मुंबई : बीडमधील महादेव मुंडे यांना न्याय मिळण्यासाठी त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. त्यामुळे महादेव मुंडे हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले. यावर आमदार सुरेश धस यांनी गुरुवार, १७ जुलै रोजी मोठा खुलासा केला आहे.
विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना सुरेश धस म्हणाले की, "महादेव मुंडे यांना फक्त १२ गुंठ्यासाठी मारले. महादेव मुंडे प्रकरणी गोट्या गीते, राजू फड, वाल्मिक कराडचा धाकटा मुलगा या सर्वांची नावे बाळा बांगर याने माध्यमांसमोर घेतली आहेत. तो एकेकाळी रोज आकाबरोबर असायचा. ज्यावेळी मी आकाला भेटायला गेलो त्यावेळी तिथे एका माणसाचं चमडं, हाड आणि त्याचे रक्तही ऑफिसच्या टेबलवर होते, असे बाळा बांगर यांनी त्यावेळी सांगितले होते. यानंतर त्यांनी तक्रार दिली. ज्ञानेश्वरी ताईंची काय चूक आहे? त्यांच्यावर एसपी कार्यालयासमोर औषध प्यायची पाळी आली."
"ज्ञानेश्वरी मुंडे या माऊलीने प्रत्येकवेळी पोलिसात जाऊन माझ्या नवऱ्याचे काय झाले, असे विचारले. २१ ऑक्टोबर २०२३ पासून ती माऊली आणि तिचा भाऊ हे दोघेच लढत आहेत. पोलिसांनी आरोपींना अटक केले पाहिजे. बाळा बांगर यांनी ते वक्तव्य करून १५-२० दिवस होऊन गेलेत. मीना नावाचे पोलिस उपअधीक्ष ज्यांची नियुक्ती आकाने केली, त्यांच्याकडेच हा तपास ठेवला आहे. तो काय तपास करणार?" असा सवाल त्यांनी केला. पोलिसांनी आरोपींना का अटक केली नाही?
"काल त्या ताईने विष प्राशन केल्यानंतर आता सांगतात की, गोट्या गीतेला पकडण्यासाठी पुण्याला टीम पाठवली आहे. ज्या दिवशी बाळा बांगरेने स्टेटमेंट केले, त्या दिवशीपासून ते फरार झाले. त्यांना पोलिसांनी का अटक केली नाही. पोलिसांमध्ये या गुंडाना कशी मदत होईल यासाठी काम करणारे काही कर्मचारी आहेत. खालचे अधिकारी जे सांगतील ते खरे मानण्याचा एसपिंचा स्वभाव चुकीचा आहे," असेही सुरेश धस म्हणाले...
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....