वीस वर्षांची प्रतीक्षा संपली...

    28-Jul-2024
Total Views |
paris olympic games


ऑलिम्पिकमध्ये उद्घाटन सोहळ्याचा थाटमाट संपला की, पहिला गेम भारतासाठी असतो तो शूटिंगचा. गेली 20 वर्षे भारताचा या महिलांच्या नेमबाजीतील 10 मीटर एअर रायफलमधील नेम चुकत होता. यंदा भारताच्या मनू बाकरने 10 मीटरची एअर रायफल फायनल गाठत हा दृष्काळ संपवला आहे.

मला आठवतेय, ग्रीसमधली अथेन्समध्ये जेव्हा सुमा शिरूरने फायनल गाठली होती, तेव्हा मी तेथे होतो. अंजली वेदपाठकचा हा हुकमी गेम. पण, पात्रताफेरीत तिच्या रायफलच्या स्टँडमध्ये बिघाड झाला आणि तिची कामगिरी खालावली. १० मीटर एअर रायफलची फायनल गाठणारी सुमा शेवटची भारतीय खेळाडू.
 
२० वर्षांनंतर एक वर्तुळ पूर्ण झालेय. सुमा आता प्रशिक्षकाच्या भूमिकेत पॅरिसमध्ये आहे आणि मनू बाकरने पात्रता फेरीत तिसर्‍या क्रमांकाची कामगिरी नोंदवित फायनल गाठलीय. विशेष म्हणजे पात्रता फेरीत परफेक्ट १० गुण बाकरने तब्बल २७ वेळा मिळवलेत. पात्रताफेरीत इतके परफेक्ट १० इतरांना मिळविता आलेले नाही.

रविवारी दुपारी भारतीय वेळेनुसार साडेतीनला फायनल सुरू होईल तेव्हा श्वास रोखून ठेवा. ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्याची नामी संधी आपणास आहे. ऑलिम्पिकमधले भारताने महिलांच्या विभागात मिळविलेले हे पहिले मेडल असेल. खर्‍या अर्थाने अंजली भागवत, सुमा शिरूर आणि दीपाली देशपांडे या भारतीय महिला नेमबाज त्रिकुटाने रचलेल्या पायावर हा विजयी कळस असेल.

बाकरचे हे दुसरे ऑलिम्पिक. गेल्यावेळी टोकियो ऑलिम्पिकला तिच्याकडून खूप अपेक्षा होत्या. मीडियात सर्वाधिक जागा तिनेच व्यापली होती. हा दबाव झेलण्यात युवा बाकर त्यावेळी कमी पडली. ती पात्रता फेरीतच बाद झाली होती. पण, यंदा तिच्यात कमालीची प्रगल्भता जाणवतेय. आव्हान अवघड आहे पण अशक्य नक्कीच नाही.


भारताची दमदार सुरुवात

पॅरिस ऑलिम्पिकमधील पहिला दिवस भारतासाठी दमदार राहिलाय. मनू बाकरपाठोपाठ बॅडमिंटनमध्येही लक्ष्यसेनने विजयी सुरुवात केलीय. ग्वाटेमालाच्या केव्हिनचा त्याने 21-08, 22-20 असा पराभव केला. शूटिंग आणि बॅडमिंटनमध्ये भारत पदकाची हमखास अपेक्षा बाळगून आहे. सुरुवात तर छान झालीय..शेवटही छानच होईल...


संदीप चव्हाण