बोरिवली राष्ट्रीय उद्यानाची 'आरे'मध्येच पुनर्वसन वसाहत

    11-Mar-2025
Total Views |
sgnp resettlement in aarey


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमणधारक आणि आदिवासींचे पुनवर्सन हे आरे दुग्ध वसाहत आणि इतरत्र अन्य ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी मंगळवार दि. ११ मार्च रोजी विधानपरिषदेत बोलताना दिली (sgnp resettlement in aarey). दुसऱ्या टप्प्यातील पुनर्वसन हे म्हाडाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले (sgnp resettlement in aarey). मुंबई उच्च न्यायालयाने जानेवारी महिन्यात राष्ट्रीय उद्यानाच्या अतिक्रमणाबाबत राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते. (sgnp resettlement in aarey)
 
 
राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमणाच्या समस्येबाबत मंगळवारी विधानपरिषदेच्या सभागृहात लक्षवेधी मांडण्यात आली. त्याला उत्तर देताना वनमंत्री नाईक यांनी सांगितले की, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील २५ हजारपेक्षा जास्त अतिक्रमकांचे लवकरच संपूर्ण पुनर्वसन करण्यात येईल. पहिल्या टप्प्यातील ११ हजार ३५९ पैकी फक्त २९९ सदनिकांचे वाटप शिल्लक आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील पुनर्वसन म्हाडाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. काही अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन हे गोरेगावच्या आरे दुग्ध वसाहतीमध्ये करण्यात येणार आहे. याविषयी बोलताना नाईक म्हणाले की, "आरे काॅलनीच्या परिसरामध्ये ९० एकर जागा आहे. त्यापलीकडे ३० एकर जागा आहे. या जागेवर प्राधान्याने आदिवासींचे पुनर्वसन करण्यात येईल. कारण, हे आदिवासी राष्ट्रीय उद्यानात काम करतात. म्हणून त्यांना आरे काॅलनीच्या लगत पुनर्वसन करण्यात येईल. उर्वरित लोकांनी राहिलेल्या जागेत आणि इतर जागेत म्हाडाच्या माध्यमातून पुनर्वसित करण्यात येईल."