अवशेषसंपन्न अवचितगड

    10-May-2024
Total Views |
 Avachitgad

महाराष्ट्रातील अवशेषसंपन्न किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजे रायगड जिल्ह्यातील रोहा या तालुक्याच्या गावाजवळ वसलेला अवचितगड. पायथ्यापासून तासाभरात आपण गडाच्या भग्न दरवाजातून गडावर प्रवेश करतो.

पुढे गडाचे सुंदर असे प्रवेशद्वार असून शेजारीच एक शरभशिल्प ठेवलेले आहे. अवचितगड हा किल्ला दक्षिणोत्तर पसरलेला असून, दक्षिणेकडे एक बुरूज, वाड्याचे अवशेष व तोफ आहे. किल्ल्याच्या उत्तर भागात पाण्याची टाकी, शिव मंदिर, तोफ, दरवाजे व मराठीमधील एक शिलालेख आहे. अवचितगडाचे वैशिष्ट्य म्हणजे, किल्ल्याच्या एका भागातून दुसरीकडे जाताना साधारण पाच फूट उंचीचे दिंडी दरवाजे बांधले गेले आहेत. याचे प्रयोजन म्हणजे किल्ल्याच्या कमी उंचीमुळे किल्ल्याचा एखादा भाग जरी शत्रूच्या ताब्यात गेला, तरी दिंडी दरवाजा बंद करून उर्वरित किल्ला व्यवस्थित लढवता येऊ शकतो. किल्ल्याच्या उत्तरेच्या बुरुजावर असलेल्या एका शिलालेखामध्ये किल्ल्याच्या बांधणीविषयी माहिती दिलेली आहे.

गडावरील चाफ्याच्या झाडाखालील जोडटाकी हे अवचितगडाचे प्रमुख आकर्षण आहे. किल्ल्याच्या लहान उंचीमुळे किल्ल्याला चारही बाजूंनी तटबंदी उभारली गेली असून, सुरक्षिततेसाठी गडावर आपल्याला तोफाही पाहायला मिळतात. किल्ल्याच्या पिंगळसई गावाकडून येणारा मार्गही एका दरवाजाने अडवलेला असून सध्या हा दरवाजा भग्नावस्थेत आहे. त्यामुळे उंचीने लहान असला, तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने पूर्णपणे खबरदारी घेऊन उभारणी केलेला अवचितगड म्हणजे शिवरायांच्या दूरदृष्टीचे आदर्श उदाहरणच आहे. अवचितगडाची उंची लहान असली तरी माथ्यावर अवशेषांची संपन्नता असल्याने किल्ला व्यवस्थित पाहण्यास दीड तास लागतो. अवचितगड किल्ल्याला जोडून त्या परिसरातील बिरवाडी, तळागड, घोसाळगड व सुरगड या चारही किल्ल्यांची डोंगरयात्रा व्यवस्थित नियोजन केल्यास सहज शक्य आहे.

-ओंकार ओक