"मी पक्ष सोडलेला नाही, पण..."; सोनिया दुहान यांचं स्पष्टीकरण
28-May-2024
Total Views | 91
मुंबई : मी अजूनपर्यंत पक्ष सोडलेला नाही. पण लवकरच पक्ष सोडण्याचा निर्णय घेणार आहे, असे स्पष्टीकरण शरद पवार गटाच्या नेत्या सोनिया दुहान यांनी दिले आहे. सोनिया दुहान शरद पवार गटाचा राजीनामा देणार असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान, आता त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.
सोनिया दुहान म्हणाल्या की, "मी पक्ष सोडलेला नाही आणि दुसऱ्या कोणत्याच पक्षात प्रवेशही केलेला नाही. राहिली गोष्ट मला काल लोकांनी पाहिलं आणि त्यानंतर चर्चा सुरु झाली. पण ज्यावेळी पक्ष फुटला आणि अजित पवारांच्या घरी आमदार गेले त्यावेळी सुप्रियाताईही तिथे दोनदा दिसल्या होत्या. याचा अर्थ त्या अजित पवारांच्या पक्षात गेल्या असा होतो का? मी शरद पवारांना सोडलेलं नाही आणि सोडणारही नाही."
"मी अजूनपर्यंत पक्ष सोडलेला नाही. पण लवकरच मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेणार आहे. मी दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाणार नाही. पवार साहेबांमुळे आम्ही इतके दिवस त्यांच्यासोबत आहोत. पण सुप्रियाताईंच्या आसपासच्या काही लोकांकडून पक्षातील लोकांना संपवण्याचे काम केले जात आहे," असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.