
सध्या दिल्लीत दुर्मीळ दिसणारे विरोधी पक्षनेते राहुल गांधी अध्येमध्ये दिल्ली विधानसभेचा प्रचार करताना दिसू लागले आहेत. मुख्य लढतीमध्ये आपण नसल्याचे त्यांना ज्ञात असल्यामुळे जिंकण्याचा विश्वास तर त्यांनी कधीच गमावलेला दिसतो. आता केवळ लोकलज्जेस्तव ते सध्या तुरळक प्रचार करत आहेत. कोणत्याही महिलेवर बलात्कार झाल्यास ती घटना निषेधार्हच व दोषींवर कठोर कारवाई व्हावी, ही जनमानसाची भावना. मात्र, यात राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पक्षपात करतात. हाथरसला घडलेली घटनाही तितकीच वाईट आणि निषेधार्ह होती. मात्र, लागलीच पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन योगी आणि मोदी सरकारवर दुगाण्या झाडून गोंधळ माजविण्याचा प्रयत्न दोघा बहीण-भावांकडून झाला. आता उत्तर प्रदेशच्या सीतापूरचे काँग्रेस खासदार राकेश राठोड यांना पोलिसांनी नुकतीच अटक केली. कारण काय, तर एका महिलेने राठोड यांच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली होती. गुन्हा दाखल होताच राठोड यांनी जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली. मात्र, त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. ‘सपा’ने दोनदा तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी जून 2023 मध्ये काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आणि निवडणूक जिंकत खासदार झाले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राठोड यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून काँग्रेसच्याच संजय दीक्षित यांच्यावर जातीयवादाचा आरोप केला होता. “काँग्रेसच्या ‘वॉर रूम’मध्ये दीक्षित यांनी मला अपमानित केले,” असे राठोड म्हणाले होते. यानंतर ‘मोहब्बत की दुकान’ उघडणार्या काँग्रेसवर टीकेची झोड उठली. काँग्रेसच्या खासदारावर असे गंभीर आरोप झाल्यानंतर आणि त्यात अटक झाल्यानंतर आता कुणी नैतिकच्या गप्पा मारत नाही. राहुल गांधी आता सीतापूरला पीडितेच्या घरी जाणार नाहीत, खा. प्रियांका गांधीदेखील पीडितेच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबीयांचे सांत्वन करणार नाहीत. कार्यकर्त्यांची फौज घेऊन रस्तेही अडवणार नाही. कारण, आता अटकेत असलेला आरोपी काँग्रेसचा चक्क खासदार आहे. एकूणच काय तर, बहीण-भावाची दुटप्पी भूमिका यानिमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेस आता या खासदारावर कोणती कारवाई करते, ते पाहावे लागेल.
पश्चिम बंगालच्या आर. जी. कार महाविद्यालयातील विद्यार्थिनीवरील अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता. त्यातच हिंदूंची गळचेपी होत असलेल्या बंगालमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही आता हाताबाहेर चालला आहे. आताही पश्चिम बंगाल म्हणजे हिंदू देवदेवतांची विटंबना, जातीय दंगली, हिंदूंवर अत्याचार, बलात्कार अशाच घटना पाहायला आणि ऐकायला मिळतात. त्यामुळे बंगालमध्ये सत्ता सांभाळणार्या ममतांनी डोळ्यांना पट्टी बांधली की काय, असा सवाल निर्माण होतो.
आताही राजधानी कोलकातामध्ये जोगेश चंद्र चौधरी लॉ महाविद्यालयात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना सरस्वतीमातेचे पूजन करण्यासाठी विरोध झाल्याची घटना समोर आली आहे. विरोध करणारा तृणमूल काँग्रेसचा नेता असून, त्याचे नाव मोहम्मद शब्बीर अली. या अलीने त्याही पुढे जाऊन शासकीय महाविद्यालयामध्ये “विद्यार्थ्यांनी पूजा करण्याचे धाडस केल्यास बलात्कार करुन खून करेन,” असेदेखील धमकावले असून याप्रकरणी आता चारूमाला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याच नव्हे, तर पश्चिम बंगालमधील अनेक महाविद्यालयांच्या आवारात तृणमूल काँग्रेसच्या मवाल्यांचा गोंधळ असाच सुरू असतो. त्यांच्याकडून महाविद्यालयामध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जाते. एकप्रकारे तृणमूल काँग्रेसच्या गुडांचा दरारा तरुणांमध्ये निर्माण केला जातो, जेणेकरुन हे विद्यार्थी सरकारविरोधी भूमिका मांडणार नाही. पण, आर. जी. कार प्रकरणानंतर विद्यार्थ्यांचा आवाज काय असतो आणि त्याचे काय परिणाम होतात, याची ममतादीदींनाही कल्पना आली आहेच. एवढेच नाही तर संदेशखाली प्रकरणातही तृणमूल काँग्रेसच्या गुंडांची दहशत समोर आली होती. त्यामुळे एक महिला मुख्यमंत्री असूनसुद्धा बंगालमधील महिला सुरक्षा, महिलांचे न्याय आणि अधिकारांना संरक्षित करण्यात ममतादीदी सपशेल अपयशी ठरल्या आहेत. तृणमूल काँग्रेसची गावापासून ते गल्लीपर्यंत दहशत बसावी, म्हणून अशा गुुंडांशी दीदींनी गट्टी केली आणि आज त्यांचे हेच पाळीव गुंड समाजविघातक ठरताना दिसतात. पण, म्हणतात ना, ‘चित भी मेरी पट भी मेरी, अंटा मेरे बाप का...’ तसेच तृणमूलच्या या गुंडांचेही - ‘तेरी दौलत भी मेरी, तेरी औरत भी मेरी, राज मेरे दीदी का!!!’