मुंबई (विशेष प्रतिनिधी): गोव्यातील सत्तरी तालुक्यातील नागवे गावामध्ये सोमवारी वनमाणूस म्हणजेच ग्रे स्लेंडर लॉरिसचे रेस्क्यू करण्यात आले. वाळपाई जिल्ह्यात असलेल्या नागवे गावामध्ये वर्षा परवार या मूलीला सोमवार दि. ८ एप्रिल रोजी रात्री ७-८ च्या दरम्यान घराच्या मागे वनमानव कंपाऊंडवर बसलेले दिसले. याविषयीची माहिती तिने तिची आई चंद्रावती परवार आणि भाऊ रामकृष्ण परवार यांना दिली.
भावाने याबाबतची माहिती वाळपाईतील अॅनिमल रेस्क्यू स्क्वॉडला कळविली आणि या स्क्वॉडचे प्रदीप गौंडळकर आणि अमृत सिंघ हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. गावातील वयस्कर माणसांकडून अनेकदा या प्राण्याविषयी चांगल्या-वाईट गोष्टी ऐकायला मिळतात. रेस्क्यू पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत गावकऱ्यांनी या प्राण्याची हळदी कुंकू आणि फुले वाहून पूजा देखील केली.
वनविभागाला याबाबत माहिती कळविण्यात आल्यानंतर स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी शामसुंदर गावस यांनी या ग्रे स्लेंडर लॉरिसला तात्काळ जंगलामध्ये सोडून द्यायला सांगितले. त्याप्रमाणे वाईल्डलाईफ रेस्क्यू स्क्वॉडचे विनोद सावंत आणि विशांत गावकर यांनी या संकटग्रस्त प्राण्याचे रेस्क्यू करत त्याला जंगल अधिवासात मुक्त केले.
ग्रे स्लेंडर लॉरिसची वैशिष्ट्ये...
Gray slender loris हा साधारण माणसासारखा दिसणारा प्राणी असल्यामुळे त्याला वनमाणूस किंवा वनमानव असं म्हंटलं जातं. लॉरिडे कुळातील हा प्राणी उपोष्णकटिबंधीय आणि उष्णकटिबंधीय कोरड्या जंगलात तसेच आर्द्र सखल प्रदेशात आढळतात. भारत आणि श्रीलंकेमध्ये आढळणारा हा प्राणी अतिशय भित्रा, लाजरा आणि शांत असतो. लाजरा असल्यामुळेच त्याला लाजवंती असंही म्हंटलं जातं. साधारण ५ ते १० इंच लांबीचा आणि मोठे डोळे असलेला हा प्राणी नॉक्टरनल म्हणजेच निशाचर असतो.
दक्षिण भारतातील पश्चिम घाटामध्ये मुख्य अधिवास असणाऱ्या या प्राण्याला अधिवासाचे नुकसान, शिकार तसेच तस्करीचा ही धोका आहे. हा प्राणी सर्वभक्षक असून, किडे, पक्ष्यांची अंडी, पाली हे त्यांचे आवडते खाद्य आहे. भारतीय वन्यजीव कायदा १९७२ अंतर्गत शेड्यूल १ मध्ये येणारी ही प्रजात आहे. आययुसीएनच्या यादीमध्ये नष्टप्राय वर्गात मोडणाऱ्या या प्रजातीला कायद्यानुसार सर्वोच्च पातळीचे संरक्षण देण्यात आलंय. जवळजवळ नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या ग्रे स्लेंडर लॉरिस किंवा लाजवंतीला संरक्षण आणि संवर्धनाची गरज आहे.