धर्मांतरण न रोखल्यास बहुसंख्यांक होतील अल्पसंख्यांक!

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निरीक्षण

    02-Jul-2024
Total Views |
allahbad high court observation

 
नवी दिल्ली :     धर्मांतर करणाऱ्या धार्मिक मंडळांना रोखले नाही तर देशातील बहुसंख्य लोकसंख्या एक दिवस अल्पसंख्याक होईल, असे निरीक्षण अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी नोंदवले आहे. न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांनी उत्तर प्रदेश बेकायदेशीर धर्म परिवर्तन कायदा, २०२१ अंतर्गत एका आरोपीची जामीन याचिका फेटाळताना हे निरीक्षण नोंदवले आहे.

प्रकरणातील आरोपीने अनेकांना दिल्ली येथे "कल्याण" मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नेले होते. तेथे त्यांचे धर्मांतरण घडविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात न्यायालयाने म्हटले आहे की, जर ही प्रक्रिया चालू ठेवली तर या देशातील बहुसंख्य लोकसंख्या एक दिवस अल्पसंख्याक होईल. त्यामुळे भारतीय नागरिकांचा धर्म बदलणाऱ्या अशा मंडळींना ताबडतोब थांबवण्याची गरज आहे.


 

भारतीय राज्यघटनेच्या कलम २५ मध्ये "विवेक स्वातंत्र्य आणि मुक्त व्यवसाय, सराव आणि धर्माचा प्रसार" अशी तरतूद आहे. परंतु एका धर्मातून दुसऱ्या धर्मात धर्मांतर करण्याची तरतूद नाही. "प्रचार" या शब्दाचा अर्थ प्रचार करणे असा आहे, परंतु याचा अर्थ कोणत्याही व्यक्तीला त्याच्या धर्मातून दुसऱ्या धर्मात बदलणे असा नाही. अनुसूचित जाती व जमाती आणि आर्थिकदृष्ट्या गरीब व्यक्तींसह इतर जातींच्या लोकांचे ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करण्याची बेकायदेशीर कृती संपूर्ण उत्तर प्रदेशात सर्रासपणे केली जात आहे, असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.


नेमकं प्रकरण कोणतं?

अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती आणि इतर आर्थिकदृष्ट्या वंचित गटातील लोकांचे उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर ख्रिश्चन धर्मात बेकायदेशीर धर्मांतर होत असल्याची अनेक प्रकरणे निदर्शनास आल्यानंतर न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. यादरम्यान न्यायालयाने कैलास नावाच्या व्यक्तीचा जामीन अर्ज फेटाळला. उत्तर प्रदेश पोलिसांनी भादंवि कलम ३६५ आणि उत्तर प्रदेश बेकायदेशीर धार्मिक धर्मांतरण कायदा, २०२१ च्या कलम ३/५ (१) अंतर्गत कैलासविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आपल्या गावकऱ्यांना दिल्लीत नेऊन त्यांचे धर्मांतर घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप त्याच्यावर आहे. एका महिलेने कैलासविरोधात तक्रार दाखल केली. मानसिक आजाराने त्रस्त असलेला तिचा भाऊ बरा होईल आणि आठवडाभरात त्याला त्याच्या मूळ गावी परत पाठवले जाईल, असे आश्वासन देऊन कैलासने तिला तिथे नेल्याचे महिलेने सांगितले. मात्र नंतर त्यांचा धर्म बदलण्यात आला.