इस्रायलची वाटचाल ‘ग्रेटर इस्रायल’कडे?

    06-Mar-2025
Total Views |

article on the concept of greater israel & its geopolitical implications
 
 
इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्या अरबी भाषिक समाजमाध्यमांच्या खात्यावरुन मागे ‘ग्रेटर इस्रायल’चा नकाशा पोस्ट केल्यानंतर अरबजगतात संतापाची लाट उसळली होती. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनीही गाझा पट्टी अमेरिकेच्या नियंत्रणाखाली आणण्यासंबंधी घोषणा केल्यानंतर, या चर्चांना पुनश्च उधाण आले. त्यानिमित्ताने ‘ग्रेटर इस्रायल’ची संकल्पना आणि भूराजकीय परिणाम यांचा केलेला हा ऊहापोह...
 
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या नुकत्याच झालेल्या अमेरिका भेटीदरम्यान त्यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदही झाली. त्या परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा पट्टी अमेरिकेच्या नियंत्रणाखाली आणण्याबद्दल घोषणाही केली, जी सर्वांसाठी धक्कादायक होती. गाझामधील उद्ध्वस्त इमारती बाजूला सारून तिथे ‘विशेष आर्थिक क्षेत्र’ विकसित करण्याबद्दल ट्रम्प यांनी घोषणा केली. पॅलेस्टाईनमधील रहिवाशांनी शेजारी देशात (इजिप्त, जॉर्डन, लेबेनॉन) निघून जावे, असेही त्यांनी सुचविले. दूरवरचा विचार करता, अमेरिका इस्रायलच्या विस्तारीकरणासाठी प्रयत्नरत असावी की काय, असे म्हणायला वाव आहे. खरेतर ब्रिटिश नियंत्रणाखालील पॅलेस्टाईनचे दोन तुकडे करताना इस्रायल आणि जॉर्डन या दोन देशांची निर्मिती झालेली होती. पॅलेस्टाईनमधील बहुतांश लोक हे एकतर इजिप्त अथवा सीरिया, जॉर्डनमधून आलेले अरबी लोक आहेत.
 
इस्रायलचा नकाशा बघितल्यास, एका चिंचोळ्या भूभागाच्या पट्टीवर हा संपूर्ण देश वसला आहे, असे दिसते. इस्रायल हा देश ज्या ठिकाणी स्थित आहे, तेथे तो वसविण्यामागे तत्कालीन ब्रिटिश सरकारचा हात होता, हे कोणी नाकारू शकणार नाही. आजूबाजूला असलेल्या अनेक इस्लामिक देशांमध्ये हा देश अगदी घट्ट पाय रोवून आज उभा आहे. अमेरिकन, ब्रिटिश सरकारच्या पाठिंब्यावर हा देश ज्यू धर्मीयांसाठी केवळ अस्तित्वातच आला नाही, तर या देशाला एक आंतरराष्ट्रीय ओळखही मिळाली. इस्रायलने स्वतःचा देश वसविण्यापूर्वी त्या भूभागात राहात असलेल्या पॅलेस्टिनी आणि इतर अनेक स्थानिक नागरिकांना या भूभागाची मोठी रक्कमही अदा केली होती, असेही सांगितले जाते. जगभर पसरलेले ज्यू धर्मीय या स्वस्थापित देशात स्थलांतरित झाले आणि त्यांनी मोठ्या कष्टाने या देशाची पुढील काळात उभारणी केली आणि त्याला प्रगतीपथावर नेले.
इस्रायलच्या निर्मितीमागे मध्य-पूर्वेतील अनेक इस्लामिक राष्ट्रांवर नियंत्रण ठेवण्याची अमेरिका आणि इतर युरोपियन देशांची योजना होती, असे अनेक वर्षे बोलले जाते. पण, या योजनेच्या पलीकडे जाऊन इस्रायलच्या भूभागाच्या सीमा वाढवत नेत, मध्य-पूर्वेत ‘ग्रेटर इस्रायल’ बनविण्याचीही योजना होतीच होती. ‘ग्रेटर इस्रायल’ बनवण्याबद्दल कोणी जाहीरपणे उच्चार केला नसला, तरी त्या दिशेने हालचाली होत असाव्यात, असे दिसते.
 
इस्रायलच्या भोवताली वसलेले सीरिया, लेबेनॉन हे देश गेल्या काही वर्षांत नुसते कंगालच झालेले नाही, तर ते नेतृत्वहीनही झालेले आपण बघतो. सीरियामधून नुकतेच तेथील अनेक वर्षांचे सर्वेसर्वा बशर अल असद यांनी पळ काढत रशियामध्ये राजाश्रय घेतला. त्यानंतरच्या काळात सीरियाच्या भूभागाचे अनेक देशांकडून लचके तोडण्यात आले. त्यामध्ये ‘गोलान हाईट्स’ या सीरिया आणि इस्रायलमधील उंच डोंगराळ भागावर इस्रायलने ताबा घेतल्याचे जगाने बघितले. त्या ‘गोलान हाईट्स’च्या पुढे जाऊन सीरियाचा मोठा सपाट प्रदेशही इस्रायलने स्वतःच्या ताब्यात घेतल्याचे दिसले. तुर्कीने तर कुर्द लोकांची वस्ती असणार्‍या सीरिया आणि इराकच्या सीमेवरील भूभागावर आक्रमण केले होते.
 
गोलान टेकड्यांवर ताबा मिळवल्यावर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गोलानमधील लोकसंख्या (इस्रायलचे रहिवासी) वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा केली होती. ‘ड्रूझ’ वंशीयांची लोकसंख्या असलेल्या दक्षिण सीरियातील सहा गावांनी इस्रायलमध्ये विलीन होण्याचा इरादा व्यक्त केला असून, सीरियाच्या गोलान भागातूनच इस्रायलला समर्थन मिळत असल्याचे दिसते. इस्रायलच्या सरकारने सीरियातील माऊंट हेरमानचा ताबा घेतला होता. इस्रायलचे लष्कर सीरियाची राजधानी दमास्कसपासून अवघ्या २० किमी अंतरावर पोहोचले होते. सीरियातील अस्थैर्याचा फायदा घेऊन इस्रायल आपल्या सीमा विस्तारात असल्याचे आरोप सुरू झाले होते. सीरियातील बशर अल असद यांची राजवट उलथविणारा ‘हयात तहरीर अल शाम’चा प्रमुख अबू मोहम्मद अल गोलानी याने इस्रायलच्या सीरियावरील हल्ल्याबद्दल टीकाही केली होती. पण, त्याबरोबरच त्याने इस्रायलबरोबर संघर्ष करायची इच्छा नसल्याचेही स्पष्ट केले होते.
 
नुकतेच उपग्रहांमार्फत उपलब्ध झालेल्या छायाचित्रांनुसार, इस्रायल आणि सीरिया यामधील ‘निशस्त्रीकरण क्षेत्र’ (डीमिलिटराइज्ड झोन) म्हणून जाहीर झालेल्या भूभागातच इस्रायलने त्यांचा स्वतःचा लष्करी तळ नव्याने उभा केला असल्याचे सांगण्यात येते. सीरियामध्ये नुकतेच सत्तेवर आलेल्या काळजीवाहू नेत्यांकडे इस्रायलशी लढण्याची क्षमता नसल्याने त्यांनी इस्रायलला दिलेल्या इशार्‍यांना किंमत नाही. जेरुसलेममध्ये अमेरिकेने स्वतःचा राजदूतावास यापूर्वीच उघडल्याने अमेरिका आणि इस्रायलची राजधानी म्हणून जेरुसलेमला मान्यता असल्याचे स्पष्ट झाले होते, तर दुसरीकडे लेबेनॉनमध्ये लपून बसलेल्या ‘हिजबुल्ला’ संघटनेच्या नसरुल्लाहचा खात्मा करून, इस्रायलने लेबेनॉनमध्येही स्वतःचा चंचूप्रवेश सुकर केला आहे. इस्रायलचे लष्कर यापूर्वीच दक्षिण लेबेनॉनमध्ये पोहोचलेले आहे. त्यामुळे लेबेनॉनच्या भूमीवर इस्रायलचे पाऊल यापूर्वीच पडलेले आहे. आता येमेनमधील ‘हौथी’ बंडखोरांचा पुरेपूर बंदोबस्त अमेरिका आणि इस्रायलकडून करण्यात येईल, असे दिसते. इराण नियंत्रित ‘हिजबुल्ला’, ‘हमास’, ‘हौथी’ यांचा पूर्ण नायनाट झालेला येत्या काळात दिसू शकतो.
 
‘हिजबुल्ला’ संघटनेच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे इराणच्या आधारावर पोसलेल्या ‘हिजबुल्ला’चे अस्तित्व संपत चालले आहे, असे म्हणता येईल. आता यापुढील काळात इराण हा अमेरिका आणि इस्रायलच्या निशाण्यावर असेल, हे वेगळे सांगायला नको. इराणमध्ये तर येत्या काळात कधी आणि कोणत्या क्षणी सत्तापालट होईल, हे सांगता येणे शक्य नसले, तरी सत्तापालट होईलच, अशीच दाट शक्यता वर्तविली जात आहे. इस्रायलच्या दक्षिणेकडे असलेल्या जॉर्डनमध्ये तेथील सत्ताधीश किंग अब्दुल्ला हे मोहम्मद पैगंबरांच्या वंशातील असल्याचे सांगतात. हे वंशज मूळ सौदी अरेबियातून जॉर्डनमध्ये आल्याचे सांगतात. बाकी जॉर्डनची उर्वरित जनता ही मूळ पॅलेस्टिनीच आहे.इस्रायलने संपूर्ण वेस्ट बँकवर (जॉर्डन नदीकिनार्‍यापर्यंत) ताबा सांगितला आहे. पॅलेस्टाईन, गाझा इथंपासून ते इस्रायलच्या सीमा या इराक ते सौदी अरेबियापर्यंत पुढील काळात विस्तारत जाताना दिसू शकतात. बायबलमध्ये ज्युईश भूभाग (इस्रायल) हा युफ्रेटीस नदीपासून नाईल नदीपर्यंत पसरलेला भूभाग हा इस्रायलच्या अखत्यारीत येतो, असे लिहिले असल्याचे सांगतात. नाईल नदी इजिप्तमधूनही वाहत जाते.
 
इस्रायलचे सध्याचे पंतप्रधान असलेले बेंजामिन नेतान्याहू हे ज्या लिकुड पक्षाचे प्रतिनिधीत्व करतात, त्या पक्षाचीही या प्रकारची ‘ग्रेटर इस्रायल’ची मध्यवर्ती कल्पना असावी, असे मानण्यास जागा आहे. अगदी अलीकडेच इस्रायलचे उजव्या विचारसरणीचे अर्थमंत्री बेझालेल स्मोत्रीच यांनी सीरियातील दमास्कस ही इस्रायलचाच भूभाग असल्याचे म्हटले होते. इस्रायलच्या सैनिकांचे लेबेनॉनमध्ये तैनात असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेशी चकमक उडाली होती. पुढील काळात इस्रायलच्या भूभागाच्या सीमा कशा प्रकारे विस्तारत जातात, हे बघणे रंजक ठरणार आहे. हे घडण्यापूर्वी या प्रदेशातील राजकीय पटलावर कोणत्या राजकीय घटना उलगडत जातात, हे बघणे औत्सुक्यपूर्ण असेल, हे निश्चित. इस्रायलची ही ‘ग्रेटर इस्रायल’ची योजना ही दीर्घ पल्ल्याची योजना असली, तरी त्या दिशेने त्याची सामरिक पावले पडत जाताना दिसू शकतात.
 
 
 
 
सनत्कुमार कोल्हटकर