रम्य कालिदासः

    06-Jul-2024
Total Views |
mahakavi kalidas


‘आषाढ शुद्ध प्रथमा’ अर्थात ‘आषाढस्य प्रथमः दिवसः’ असे म्हणताच आपसूक महाकवी कालिदासाचे नाव ओठी येते आणि प्रथम आठवते ते त्याने केलेले पावसाचे रम्य वर्णन. ‘ऋतुसंहार’ या खंडकाव्यात कालिदासाने सर्व ऋतूंचे रसिकवाचकाला खिळवून ठेवणारे असे वर्णन केले आहेे. कालच प्रारंभ झालेल्या आषाढ मासाच्या निमित्ताने ‘ऋतुसंहार’ खंडकाव्यातील वर्षा ऋतूची कालिदासाने वर्णिलेली ही महती...

पुरा कवीनां गणनाप्रसङ्गे कनिष्ठिकाधिष्ठितकालिदासः।
अद्यापि अत्तुल्यकवेरभावादनामिका सार्थवती बभूव॥
अर्थात, अशा महाकवींच्या गणनेत सर्वश्रेष्ठ असणार्‍या कालिदासाचे भारतीय साहित्य परंपरेतही अग्रस्थान अढळ आहे. त्याने जागतिक वाङ्मयामध्येदेखील स्वतःसाठी मानाचे स्थान संपादन केले आहे.परंतु, प्रसिद्धिपराड्.गमुख आणि विनम्र अशा कालिदासाने स्वतःविषयी नाव वगळता इतर काहीही माहिती दिलेली नाही. त्याचा जन्मकाळ, जन्मस्थळ, मातापिता, कुल, आश्रयदाता या सर्वांबाबत त्याने सर्वस्वी मौन धारण केले. त्यामुळे आज आपल्याला कालिदासाच्या काळाबद्दल व आश्रयदात्याबद्दल खात्रीशीर अशी माहिती उपलब्ध होत नाही.

समकालीन विविध संदर्भांच्या मदतीने कालिदासाचा काळ निश्चित करण्याचा इतिहास अभ्यासकांनी प्रयत्न केला. त्यानुसार, तो विक्रमादित्याच्या पूर्वी म्हणजे इसवी सन पूर्व पहिले शतक किंवा दुसर्‍या चंद्रगुप्ताच्या काळात म्हणजे इसवी सन चौथ्या शतकाचा उत्तरार्ध असा असावा, असे मानले जाते.

कालिदासाचे जन्मस्थान मात्र ओडिशा, काश्मीर, उज्जैन असे असल्याचेही विविध दावे केले जातात. त्याबद्दल अजूनही इतिहास संशोधकांमध्ये मतभेद आहेत. अशा महाकवी कालिदासाने सर्व भारतभर भ्रमण करून गोळा केलेल्या निरीक्षणांचे व अनुभवांचे सार त्याच्या साहित्यात प्रसुत केले आहे. कालिदासाने अनुभवलेल्या सुखी, समृद्ध जीवनाचे दर्शनही त्याच्या साहित्यकृतींतून घडते. त्याचे सुखी कौटुंबिक जीवन, संपन्न मित्रपरिवार, सुसंस्कृत आवडी-निवडी, रसिक व रंगेल स्वभाव, निसर्गप्रेम, विनोदबुद्धी, विनम्र वृत्ती, धार्मिक आचार-विचार या सर्वच बाबींवर कालिदासाच्या साहित्याने यथोचित प्रकाश टाकला आहे. मांगल्य, प्रेम, शांती, औदार्य अशा मौल्यवान गुणांनी युक्त असा हा पूजनीय महाकवी भारतीय संस्कृतीचा उद्गाताच.

बहुतेक संस्कृत साहित्यकारांची स्वतःची माहिती न नोंदविण्याच्या परंपरेमुळे त्यातून कालिदासाच्या रचना नेमक्या ओळखणे कठीण असले, तरी निर्विवादपणे कालिदासाच्या म्हणता येतील, अशा सात साहित्यकृती आहेत. त्यापैकी ‘मालविकाग्निमित्र’, ‘विक्रमोर्वशीय’ आणि ‘अभिज्ञानशाकुन्तल’ ही तीन नाटके आहेत, ‘कुमारसंभव’ व ‘रघुवंश’ ही दोन महाकाव्ये, तर ‘मेघदूत’ आणि ‘ऋतुसंहार’ ही दोन खंडकाव्ये आहेत.

खंडकाव्याला ‘भावकाव्य’, ‘लघुकाव्य’, ‘गीतिकाव्य’ इत्यादी नावाने ओळखले जाते. निसर्ग आणि मानव यांच्यातील अतूट नातेसंबंधांचे अत्यंत हृद्य आणि रसाळ चित्रण या खंडकाव्यांमध्ये शब्दबद्ध केलेले आढळते. ऋग्वेद, रामायण, महाभारत आणि पुराणांत खंडकाव्यांचे प्रेरणास्रोत आढळून येत असले, तरीही ‘भावकाव्यांचा जनक’ म्हणून कविश्रेष्ठ कालिदासाकडेच पाहावे लागेल. त्यातही शृंगारपर काव्याचा उद्गाता कालिदासच होय.

‘ऋतुसंहार’ हे खंडकाव्यही कालिदासाची प्रथम रचना. ‘संहार’ या शब्दाचा अर्थ येथे विध्वंस करणे किंवा नाश करणे, असा नसून संचय करणे, एकत्रित करणे असा अर्थ इथे अभिप्रेत आहे. कालिदासाने लिहिलेले ‘ऋतुसंहार’ हे खंडकाव्य म्हणजे सहा ऋतूंचे सहा सोहळे सांगणार्‍या ऋतुवर्णनाचा संग्रह होय. या काव्यात सहा सर्ग आहेत. त्यात एकूण १४४ श्लोक आहेत. प्रत्येक सर्गात १६ ते २८ श्लोक असे त्याचे सुयोग्य विभाजन. संपूर्ण काव्य हे प्रियकराने प्रेयसीला उद्देशून म्हटलेले. असे असूनही त्यात प्रेयसीचा उल्लेख नाही आणि प्रियकर, अर्थात काव्याचा नायक हा कोणीही मनुष्य नसून स्वतः निसर्ग असल्याचेच स्पष्ट होते.

कालिदासाच्या काव्याचा आरंभ होतो तो ग्रीष्म ऋतूच्या बहारदार वर्णनाने. त्यानंतर क्रमाने वर्षा, शरद, हेमंत, शिशिर आणि वसंत ऋतूंमधील निसर्गचित्रण कालिदासाने चितारले आहे. यातील प्रत्येक ऋतूनुरुप व ऋतुबदलानुसार वातावरणातील झाडे, वेली, पशू, पक्षी इत्यादी पर्यावरणातील सर्व घटकांमध्ये होणार्‍या सूक्ष्म बदलांचे प्रत्ययकारी वर्णन या काव्यात आढळते. त्याचबरोबर, या ऋतूकाळातील मानवी भावभावनांचे कालिदासाने केलेले हृद्य रेखाटनही मनाला स्पर्शन जाते.

कालिदासाची आनंदी व खेळकर लेखनशैलीही अतिशय प्रभावी. तसेच, निसर्गातील प्रत्येक सूक्ष्म घटकाचे कालिदासाने शब्दबद्ध केलेले मार्मिक वर्णन विशेष प्रशंसनीय. कालिदासाने या खंडकाव्यात ‘वसंततिलका’, ‘मालिनी’, ‘उपजाती’ इत्यादी अलंकारांचा अगदी चपखल वापर केला आहे.

संस्कृत साहित्यकारांच्या परंपरेप्रमाणे कालिदासानेही काव्याच्या प्रारंभी आपल्या इष्टदेवतेला नमन केले आहे.

समस्तविदुषां शिरोमणिर्येन राजति सभा विपश्चिताम्।
तं महीश्वरकृताड्ं घ्रिवन्दनं नीलकण्ठपितरं नमाम्यहम्॥
असे म्हणत शंकराची स्तुती करून कालिदासाने आपल्या काव्यपुष्पात शब्दांची गुंफण केली आहे.

सर्वप्रथम ग्रीष्म ऋतूचे वर्णन करताना, शुष्क वेली, जलाच्या आशेने मृगजळाकडे धाव घेणार्‍या हरणांचा कळप यांचे कालिदासाने केलेले जीवंत वर्णन, सर्वांगाने ग्रीष्माला गवसणी घालते. त्याचबरोबर उन्हाच्या काहिलीपासून बचाव करण्यासाठी त्या काळातली माणसे काय करत असत, याचेदेखील वर्णन त्याने केले आहे. यामध्ये तलम वस्त्र धारण करणे, चंदनाचा लेप लावणे, थंड रत्ने बाळगणे, जल शिंपडणे इत्यादी ग्रीष्मदाहापासून संरक्षणाच्या उपायांचा कालिदासाने कानोसा घेतला आहे.

तप्त ग्रीष्मानंतर सुखावणार्‍या वर्षा ऋतूचे वर्णन कालिदास ‘कामिजनप्रिय’ असे करतो. ढगांचे ढोल वाजवीत, नृत्यकुशल सौदामिनीच्या लखलखाटासह बरसणारा पाऊस प्रेमीयुगुलांना व्याकूळ करतो, भेटीची ओढ जागवतो. या ऋतूचे ‘बहुगुणरमणीय’ आणि ‘कामिनीचित्तहारी’ असे कालिदासाने यथार्थ वर्णन केले आहे.

सशीकराम्भोधरमत्तकुंजरस्तडित्पताकोऽशनिशब्दमर्दलः।
समागतो राजवदुस्शतद्युतिर्घनागमः कामिजनप्रियः प्रिये॥
अशाप्रकारे कालिदास वर्षा ऋतूची महती वर्णित करतो.

तो म्हणतो, प्रेमीजनांना आवडणारा हा वर्षाकाल एखाद्या राजाप्रमाणे थाटात येतो. तो कृष्णमेघाच्या हत्तीवर बसतो. तलवारींच्या प्रहारासारख्या विजा कडाडतात. त्यामुळे त्याचे आगमन विशेष नेत्रदीपक होते. अधूनमधून ढगांचे नगारे झडतात. इंद्रधनुष्यावर विजेची प्रत्यंचा चढविली जाते. त्यातून सुटणार्‍या तीक्ष्ण बाणांनी प्रियजन दूर असणार्‍या विरही जनांची मने विचलित होतात. मोरांचे कळप आपला कांतिमान पिसारा फुलवून मादक केका करत अत्यानंदाने नर्तन करतात. भुंगे कमळांजवळ जाताना त्या मोरांच्या पिसार्‍यात अडकून पडतात. मेघांच्या गर्जनांना मदोन्मत्त हत्ती आपल्या चीत्कारांनी पुनःपुन्हा दाद देतात. त्यांच्या गंडस्थळांतून होणार्‍या मदस्रावाकडे भुंगे, उन्मादकतेने आकर्षित होतात.

अखंड वर्षावानंतर थोडा वेळ मेघ श्वेतकमळासारखे दिसतात व पुन्हा आर्द्र होऊन पर्वतावर आसनस्थ होतात. पर्वतातून पाझरणार्‍या झर्‍याने सर्व प्रदेश ओलावतो. डबक्यांमध्ये शेवाळे धरते. त्यात बेडूक आश्रय घेतात. परंतु, सापाच्या बिळात पाणी शिरल्याने साप बिळाबाहेर पडतात आणि त्यामुळे बेडूक भयभीत होतात. माकडे आसरा शोधतात. हरिणे सैरावैरा पळतात.

जमिनीवर नुकतेच कोवळे अंकुर उगवलेले असतात आणि झाडांना नवीन पालवी फुटलेली असते. सर्वत्र होणारी पोपटी शोभा खरेच मनोहारी असते. प्रेयसी ज्याप्रमाणे सर्व अडथळे झुगारून बेभान होऊन आपल्या प्रियकराकडे धाव घेते, त्याप्रमाणे पावसाचा जोर वाढताच नद्या आजूबाजूच्या सर्व वृक्षांची तमा न बाळगता आपले धरबंध विसरून दुष्ट स्त्रियांप्रमाणे समुद्राकडे धाव घेतात.

सजल मेघांच्या सहवासाने शीतल झालेला, प्रेरणा देणारा आणि विविध वृक्षांच्या थरथरत्या फुलांना स्पर्शून आल्यामुळे सुगंधी झालेला असा समीरण वाहू लागतो. हा समीरण अर्थात वारा प्रेमीयुगुलांच्या मनात हुरहुर उत्पन्न करतो आणि आपली प्रिय व्यक्ती जवळ नसणार्‍या प्रेमींना व्याकूळ करतो.

नवीन फुलांनी वृक्ष बहरतात. पावसाच्या पहिल्या सरीने सर्व पुष्प एकदम फुलून कदंबाचे झाड हे एखाद्या बगीचासमान दिसू लागते. निळ्या कमळे युवतींवर विजय मिळवतात. त्यांचा कमरेपर्यंत पोहोचणारा केशसंभार, छातीवर रुळणार्‍या सुवासिक पुष्पांच्या माळा, मद्यप्राशनाने मदमस्त झालेले मुख, नाभी प्रदेशावर नवजळाच्या सिंचनामुळे उठलेले मोहक रोमांच यातील एकेक दृश्यही पुरुषाच्या प्रभुत्वाला पराजित करण्यास पुरेसे आहे. तेव्हा या सर्वांनीच जर एकवटून पुरुषाच्या अंतःकरणावर आक्रमण केले, तर त्या बिचार्‍याची काय दशा होईल!

अशाप्रकारे आपल्या ‘ऋतुसंहार’ या खंडकाव्यात वर्षा ऋतूचे वर्णन करून शेवटी महाकवी कालिदास म्हणतो,

बहुगुणरमणीयः कामिनीचित्तहारी तरुविटपलतानां बान्धवो निर्विकारः।
जलदसमय एष प्राणिनां प्राणभूतो दिशतु तव हितानि प्रायश वांछितानि॥
अर्थात, बहुगुणरमणीय, कामिजनांचे चित्तहरण करणारा, तरु-लतांना निःस्वार्थी भावनेने, निर्विकारपणे बंधुसमान होऊन साहाय्य करणारा, प्राण्यांसाठी प्राणभूत, अर्थात जीवन असणारा असा हा जलदसमय आपल्या सर्व इच्छा पूर्ण करो व हितकर ठरो!

अशाचप्रकारे ऋतुसंहारातील प्रत्येक सर्गाच्या शेवटी आपल्या सर्व इच्छा पूर्ण होवो, अशा अर्थाचा श्लोक रचलेला आहे. यातून कालिदासाचा हितचिंतक स्वभाव परावर्तित होतो. तसेच, त्याने या खंडकाव्यात ४० पेक्षा अधिक वृक्ष-वेलींचा उल्लेख केलेला आहे. त्यातून त्याच्या निसर्गाप्रति असलेल्या प्रेमाची व अभ्यासाची प्रचीती येते. त्याचबरोबर, सर्व ऋतूंमधील बदलत्या निसर्गाचे काव्य रसिकाला खिळवून ठेवणारे कालिदासाने केलेले वर्णन नक्कीच सहृदांच्या हृदयावर राज्य करणारे आहे.


ओवी लेले