राष्ट्र सेविका समितिचा प्रवेश अभ्यास वर्ग ठाण्यात संपन्न
28-May-2025
Total Views | 7
मुंबई : राष्ट्र सेविका समितिचा प्रवेश अभ्यास वर्ग ठाणे पश्चिम येथे नुकताच संपन्न झाला. भारतीय संस्कार शिक्षण समितिच्या शाळेत संघटनेच्या कोकण प्रांतातर्फे १३ ते २८ मे दरम्यान वर्ग भरवण्यात आला होता. वर्गात शारीरिक खेळ, व्यायाम, बौध्दिक, चर्चा, वेगवेगळ्या कार्यशाळा तसेच समृद्ध भारतीय संस्कृतीचा मागोवा घेण्यात आला.
दरवर्षी होणारे अभ्यास वर्ग हा समिति कार्याचा एक भाग आहे. स्वतःचा आणि संघटनेचा विकास करत देशासाठी समर्पित कार्य करण्यास सज्ज सेविका संघटनेमार्फत तयार होत आहेत. यंदा तरुणी व गृहीणींकरिता स्वतंत्र वर्गव्यवस्था करण्यात आली होती. एकूण ३५ मुली आणि २० गृहिणी अशा एकूण ५५ जणींनी हा वर्ग यशस्वीरित्या पूर्ण केला. अनुशासन व सांघिक कृतीचा अवलंब करून सर्वांगीण प्रगतीसाठी, समाज हितासाठी, देशाच्या उन्नतीचे ध्येय ठेवून अभ्यास वर्ग पार पडला.
वर्गाच्या समारोप कार्यक्रमाला भारतीय विमानपत्तन प्राधिकरणच्या (Airports Authority of India) संचालिका ऍड. माधवी नाईक प्रमुख अतिथी म्हणून लाभल्या. यावेळी एकूण उपस्थिती १६० होती. 'राष्ट्र सेविका समिति' हे विश्वातील सर्वात मोठे महिला संघटन असून गेली ८९ वर्षे राष्ट्रसेवेत कार्यरत आहे. महिलांना 'सर्वार्थाने समर्थ बनविणे, सुसंस्कारित पिढी घडवणे' या कार्याबरोबरच समितिच्या माध्यमातून देशभरात हजाराहून अधिक सेवाकार्ये चालतात.