मृत्यूचे रहस्य

    03-Jul-2024
Total Views |
shithilasan sadhana


शिथिलासन

शवासन साधनेकडे वाटचाल करणारी प्रथम साधना म्हणजे ‘शिथिलासन’ होय. हे आसन वा साधना सोपी आहे. योग्य तर्‍हेने साधल्यास साधकात असीम गरिमाशक्ती येते. अष्टयोग सिद्धींपैकी गरिमा नावाची एक महान सिद्धी आहे. प्रथम ही साधना कशी करावी ते पाहू.

सतरंजीवर मुख वर करून सरळ झोपावे. हातपाय सरळ सोडावे व सर्व शरीरावरील नियंत्रण सोडून शरीर पूर्णपणे शिथिल ठेवावे. या आसनाला ‘शिथिलासन’ असे म्हणतात. सर्व शरीर शिथिल सोडल्यास शरीरावरील ममता कमी होऊन सर्व शरीराचा व्यापार प्रकृतीच करीत असते. त्यामुळे शरीर हळूहळू प्राकृतिक बनून पूर्णपणे निरोगी बनते. मन एकाग्र होऊन शरीर सोडून स्वतंत्रपणे राहू शकते. एरव्ही, आपले मन सदासर्वदा जड शरीरालाच धरून असल्याने त्या मनाला कधीच स्वातंत्र्य मिळत नाही. मन सदा शरीराचे गुलाम असते. त्यामुळे मनाला कधीच शांतता किंवा स्वास्थ्य प्राप्त होत नाही. शिथिलासनाने मनाचे मनपण कळायला लागते. मन स्वस्थ, निरोगी व बलवान होते. मन म्हणजे विचार! विचाराहून वेगळी मन अशी दुसरी कोणती वस्तू नाही. जेव्हा मनाच्या स्वरुपाचा शोध एखादा मनुष्य मी कोण आहे? कुठून आलो? असा सातत्याने घेतो तेव्हा मन मरते आणि आत्मस्वरुप तेवढे उरते. ज्याला ‘स्वरूप’ असे म्हणतात, तो आत्माच होय. मन नेहमी कोणत्या तरी स्थूल पदार्थावर अवलंबून राहते. जसे धोब्याकडून नुकतेच आणलेले शुभ्र वस्त्र ज्या रंगात भिजवाल त्या रंगाचे होऊन जाते, मनालाच ‘सूक्ष्म शरीर’ किंवा ‘जीव’ असे म्हणतात.

शिथिलासनाच्या अभ्यासाने आणखी एक महान शक्ती साधकाला प्राप्त होते आणि ती म्हणजे गरिमासिद्धी होय. गरिमासिद्धी म्हणजे आपल्या शरीराचे वजन पृथ्वीइतके वाढविणे होय. शिथिलासनाचा अभ्यास योग्य तर्‍हेने साधल्यास साधकाचे मन त्या शरीराला सोडून विश्वात्मक मनाशी एक होते. परंतु, त्या साधकाचे शरीर जीवंत असल्याने प्रकृतीला त्या शरीराची काळजी घ्यावी लागते. मग, प्रकृतीच ते शरीर चालविते. ते शरीर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणात असल्याने प्रथम पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा त्या मनरहित शरीरावर प्रचंड परिणाम होतो. शरीर आता पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने व्याप्त होऊन निष्चेष्ट पडलेले असते. त्या शरीरावर पृथ्वीच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणाचा परिणाम झाल्याने, त्या शरीराचा कोणत्याही लहानसहान अवयवालासुद्धा उचलणे इतरांना अशक्य असते. असल्या शिथिलासनाने व्याप्त शरीराचा हात वा बोटसुद्धा उचलणे नवसहस्त्रनागाचे बल असलेल्या महापराक्रमी भीमालासुद्धा कठीण जाईल.

या शिथिलासनाचा पराक्रम दाखविण्याकरिता व भीमाचे गर्वहरण करण्याकरिता महाभारतात एक कथा आली आहे. महाभारतातील सर्व कथांत योगसाधनांचे रहस्य मोठ्या खुबीने वेदव्यासांनी कथारुपाने वर्णन केले आहे. महाभारतातील शिथिलासनाचे कथावर्णन पाहा. पांडवबंधू भीमाला स्वतःच्या सामर्थ्याचा गर्व झाला. महासिद्धी प्राप्त होणार्‍या बलशाली योग्यालासुध्दा स्वतःच्या शक्तीचा असाच गर्व होत असतो. भीमाचे गर्वहरण करण्याच्या हेतूने भगवान श्रीकृष्णांनी भीमाला जवळच्या एका पर्वतावरुन एक विशिष्ट पुष्प आणावयास सांगितले. भीमाने आपली प्रचंड गदा खांद्यावर टाकली व तो त्या वनाकडे जाण्यास निघाला.

एके ठिकाणी अशी परिस्थिती प्राप्त झाली की, पर्वतावर एकीकडे सरळसोट उंचच उंच कडा, तर दुसरीकडे सहस्त्रावधी फूट खोल असलेली दरी आणि चालायला केवळ एका पावलाएवढीच खडतर पायवाट. थोडा झोक गेला की त्या खोल दरीत घरंगळायचे आणि शरीराच्या राईराई एवढ्या ठिकर्‍या व्हायच्या! त्या बिकट वाटेतून भीम आपले विशाल शरीर सांभाळत मोठ्या कौशल्याने चालला होता. तोच एका ठिकाणी एक विलक्षण अडचण आली. त्या चिंचोळ्या वाटेत एका वानराचे पुच्छ भीमाला दिसले. शरीर म्हणजे ईश्वराचे मंदिर असल्याने ते शरीर वा त्या शरीराचा कोणताच भाग ओलांडून पलीकडे जाऊ नये, असा वैदिक परंपरेचा धर्म आहे. वानराचे शेपूट पाहून भीम थबकला. प्राण्यांच्या शरीरातसुद्धा परमेश्वर वास करीत असतो. म्हणजेच प्रत्येक प्राणी वा मानव शरीर हे परमेश्वराचे मंदिरच आहे, अशी शिकवणूक भीमाच्या मनावर बिंबल्यामुळे त्याने त्या शेपटाचा धनी अशा त्या वानराकडे पाहून आपले शेपूट त्या वाटेवरून दूर सारण्यास विनंती केली. ते वानर उत्तरले, “बाबा, मी आता म्हातारा झालो आहे, तेव्हा माझ्या शरीरात आता शक्ती उरली नाही.

हे बलशाली तरुण पुरुषा, तूच ते शेपूट उचलून दूर कर. शेपूट उचलायला काय वेळ व शक्ती लागणा? आणि तेही भीमासारख्या नवसहस्त्र नागाचे बळ असलेल्या प्रचंड पराक्रमी पुरुषाला?” भीमाने डाव्या हाताच्या एका बोटाने ते वानरपुच्छ उचलण्याकरिता बोट पुच्छाखाली घातले मात्र तो काय? भीमाचे बोट त्या पुच्छाखाली जाईच ना! ते पुच्छ एखाद्या वज्राप्रमाणे जागचे हलत नव्हते. हे काय? भीमाने इकडे तिकडे पाहिले. मार्गावर पुढे-मागे कोणीच नव्हते म्हणून बरे झाले. नाहीतर, भीमासारख्या बलशाली महापुरुषाला एका वानराचे पुच्छ बाजूला सारता येऊ नये, ही केवढी नाचक्की! भीमाने आपली प्रचंड गदा बाजूला ठेवली आणि दोन्ही हातांनी ते पुच्छ बाजूला सारण्याचा प्रयत्न केला. पण, पुच्छ उचलेना. शेवटी, भीमाने आपल्या शेल्याने कंबर कसून आणि दोन्ही गुडघे टेकून मोठ्या शर्थीने ते पुच्छ उचलण्याचा भीमपराक्रम करुन पाहिला. पण व्यर्थ! शेपूट काही जागचे हलेना आणि त्या शेपटाचा स्वामी पाहावा तो एक सामान्य म्हातारा वानर! भीमाचे गर्वहरण झाले. भीम त्या महावानराला शरण गेला आणि त्यांचे नाव विचारता झाला. त्या म्हातार्‍या वानराने स्वतःचे नाव सांगितले, ‘श्रीरामप्रभूंचा दासानुदास हनुमंत’! भीम व हनुमंताची भेट अशी झाली. दोघेही कडकडून भेटले. गर्वहरण झाल्याशिवाय परमेश्वर काय, पण परमेश्वराच्या भक्ताचेसुद्धा दर्शन होणे अशक्य असते!

कथा एक, पण त्यात भक्तिमार्ग वा योगमार्गामध्ये प्रगती व्हायची असल्यास साधकाने सर्वप्रथम गर्वाचा परित्याग कसा केला पाहिजे, हे कथारुपाने सांगून शिवाय शिथिलासन साधल्यास साधकाच्या अवयवातसुद्धा केवढी प्रचंड शक्ती येत असते, याचेही बहारदार वर्णन वरील कथेत आहे. गर्वरहित सामान्य भक्तांना काय सामर्थ्य येत असते, याचे वर्णन संत तुकाराम आपल्या सरळ भाषेत करतात, ‘मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदू ऐसे॥ शिथिलासनाचा अभ्यास योग्य तर्‍हेने केल्यास व साधल्यास गरिमा सिध्दी प्राप्त होऊ शकते, इतके सामर्थ्य या शिथिलासनात आहे. (क्रमशः)
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)


योगिराज हरकरे
9702937357