खगोलशास्त्र म्हटले की, हा विषय जरा सर्वांना किचकटच वाटतो. पण लहान वयातच खगोलशास्त्राशी गट्टी जमलेल्या अर्चित मंदार गोखले यांच्याविषयी...
प्रत्येक मनुष्याला जीवनाच्या ठराविक चक्रातून मार्गक्रमण करावेच लागते. म्हणजे जन्म मग शिक्षण त्यानंतर चरितार्थाचे साधन म्हणून नोकरीधंदा. हेच करत असतानाही, प्रत्येकजण आपापले छंद जोपासत असतो. हे छंद म्हणजेच त्याची ओळख असते. त्यातून त्या मनुष्याला फक्त आनंदाची प्राप्ती होते. एक असा आनंद, ज्याला आपण परमानंद म्हणून शकतो. आजकाल खूप तरुण-तरुणी नोकरीधंदा सांभाळून, अनेक छंद जोपासताना दिसतात.
फक्त पोट भरणे हीच, माणसाची एकमेव गरज असू शकत नाही. त्याला बौद्धिक, भावनिक, सामाजिक गरजाही असतात. अशीच संगीताची पार्श्वभूमी असलेल्या घरात अर्चितचा जन्म झाला. आई अमिता या शास्त्रीय गायिका, तर वडील मंदार ‘आयटी’मध्ये कार्यरत. घरात सतत आईच्या शिष्यांचा राबता असल्याने, संगीतयज्ञ अहोरात्र सुरूच असे. अर्चितचे वडील आपले करिअर सांभाळून, शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी ‘अंतर्नाद’ नावाची शास्त्रीय संगीताची संस्था चालवतात.
त्यामुळे शालेय शिक्षणापलीकडे शिकण्यासारखे खूप काही असते, हे अर्चितला लवकरच उमजले. त्यामुळे फक्त परीक्षेतील गुणांच्या मागे न लागता शिक्षणातले मर्म जाणल्याने, त्याचा शैक्षणिक प्रवास सुखकर झाला. याच संस्कारक्षम वयामध्ये अर्चितची खगोलशास्त्राशी ओळख झाली. अगदी लहानपणी म्हणजे, वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षीच या अद्भुत दुनियेने, अर्चितच्या बालमनाला भुरळ घातली. मग त्याविषयी मिळेल ते वाचन करणे, इंटरनेटवर माहिती शोधून काढणे, खगोलशास्त्राच्या व्याख्यानांची ध्वनीफिती ऐकणे, व्याख्याने प्रत्यक्ष जाऊन ऐकणे हा त्याचा शिरस्ता झाला.
आपल्या आवडीला योग्य दिशा मिळावी, म्हणून अर्चित ’आकाशमित्र मंडळ, कल्याण’ या नामांकित खगोलअभ्यासक संस्थेत जाऊ लागला. तिथे त्याला, खगोलशास्त्राची खरी शास्त्रीय ओळख झाली, भरपूर ज्ञान मिळाले. आपल्याला मिळालेली अद्भुत माहिती आपल्या मित्रांना सांगावी, या एकमेव उद्देशाने दहावी इयत्तेत असतानाच अर्चितने खगोलशास्त्र या विषयावर पहिले पुस्तक लिहिले. तसेच, त्याने खगोलशास्त्रावरील दुसरे पुस्तक वयाच्या 21व्या वर्षी लिहिले आणि 2022 मध्ये ते प्रकाशितही झाले. खगोलशास्त्रावर असलेले प्रेम आणि आपल्याकडे असलेले त्याचे ज्ञान सगळ्यांना वाटून द्यावे, ही तळमळ त्यामागे बहुदा कारणीभूत असावी.
खगोलशास्त्रात असलेल्या संकल्पना, त्यात नवनवीन लागत असलेले शोध, अंतराळ मोहिमा हे लोकांना समजेल असे सोपे करून सांगणे, लिहिणे आपल्याला जमते हे लक्षात आल्यावर, अर्चितला महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांहून खगोलशास्त्रावर व्याख्यानासाठी बोलावणे येऊ लागले. तसेच बड्या वृत्तपत्रांसह, ‘झी दिशा’, साप्ताहिक ‘विवेक’, ‘खगोलविश्व’ मासिक, ‘कान्हेरी’ मासिक, ‘मैत्री’ हे ऑनलाईन मासिक अशा विविध माध्यमांतून, त्याचे आजवर 90च्या वर लेख आणि 35च्या वर व्याख्याने झाली आहेत. एकीकडे त्याचा चार्टर्ड अकाऊंटन्सीचा अभ्यासदेखील सुरू आहे. जगद्विख्यात ढएऊु या कार्यक्रमात, तसेच प्रसिद्ध अशा ‘वसंत व्याख्यानमाले’तदेखील, त्याचे व्याख्यान झाले आहे.
शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच खुल्या वर्गासाठी आयोजित केलेल्या खगोलशास्त्रावरील कार्यशाळांमध्ये, अर्चितने अनेकांना मार्गदर्शन केले आहे. तसेच, अनेक आकाशदर्शन कार्यक्रम राबवले आहेत. ‘आकाशमित्र मंडळा’तर्फे 2021 मध्ये, ‘अखिल भारतीय खगोलशास्त्र ऑनलाईन प्रेझेंटेशन स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. त्याचा मुख्य आयोजक म्हणून, अर्चितने कार्यभार सांभाळला. यामार्फत देशभरातील अनेक तरुण विद्यार्थ्यांपर्यंत खगोलशास्त्र पोहोचवले. मुळात असलेली ट्रेकिंगची आवड आणि निर्जन, डोंगराळ भागांत असलेले प्रकाशाचे कमी प्रदूषण, यामुळे डोंगरात प्रत्यक्ष निरभ्र आकाशाखाली अर्चितने अनेकांना, दुर्बिणीतून आकाशदर्शन घडवले आहे.
अर्चितने अशा अनेक आकाशदर्शन ट्रेक्सचे नेतृत्व केले आहे. जगप्रसिद्ध ‘जर्नल ऑफ अॅस्ट्रोनॉमी अॅण्ड अॅस्ट्रोफिजिक्स’ यामध्ये प्रसिद्ध झालेल्या खगोलशास्त्रावरील शोधनिबंधामधे, ‘आकाशमित्र मंडळ’मधल्या काही ज्येष्ठ अभ्यासकांबरोबर अर्चितचा सहलेखक म्हणून सहभाग आहे. अर्चितने सर्वसामान्यांपर्यंत खगोलशास्त्र सोप्या पद्धतीने म्हणजे अगदी दैनंदिन जीवनातील गोष्टी म्हणजेच टीशर्ट, फोन कव्हर्स, मग्ज यामार्फत पोहोचावे, म्हणून ‘अॅस्ट्रोव्होग’ नावाचा उपक्रम सुरू केला. त्याचबरोबर खगोलशास्त्र सोप्या भाषेत समजावणार्या अनेक कविता, त्याने लिहिल्या आहेत. 2024 मध्ये साजर्या झालेल्या पहिल्या ‘राष्ट्रीय अंतराळ विज्ञान दिवस’ या उपक्रमातील विविध कार्यक्रमांमध्ये, अर्चितचा मुख्य आयोजक, तसेच प्रमुख वक्ता म्हणून सहभाग होता. तसेच खगोलीय वस्तूंची छायाचित्र घेण्याचा, म्हणजेच अॅस्ट्रोफोटोग्राफीचादेखील अर्चितला छंद आहे. त्याने काढलेली अनेक छायाचित्रे, माध्यमांमध्ये प्रकाशित झाली आहेत.
एखाद्या विषयातली सखोल माहिती, विद्या म्हणजेच ते शास्त्र लिहिण्याची आणि सांगण्याची कला याचा अनोखा संगम अर्चितमध्ये असल्याने, ‘सायन्स कम्युनिकेटर’ म्हणून त्याला मान्यता मिळत आहे. त्याच्या आतापर्यंतच्या प्रवासात कुटुंबीय, गुरूजन आणि मित्रमंडळी यांचे अर्चितला, मोलाचे सहकार्य लाभले आहे. अर्चितने वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी संपादन केलेले हे यश अनेक तरुणांसाठी आदर्श ठरेल, यात शंका नाही. खगोल अभ्यासक असलेल्या अर्चितच्या पुढील वाटचालीस, दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा.