कल्याण : अंबरनाथ येथे स्वामी गोशाळा परिसरात नवनिर्मित आरोग्य केंद्राचे उद्घाटन रोटरी इंटरनॅशनलचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन दिनेश मेहता आणि फर्स्ट लेडी ज्योती मेहता यांच्या हस्ते करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हरसाईडच्या वतीने या उपक्रमाची संकल्पना साकारण्यात आली. या कार्यक्रमाला क्लब अध्यक्ष रोटेरियन योगेश कल्हापूरे, क्लब फर्स्ट लेडी योगिता कल्हापूरे, प्रकल्प प्रमुख डॉ. अवधूत शेटे, महेश टीबे, नीता टीबे, अपूर्वा शेटे, संजय माचवे, सुनिल शर्मा, व्हिनस जॉय, सहसचिव मंदार पाठक आदी रोटेरियन सदस्य उपस्थित होते.
गोशाळा ट्रस्टचे परागबुवा रामदासी यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा दिला. यावेळी नमूद करण्यात आले की, क्लबने दोन वर्षांपूर्वी दिलेली रुग्णवाहिका आजही परिसरातील नागरिकांसाठी उपयुक्त ठरत आहे. ८ किमी परिसरात शासकीय आरोग्यसेवा उपलब्ध नसल्यामुळे हे केंद्र सुमारे १० ते १२ हजार नागरिकांना आरोग्यसेवा पुरवणार आहे.
"सेवा परमो धर्मः" या तत्त्वावर काम करणारे अध्यक्ष योगेश कल्हापूरे यांनी या प्रकल्पास प्राधान्य दिले. डी. जी. दिनेश मेहता यांनी रोटरीच्या वैद्यकीय व्यावसायिकांकडून नियमित सेवा देण्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमात ईशा नेत्रालयाच्या सहकार्याने नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. सत्कर्म बालकाश्रमातील मुलांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. प्रमोद राजकारणे यावेळी उपस्थित होते. डॉ. अनंत इटकर व डॉ. अवधूत शेटे यांनी आवश्यक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून दिली.
हा आरोग्य प्रकल्प ग्रामीण भागात आरोग्याच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल ठरून भविष्यातील सेवा उपक्रमांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.