मुंबई (विशेष प्रतिनिधी) - धाराशिवमध्ये बस्तान बसवलेल्या वाघाला पकडून सह्याद्रीत सोडण्याचे आदेश शुक्रवार दि. १० जानेवारी रोजी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी काढले आहेत (dharashiv tiger). गेल्या महिन्याभरापासून धाराशिव-सोलापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात फिरणाऱ्या या नर वाघाला पकडून त्याला रेडिओ काॅलर लावून सह्याद्रीत व्याघ्र प्रकल्पात सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (dharashiv tiger)
टिपेश्वर अभयारण्यातून प्रवास करुन आलेला नर वाघ गेल्या महिनाभर धाराशिव-सोलापूर सीमावर्ती भागात फिरत आहे. येडशी रामलिंग वन्यजीव अभयारण्य, बार्शी या भागात या वाघाचा प्रामुख्याने वावर होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हा वाघ वैराग गावाच्या परिसरात वावरत आहे. सोमावारी रात्री वैराग भागात रात्री मुंगशी आर येथे दोन वासरांवर वाघाने हल्ला केला. दुसरा हल्ला राळेरास येथे गाईच्या वासरावर, तर सासुरे येथे म्हशीच्या रेडकावर हल्ला करन त्याला ठार केले होते. गुरुवारी वैराग शहराजवळील सटवाईच्या माळावर शेतकरी विनायक खेंदाड यांच्या शेतात बांधलेल्या बैलाच्या पायाचा वाघाने लचक तोडला. या वाघाने आजवर १६ पशुधनाची शिकार केली असून एका माणसाला जखमी देखील केले आहे. या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वन्यजीव विभागाने या वाघाला पकडण्याचे आदेश काढल्याची शक्यता आहे.
चंद्रपूरमध्ये नुकत्याच झालेल्या 'वाईल्डकाॅन-२०२५' या परिषदेत वाघाला न पकडण्याचा सूर वनाधिकाऱ्यांनी आळवला होता. 'भारतीय वन्यजीव संस्थान'चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. बिलाल हबीब यांनी देखील या वाघाला पकडल्यास त्याला सह्याद्रीमध्ये न सोडण्याच्या सूचना दिल्या होत्या. आता वन्यजीव विभागाने या वाघाला पकडण्याचे आदेश तोडाबाच्या वन्यजीव बचाव पथकाला दिले आहेत. या वाघाला पकडून त्याला काॅलर लावून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडावे, असे म्हटले आहे. हे आदेश २८ फेब्रुवारी पर्यंत लागू राहणार असून या संपूर्ण प्रकरणाच्या कार्यवाहीची जबाबदारी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव (पश्चिम) डाॅ. बेन क्लेमेंट यांना देण्यात आली आहे.