वेव्हज परिषद केवळ इव्हेंट न राहता एक व्यापक चळवळ ठरली
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ; ‘वेव्हज २०२५’ परिषदेचा निष्कर्ष अहवाल प्रकाशित
18-Jul-2025
Total Views | 6
मुंबई : वेव्हज परिषद केवळ एक इव्हेंट न राहता एक व्यापक चळवळ ठरली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, १८ जुलै रोजी केले आहे.
मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते ‘वेव्हज २०२५’ परिषदेचा निष्कर्ष अहवाल प्रकाशित करण्यात आला. तसेच 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव टेक्नाॅलाॅजीस (IICT) आणि नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन(NFDC) कॅम्पसचे उदघाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्यासह संबंधित अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मुंबई ही देशाची एंटरटेनमेंट कॅपिटल असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक क्रिएटिव्ह इकॉनॉमीच्या पुढाकाराची सुरुवात याच शहरातून केली होती. त्या दृष्टीकोनाला आज यशस्वी मूर्तरूप मिळत आहे.
वेव्हज परिषद केवळ एक इव्हेंट न राहता, एक व्यापक चळवळ ठरली आहे, असे ते म्हणाले.
याप्रसंगी त्यांनी वेव्हज इंडेक्समध्ये आलेल्या वाढीबद्दल माहिती दिली. केवळ काही महिन्यांपूर्वी ९३ हजार कोटींवर असलेला हा इंडेक्स आज १ लाख कोटींचा टप्पा पार करत असून हे क्रिएटिव्ह इकॉनॉमीच्या जलद विस्ताराचे स्पष्ट संकेत आहेत, असे त्यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडून १५० कोटींचा विशेष निधी मंजूर केल्याचीही घोषणा केली. यामुळे क्रिएटर्स इकॉनॉमीच्या पुढील टप्प्याला चालना मिळेल.
वेव्हज परिषद मुंबईतच
वेव्हज परिषद ही दरवर्षी किंवा दोन वर्षांनी मुंबईतच भव्य स्वरूपात आयोजित करण्याचा मानस आहे. पुढील परिषद ही याहून दहा पट अधिक व्यापक आणि जागतिक स्तरावर प्रभावी असेल, असे त्यांनी सांगितले.
आयआयसीटी ही संस्था आयकॉनिक डेस्टिनेशन ठरणार
ते पुढे म्हणाले की, “आयआयसीटी ही संस्था केवळ एक प्रशिक्षण केंद्र न राहता, एक आयकॉनिक डेस्टिनेशन ठरेल. जगभरातून विद्यार्थी इथे केवळ शिकण्यासाठीच नव्हे, तर प्रेरणा घेण्यासाठी येतील. ही संस्था पुढील पिढ्यांसाठी क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा केंद्रबिंदू बनेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार, भारत पॅव्हेलियनला 'गुलशन' इमारतीत स्थलांतरित करण्यात आले असून, हे मुंबईच्या पर्यटन नकाशावर नवे आकर्षण ठरेल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव, मंत्री ॲड. आशिष शेलार आणि संबंधित अधिकारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.