नाट्यगृहांमध्ये आता ‘मोठ्या पडद्या’चा प्रयोग

Total Views |
Theaters

नाट्यगृहांमध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करता येतील का, याबाबत विचार करावा, अशा सूचना नुकत्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ हा चित्रपटही पुण्यातील नाट्यगृहात दाखवण्याचा एक आगळावेगळा प्रयोग पार पडला. त्यानिमित्ताने नाट्यगृहांमध्ये ‘मोठा पडदा’ उघडण्याच्या चर्चेविषयी नाट्य आणि सिनेसृष्टीतील जाणकारांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा दै. ‘मुंबई तरुण भारत’ने केलेला हा प्रयत्न...

साधारण एका वर्षभरात १०० पेक्षा अधिक मराठी चित्रपट प्रदर्शित होतात. पण, या मराठी चित्रपटांना चित्रपटगृहांसाठी हिंदी चित्रपटांसोबत अलीकडे दाक्षिणात्य आणि हॉलिवूडपटांचाही सामना करावा लागतो. म्हणूनच विविध भाषांतील चित्रपटांच्या शर्यतीत गेल्या काही काळात मराठी चित्रपट काहीसे मागे पडलेले दिसतात. कारण, १०० किंवा ७० चित्रपट जर एका वर्षात प्रदर्शित होत असतील, तर त्यांपैकी अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच चित्रपट ‘सुपरहिट’ ठरतात आणि बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करतात. मात्र, मुंबई आणि महाराष्ट्रातील प्रेक्षकांनीच मराठी चित्रपटांकडे पाठ फिरवली, तर मराठी चित्रपटांचे भवितव्य धोक्यात आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आज वेगवेगळ्या आशयांचे चित्रपट तयार होत असतात. मात्र, प्रेक्षकांचा त्या कलाकृतींना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे मराठी चित्रपटांनी त्यांचे अस्तित्व आणि महत्त्व अधोरेखित करण्याची पुन्हा गरज निर्माण झाली आहे.

मराठी चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा, यासाठी काही दिवसांपूर्वी सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांची प्रमुख भूमिका असणारा ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ हा चित्रपट पुण्यातील नाट्यगृहात दाखवण्याचा एक आगळावेगळा प्रयोग करण्यात आला आणि विशेष म्हणजे, या प्रयोगाला प्रेक्षकांनीही तुफान प्रतिसाद दिला असून, भविष्यात नाट्यगृहांमध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याच्या दृष्टीने सकारात्मकता दर्शवित राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अनुकूलता दर्शविली आहे. मराठी चित्रपट नाट्यगृहांमध्ये प्रदर्शित करण्यासाठी उपाययोजना करण्यासंबंधीच्या पाठपुराव्याचे आदेशदेखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात मराठी चित्रपट ज्या नाट्यगृहांमध्ये नाटकांचे प्रयोग होत नाहीत, तेथे प्रदर्शित केले जातील, यासाठी हालचाली नक्कीच सुरू आहेत.

एकूणच काय, तर मनोरंजनावर पोटपाणी असलेले कलाकार आणि अशा कलाकृतींचा आस्वाद घेणारे रसिकप्रेक्षक यांनी एकत्रित येऊन मराठी चित्रपट जगवण्याची आज नितांत गरज आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात मराठी चित्रपटांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण, मुळातच चित्रपटसृष्टीचा पाया दादासाहेब फाळकेंच्या रुपात मराठी माणसाने रोवला असल्यामुळे, मराठी चित्रपटांचे अस्तित्व टिकवून ठेवणे, ही सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे चित्रपटगृहांची संख्या किंवा मराठी चित्रपटांना न मिळणारे ‘प्राईम टाईम शो’ यावर मात करायची असल्यास मराठी नाट्यगृहांचा आधार घेत मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे, हा रामबाण उपाय सिद्ध होऊ शकतो. तसेच, केवळ मराठी चित्रपटांसाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा एकपडदा चित्रपटगृहे सुरू झाल्यास, मराठी चित्रपटांना शो किंवा थिएटर मिळत नसल्याच्या तक्रारीदेखील कमी होतील, हे नक्की!

नाट्यगृहांमध्ये केवळ मनोरंजनाचेच कार्यक्रम व्हावे

मराठी नाटकांकडे सध्या प्रेक्षकांचे विशेष लक्ष आहे. मराठी नाटक आणि चित्रपटांचा मुळात प्रेक्षकवर्ग फार निराळा आहे. पण, त्या प्रेक्षकवर्गात एक समान धागा आहे, तो म्हणजे, उत्तम कथानक असलेली संहिता परिपूर्णपणे प्रेक्षकांसमोर सादर केली की, त्यावर प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देतात. त्यामुळे मराठी चित्रपटांकडे पुन्हा एकदा प्रेक्षक वळवण्याची गरज पाहता, महाराष्ट्रभरातील नाट्यगृहांमध्ये नाटकांचे प्रयोग ज्यावेळी नसतील, तेव्हा तिथे मराठी चित्रपट दाखवल्यास फायदाच होईल. पुण्यात नऊ नाट्यगृहे आहेत, ज्यांपैकी तीन नाट्यगृहांमध्ये नाटकाचे प्रयोग होतात आणि सहा नाट्यगृहांमध्ये प्रयोग होत नाहीत. त्यामुळे एकपडदा चित्रपटगृहांची समस्या एकीकडे सोडवत असताना, महाराष्ट्रातील बंद पडलेल्या किंवा जिथे नाट्यप्रयोग होत नाहीत, अशा जागी मराठी चित्रपट दाखवले गेले पाहिजे. शिवाय, नाट्यगृहांमध्ये केवळ मनोरंजनाचेच कार्यक्रम व्हावे, अशी विनंती आहे. त्यामुळे नक्कीच नाट्यगृहात चित्रपट प्रदर्शनाचा सरकारचा नवा उपक्रम यशस्वी झाला पाहिजे आणि त्यात कलाकार म्हणून आमचा सहभाग नक्कीच असेल.

प्रशांत दामले, अभिनेते, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद

महाराष्ट्रात केवळ ५० नाट्यगृहे!

सध्या महाराष्ट्रात विविध महानगरपालिका आणि सरकारची अशी मिळून ५०च्या जवळपास नाट्यगृहे असून, त्यांपैकी दहा नाट्यगृहे सुस्थितीत आहेत आणि तिथे नाटकांचे प्रयोग होतात, तर उर्वरीत नाट्यगृहांची डागडुजी लवकरात लवकर करून तेथे नाटक आणि चित्रपटांचेदेखील प्रयोग सादर केले जाऊ शकतात, जेणेकरून मराठी प्रेक्षकांना नाटक आणि चित्रपटांचा रसास्वाद घेता येईल. तसेच, महाराष्ट्रात इतर १०० ठिकाणी मोकळ्या जागा उपलब्ध असून, तेथे नव्या थिएटर्सच्या वास्तू उभारून किंवा ‘ओपन एअर’मध्ये चित्रपट दाखवण्याचीदेखील सोय करता येऊ शकते.

अजित भूरे, दिग्दर्शक

अनुदानित नाट्यगृहांचा चित्रपट प्रदर्शनासाठी वापर व्हावा

मराठी चित्रपट नाट्यगृहात दाखवण्याचा उपक्रम हा कौतुकास्पदच आहे. कारण, ‘मानवत मर्डर्स’ या माझ्या वेबसीरिजसाठी ज्यावेळी मी मराठवाड्यात चित्रीकरण करत होतो, त्यावेळी माझ्या लक्षात आले की, गावांमध्ये किंवा गावांच्या जवळपास चित्रपटगृहेच नाहीत. अगदी तालुक्याच्या ठिकाणी एखाद-दुसरे चित्रपटगृह असेल, तर गावातील लोकांना तिथे जाऊन चित्रपट पाहणे फार खर्चिक आहे. त्यामुळे गावागावातील प्रेक्षक जर मराठी चित्रपटांशी जोडला जावा, अशी इच्छा असेल, तर सरकारी अनुदान मिळालेली नाट्यगृहे चित्रपटांच्या प्रयोगासाठी वापरली गेली पाहिजे. कारण, मराठी चित्रपट मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर या पट्ट्यापुरताच कुठेतरी मर्यादित राहिला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभरात मराठी चित्रपट प्रेक्षकांनी पाहण्यासाठी नाट्यगृहांचा वापर करण्याचा उपक्रम अतिशय योग्य असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करत प्रत्येक कलाकारही त्यांच्या या कार्यात आपला लहानसा वाटा देईल, ही शाश्वती आहे.

आशिष बेंडे, दिग्दर्शक

प्रेक्षकांपर्यंत चांगल्या कलाकृती पोहोचवणे गरजेचे

सध्या नाट्यगृहांमध्ये शुक्रवार ते रविवार याच काळात नाटकांचे प्रयोग होतात. आठवड्याच्या मधल्या वारी प्रयोग सहसा होत नाहीत. त्यामुळे नाट्यगृहात मराठी चित्रपट दाखवण्याचा उपक्रम अतिशय चांगला आहे. प्रेक्षकांना दर्जेदार मनोरंजनाच्या कलाकृती दिल्या की त्यावर ते त्यांची मते जाहीरपणे देतातच. पण, मुळात त्यांच्यापर्यंत चित्रपट, नाटके पोहोचली पाहिजेत आणि त्यासाठी हे पाऊल अतिशय कौतुकास्पद आहे.

हरी पाटणकर, ज्येष्ठ बुकिंग क्लर्क, शिवाजी मंदिर

रसिका शिंदे - पॉल

रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत.