"सुप्रिया सुळेंमध्ये नेतृत्त्व गुण नाहीत!", पवार गटाच्या 'लेडी जेम्स बाँड'चा आरोप
28-May-2024
Total Views | 109
मुंबई : सुप्रिया सुळेंमध्ये नेतृत्त्व गुण नाहीत. त्यांच्यामुळे अनेक लोक पक्ष सोडून जात आहेत, असा गंभीर आरोप शरद पवार गटाच्या नेत्या सोनिया दुहान यांनी केला आहे. सोनिया दुहान लवकरच शरद पवार गटाचा राजीनामा देऊन अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतू, अद्याप आपण पक्ष सोडलेला नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
सोनिया दुहान म्हणाल्या की, "धीरज शर्मा किंवा आणखी माझ्यासारखे काही लोक गेल्या अनेक वर्षांपासून पवार साहेबांसोबत निष्ठेने काम करत आहेत. हे लोक पवार साहेबांसाठी काहीही करायला तयार आहेत. पण आज ते सगळेच लोक अचानक पक्ष सोडण्याचा निर्णय का घेत आहेत?," असा सवाल त्यांनी केला.
"आमच्या सर्वांसाठी पवार साहेब आमचे नेता होते, आहेत आणि यापुढेही राहतील. आमच्या खासदार आणि शरद पवारांची मुलगी सुप्रिया सुळे यांचा आम्हाला आदर आहे. पण त्या कधीही आमच्या नेत्या होऊ शकल्या नाहीत. त्यांच्यामुळे आणि त्यांच्या आजूबाजूच्या काही लोकांमुळे आमच्यासारखे एकनिष्ठ लोक पक्ष सोडण्याचा निर्णय घेत आहेत," असे त्या म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या की, "मी अजूनपर्यंत पक्ष सोडलेला नाही. पण लवकरच मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेणार आहे. मी दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाणार नाही. पवार साहेबांमुळे आम्ही इतके दिवस त्यांच्यासोबत आहोत. पण ताईंच्या आसपासच्या काही लोकांकडून पक्षातील लोकांना संपवण्याचे काम करत आहेत. पवार साहेब आमचे नेता आहेत आणि कायम राहतील. परंतू, त्यांची मुलगी नेता बनण्यात पुर्णपणे अपयशी ठरल्या आहेत. त्या स्वत:ला नेता म्हणून सिद्ध करू शकल्या नाहीत. त्यामुळे पक्षातील लोकं का सोडून जात आहेत याबद्दल सुप्रियाताईंनी चिंतन करावं," असेही त्या म्हणाल्या.