांचा पराभव अटळ होता.
बरे, भैय्याजी स्वतः म्हणाले, घाटकोपरचे आमदार राम कदम यांनीही त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे पटवून दिले. तरीही आदित्य ठाकरेंनी राजकारण थांबवले नाही. त्यानंतर उबाठाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी आदित्य ठाकरेंना बरे वाटावे म्हणून चक्क मराठी अस्मितेवर माध्यमांना मुलाखती देण्यास सुरुवात केली. बरे, मुलाखत मराठी अस्मितेवर आहे, म्हटल्यावर बाईंनी मराठीत बोलणे अपेक्षितच नाही का? पण, कसले काय? पहिल्या दोनच वाक्यांत त्यांचा मराठी बाणा ’शुद्ध हिंदी’त रुपांतरित झाला! असो. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका जिंकण्यासाठी तुम्ही बांगलादेशींच्या वसत्या वसवा, त्यांना मतदान ओळखपत्र बनवून द्या, मराठी फेरीवाल्यांना हाकलून लावा आणि विशिष्ट धर्मीयांसाठी जागा मोकळ्या करून द्या. मराठीच्या मुद्द्यावरून गळे काढत असताना, मराठी माणूस मुंबईबाहेर कोणी घालवला? गिरण्या बंद पाडून बिल्डर्सना मुंबईत कोणी आणले? कुठल्या गुजराती शेठसोबत ‘डिल्स’ झाल्या? यांचीही उत्तरे सर्वसामान्यांना द्या; अन्यथा मुंबईकर एक दिवस तुम्हालाच हद्दपार करेल!