मुंबई, महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि कुतूहल वाढवण्यासाठी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगामार्फत २०१५ पासून सुरू असलेली "विज्ञान व नाविन्यता उपक्रम केंद्रे" आता थोर शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या नावाने चालवली जाणार आहेत. येत्या ५ वर्षांत उर्वरित २३ जिल्ह्यांमध्ये अशी केंद्रे आणि २८ नवीन टेक्नॉलॉजी लॅब्स उभारण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी अंदाजे १९२ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी गुरुवारी विधान परिषदेत जाहीर केले.
विज्ञान व नाविन्यता उपक्रम केंद्रे शालेय शिक्षणाला पूरक असून, विद्यार्थ्यांना प्रयोग, मॉडेल्स, रोबोटिक्स, ३D प्रिंटिंग, कोडिंग यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देतात. यामुळे वैज्ञानिक समज, सर्जनशीलता, संवाद कौशल्ये आणि शिक्षकांचे प्रशिक्षण वाढते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी मिळण्यावरही भर आहे. ही केंद्रे राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०शी सुसंगत असून, अनुभवाधिष्ठित शिक्षण आणि कौशल्य विकासाला चालना देतात. यासाठी राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद, नेहरु सायन्स सेंटर, होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन, मुक्तांगण एक्सप्लोरेटरी आणि विज्ञान आश्रम यांच्या सहकार्याने ही केंद्रे उभारली जातील. याची अंमलबजावणी आणि नियंत्रणासाठी क्यूरेटर, अभियंते आणि निवृत्त अधिकाऱ्यांचा व्यावसायिक चमू स्थापन केला जाईल.
'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.