गोहत्या रोखण्यासाठी अनधिकृत कत्तलखान्यांवर धाडी टाकणार

    17-Jul-2025   
Total Views | 20

मुंबई, "राज्यात कुठेही गोहत्या सहन केल्या जाणार नाही. यासंदर्भात शासन कठोर कारवाई करेल. गोहत्या रोखण्यासाठी अनधिकृत कत्तलखान्यांत विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात येईल", असा इशारा गृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदम यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.

भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी गोहत्या बंदी संदर्भात उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात ते बोलत होते. यावेळी आमदार अमोल खताळ, अतुल भातखळकर, अस्लम शेख आणि प्रवीण दटके यांनी उपप्रश्न उपस्थित करत चर्चेत सहभाग घेतला. कदम यांनी सांगितले की, गोहत्या गुन्हे वारंवार करणाऱ्यांवर कठोर कारवाईसाठी सध्याच्या कायद्यात सुधारणा केली जाईल. यात १० वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंडात वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच, अशा गुन्हेगारांवर महाराष्ट्र नियंत्रित गुन्हेगारी कायदा (मकोका) लागू करण्याची शक्यता पडताळली जाईल. गोरक्षक आणि स्वयंसेवी संस्था गोहत्येची माहिती पोलिसांना देतात, त्यानुसार पोलिस कारवाई करतात. गोरक्षक, स्वयंसेवी संस्था आणि पोलिसांमध्ये समन्वय वाढवण्यासाठी आणि गोरक्षकांना ओळखपत्र देण्याबाबत पडताळणी करून कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यात गोशाळा चालवल्या जातात, जिथे वृद्ध, दुधाळ नसलेली आणि रस्त्यावरील जनावरे ठेवली जातात. यासाठी शासन मदत करेल, असे कदम यांनी स्पष्ट केले. बदलापूर (पश्चिम) येथे ५१० किलो गोमांस आणि एक वासरू सापडल्याच्या प्रकरणात एका आरोपीस अटक झाली असून, इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील गोमांस सापडलेल्या हॉटेलवर कारवाई होईल आणि आवश्यकतेनुसार हॉटेलचा परवाना रद्द केला जाईल, असेही कदम यांनी सांगितले.


सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121