संत एकनाथांच्या अभंग गाथेतील ‘रामदर्शन’ (भाग ३)

    08-Jun-2024
Total Views |
sant eknath abhang

 
संत एकनाथांच्या श्रीकृष्णलीलापर ‘नाथ भागवत’ ग्रंथातही त्यांनी राम अवताराचा गुणगौरव केलेला आहे, आणि अभंग गाथेमध्ये ‘रामचरित्र’ पर १४ अभंग आहेत. परंतु रामापेक्षा एकनाथ ‘रामनाम माहात्म्या’ला अधिक महत्त्व देतात. नामभक्ती-नामस्मरण भक्ती हे परमार्थातील सर्वश्रेष्ठ साधन आहे. ‘धन्य मंत्र रामनाम।’ हा त्यांचा उपदेश आहे.

श्रीमद् ‘गीता’, आणि श्रीमद् ‘भागवत’ हे भागवत भक्तभाविकांची विशेष श्रद्धास्थाने आहेत. या दोन ग्रंथांचे असे विशेष महत्त्व लक्षात घेऊनच, संत ज्ञानेश्वरांनी श्रीमद् गीतेवर मराठी भाष्य लिहिले आणि संत ज्ञानदेवांचाच अवतार मानल्या गेलेल्या, संत एकनाथांनी ‘श्रीमद् भागवत’ महापुराणांच्या एकादश स्कंधावर मराठीत भाष्य लिहून ज्ञानदेवांचेच अपुरे कार्य पूर्ण केले.

संस्कृतमधील ‘श्रीमद् भागवत’ महापुराण भगवान श्रीकृष्णाचा लीला ग्रंथ आहे. त्यामध्ये एकूण १२ स्कंध (प्रकरणे) आहेत. त्यापैकी ११व्या स्कंधामध्ये, श्रीकृष्णाचा उद्धवाला उपदेश असल्याने त्याला ‘उद्धवगीता’ म्हणूनही ओळखले जाते. या स्कंधावर संत एकनाथांनी सुमारे १८ हजार ओव्यांचे मराठी भाष्य लिहिले आहे. हा ग्रंथ नाथांनी काशी क्षेत्री पूर्ण केला असून, काशीतील विद्वानांनी या ग्रंथाची हत्तीवरून मिरवणूक काढली. अशा या मुख्यतः श्रीकृष्णलीलापर असलेल्या नाथभागवताच्या चौथ्या अध्यायात विष्णूंचा सातवा अवतार म्हणून श्रीराम अवताराचे अनेक ओव्यांतून संत एकनाथांनी विलोभनीय दर्शन घडविलेले आहे.

जो अवताराचे मूळपीठ । जो वीरवृत्ती आणि उद्धट ।
तो अवतारामाजी श्रेष्ठ । अतिवरिष्ठ ‘श्रीराम’ ॥ २४५ (अ.४)
जो देवांचे बंध सोडी । नवग्रहाची बेडी तोडी ।
जेणे रामराज्याची रोकडी । उभविली गुढी तिन्ही लोकी ॥२४८॥
या लागी राम राम । नित्य जपे जो हे नाम ।
तो पुरुषांमाजी पुरुषोत्तम । कर्माकर्म अतीत तो ॥२५२॥
ऐशी रामनामाची ख्याती । जगदुद्धारे केली किर्ती ।
धन्य धन्य जे परिसती । धन्य जे गाती रामचरित्र ॥२५४॥
नाथभागवताच्या चौथ्या अध्यायात जयंतीपुत्र ऋषी दुमिल आणि राजा विदेह यांचा संवाद आहे. त्या संवादात ऋषी दुमिल राजाला रामाची महती कथन करतात. या ओव्यांमध्ये रामअवताराचे श्रेष्ठत्व आणि रामनामाची अगाध अनंत ख्याती सांगितलेली आहे. नाथांचा हा राम परब्रह्म, परमात्मा स्वरूप आहे. त्याच्या नामाची महती सांगून, संत एकनाथ नामस्मरण भक्तीचा पुरस्कार करतात. ‘राम कृष्ण हरी’ हा नाथांच्या वारकरी भक्ती पंथाचा मंत्र आहे. आणि वारकरी पंथ म्हणजे नामभक्ती पंथ होय. नामालाच या भक्तिपरंपरेत सर्वश्रेष्ठ स्थान आहे. म्हणून, एकनाथ सांगतात की
 
‘या लागी राम राम । नित्य जपे जो हे नाम । तोच पुरुषोत्तम होय.’
नाथांच्या अभंग गाथेतील रामदर्शन
प्रपंच व परमार्थाचा सुसंगम साधणार्‍या संत एकनाथ महाराजांच्या साहित्यात ‘नाथ भागवत’, ‘भावार्थ रामायण’ या ग्रंथांएवढेच प्रमुख स्थान त्यांच्या अभंग गाथेला आहे. राष्ट्रसंत विनोबा भावे, थोर तत्त्वचिंतक डॉ. गुरुदेव रा.द. रानडे यांनी नाथांच्या अभंगाचे विशेषत्वाने कौतुक कलेले आहे. गुरुदेव रानडे म्हणतात, नाथांचे इतर ग्रंथ बुद्धिवादाचे, पण अभंग अनुभवप्रधान आहेत.’ त्यांची पारमार्थिक तळमळ अत्यंत उत्कटपणे त्या अभंग गाथेतून व्यक्त झालेली आहे. त्याचे अभंग पारमार्थिक अनुभवाचा भक्तीपूर्ण आविष्कार आहेत, तसेच ते त्यांच्या सामाजिक जाणिवांचे व प्रबोधन कार्याचे दर्शन आहे.

संत एकनाथांच्या अभंग गाथेत सुमारे ४ हजार अभंग आहेत. विविधता, विपुलता आणि वैचित्र्य अशा गुणांनी अभंगगाथा संपन्न असून त्यांच्या विविध विषयावरील अभंगामध्ये रामाविषयी २००-२२५ अभंग आढळतात. १) रामनाम महिमा २) रामचरित्र ३) सीता मंदोदरी संवाद ४) सीता मंदोदरी एकरूपता ५) राम रावण एकरूपता ६) दशावतार अशा सहा-सात स्वतंंंत्र प्रकरणांतून त्यांच्या उत्कट रामभक्तीचे व रामनामाच्या अगाध महतीचे शब्ददर्शन आपणास घडते. ते दोन प्रकारचे आहे.


१) रामोपनिषदात श्रीराम परब्रह्माचे - परमात्म्याचे निर्गुण रामदर्शन
२) पौराणिक कथांतून व्यक्त झालेले दाशरथी रामाचे दर्शन

रामाच्या चरित्रापेक्षा रामनामाला म्हणजे नामस्मरण भक्तीला या सर्व अभंगातून विशेष प्राधान्य दिले गेलेले आहे. नाथ गाथेमधील ‘रामचरित्र’ पर प्रकरणात केवळ १४ अभंग आहेत; तर ‘रामनाम महिमा’ प्रकरणात तब्बल १८६ अभंग आहेत. या संख्येवरूनही नाथांचा भर रामनामावरच अधिक असल्याचे स्पष्ट होते. ‘धन्य मंत्र रामनाम’, ‘दो अक्षरी रामनाम । जपता पावसी मोक्षधाम ।’, ‘ते नाम सोपे श्रीरामाचे । निरंतर वाचे जप करी ।’ या नाथांच्या अभंग ओळी रामनाम माहात्म्य प्रतिपादन करणार्‍या आहेत. श्रीराम नामाचे माहात्म्य भक्तभाविकांच्या मनावर ठसविण्यासाठी नाथ भगवान शिव सदैव रामनाम घेतात, असा पौराणिक कथांचा हवालाही देतात. उदा.

‘रामनाम जपे शिव।’, ‘शिव जपे स्तोस्त्र रामनाम ।’
अहर्निश ध्यान शंकर धरी ज्याचे ।
तो श्रीराम वाचे कां रे नाठविसी ॥ ७४८ (अ.क्र. )
श्रीरामाचे नाम हे कलियुगात तारक नाम आहे. रामनामाने ‘भोग रोग नामे’ तसेच ‘संकट बंधन तुटेल’, ‘कलियुगी जनासी तारक’, ‘कलिमाजी श्रेष्ठ राम नाम।’ असे रामनामाचे महत्त्व सांगून रामनामाने पूर्वी कोण कोण तरले त्या भक्तभाविकांची एक भलीमोठी यादीच नाथ आपल्या अभंगातून देतात. त्या भक्तांमध्ये वाल्याचा वाल्मिक ऋषी झाल्याचा उल्लेख प्राधान्याने दिसतो.


रामनाम घेण्यास कोणालाही कोणतेही वर्ण, जाती, काळ, वेळ, स्थळ याचे बंधन नसल्याचे सांगून संत एकनाथ सर्वांना रामनाम घेण्याचा आग्रह करतात.

याती हीन असेा भलते नरनारी ।
वाचे उच्चारी राम नाम ॥(७३४)
सर्व याती वर्णा आहे अधिकार ।
राम नाम उच्चार बहु सोपा ॥ (८८२)
वेदवंचित बहुजन समाजाला, तळागाळातील बांधवांना वारकरी भक्ती परंपरेने नामस्मरणरूपी सुलभ, सोपा नाममंंत्र दिला आणि त्यांच्यात आत्मसन्मान, आत्मविश्वास निर्माण केला तोच वसा वारसा संत एकनाथ चालविताना दिसतात.

राम हे माझे जीवीचे जीवन । पाहता मन हे जाले उन्मन ॥
लोपल्या चंद्रसूर्याच्या कळा । तो राम माझा जीवीचा जिव्हाळा ॥
खुंटली गति श्वासा तो उश्वासा । तो राम माझा भेटेल वो कैसा ॥
मन रामी रंगले अवघे मनचि राम जाले ।
सबाह्य अभ्यंतरी अवघे रामरूप कोंदले ॥


विद्याधर ताठे
९८८१९०९७७५
(पुढील अंकात ः संत तुकाराम (राघवदास) यांच्या अभंगातील राममाहात्म्य)