श्री तशी सौ...

    02-Apr-2024   
Total Views |
Sunita Kejriwal

"त्यांचे शरीर कैदेत आहे, पण आत्मा स्वतंत्र आहे. डोळे बंद करा आणि त्या आत्म्याची अनुभूती घ्या,” इति सुनीता केजरीवाल. केजरीवालांचा आत्मा मुक्त आहे आणि डोळे बंद करून तो भेटू शकतो असे म्हणणार्‍या सुनीता मात्र शरीररूपी अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यासाठी तुरुंगात जातात. तिथे जाण्यापेक्षा सुनीताच मग डोळे मिटून त्यांना भेटूच शकत होत्या की? काय म्हणावे, भारतीय जनता त्यातही दिल्लीकरांना मूर्ख समजणारे हे केजरीवाल दाम्पत्य आणि आप पक्ष!आपण जनतेचे सेवक आहोत, एक रुपयाचांही भ्रष्टाचार करत नाही, असा आव आणत अरविंद केजरीवाल आणि त्यांचे साथी बिनबोभाट दारू घोटाळ्याचा इतिहास रचत होते, असे तरी सध्या चित्र आहे. तर दारू घोटाळ्यात तुरुंगात असलेले आपचे मंत्री आणि त्यांचे नेते अरविंद. या दारूकांड करणार्‍यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणता येईल का? पण, सुनीता केजरीवाल यांचे म्हणणे स्वातंत्र्य सेनानी असेच इंग्रजांविरोधात लढत होते. अरविंदसुद्धा देशभक्त आहेत आणि तेही लढत आहेत. अरविंद केजरीवाल कुणाविरोधात लढत आहेत? देशाचे भले व्हावे म्हणून त्यांनी काही कृती किंवा विचार मांडलेत आणि म्हणून ते तुरुंगात आहेत का? तर नाही. उच्चशिक्षित सुनीता याबाबत चकार शब्द काढत नाहीत. उलट ‘केजरीवाल यांना आशीर्वाद’ नावाचे व्हॉटसअ‍ॅप ग्रुप त्यांनी सुरू केला. केजरीवाल समर्थकांनी या ग्रुपवर केजरीवालांना आशीर्वाद द्यावा, असे सुनीता यांचे म्हणणे. पण, दिल्लीचे दारूकांड आणि त्यानुसार दारू पिऊन जनतेचे काय भले होणार होते? ज्या घरचा कर्ता पुरुष दारूडा असतो, त्या घरची वाताहत पाहा. या पाश्वर्र्भूमीवर केजरीवालांना आशीर्वाद कशासाठी द्यायचा? दारूड्याच्या बरबाद कुटुंबासाठी? त्या घरच्या गृहिणीच्या दुर्दैवासाठी? की त्या घरातल्या बालकांच्या हरवलेल्या बालपणासाठी? कशासाठी? अर्थात श्री आणि सौ केजरीवालांना हे दुःख कळणार नाही.जेव्हा जग कोरोनाने त्रस्त होते, तेव्हा सुनीता केजरीवाल करोडो रुपयांच्या वस्तूंनी घर सजवण्यात व्यस्त होत्या. त्याचवेळी त्यांचे पती अरविंद मात्र साध्या चपला आणि स्वस्तातले मफलर गुंडाळून ‘मी किती साधा सामान्य आहे’ हे लोकांना दाखवत होते. काहीही म्हणा, पतीपत्नीचे ३६ गुण जुळायला हवेत असे म्हणतात. इथे ड्रामेबाजपणात श्री व सौ केजरीवालांचे ३६ आणि ३६ अगदी ७२ गुण जुळलेले दिसतात!


शरिया, हज आणि स्त्री


राम मंदिर, हिंदू आणि मोदी, सीएए-अमित शाह, ट्रॅक्टर आणि योगी याव्यतिरीक्त सध्या भारतीय मुस्लीम जगताच्या सोशल मीडियावर पालघरच्या सना अन्सारी या महिलेचे नाव चर्चेत आहे. सना एकटी पायी हजयात्रा करणार आहे. मात्र, हे तिच्या कौमला अजिबात आवडले नाही. सना औरतजात आहे. ती शरियाच्या विरोधात पतीशिवाय किंवा मेहरमशिवाय एकटी हजला जातेच कशी? तिला हा अधिकार कोणी दिला, असा त्यांचा सवाल.ते म्हणतात, पतीशिवाय ती हज करते? यापेक्षा घरी जा आणि नवर्‍याची सेवा कर, पुण्य मिळेल, तर कुणी म्हणाले, अल्ला तुला असा मार्ग दाखवेल की, तू लवकर अल्लाला प्यारी होशील, तर बहुसंख्य लोक म्हणाले, तू बिना मेहरमची हज करत आहेस तू गुन्हा करत आहेस. काहींनी तर सरळ तिला जगातली सगळ्यात पापी महिला ठरवत तिच्यासाठी ‘दोजख नरक’ वगैरेची सजा आहे, हे सुद्धा सांगितले. शेवटी सनाने जाहीर केले की ती एकटी हजला जात नाही, तर तिचा पती विमानाने मक्केला येणार आणि मग दोघे मिळून हज करतील. मात्र, यावरूनही तिचे कौमचे भाऊ-बहीण संतप्त झालेत. कारण, शरिया कायद्यानुसार दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस महिलेने एकटीने प्रवास करणे हराम आहे. तिच्यासोबत मेहरम किंवा पती असायलाच हवा. मेहरम म्हणजे ज्याच्याशी निकाह होऊ शकत नाही असा पुरुष. या पार्श्वभूमीवर सना पालघर ते मक्का हा प्रवास २०२५ साली पूर्ण करणार आहे. जवळ जवळ एक वर्ष ती पतीशिवाय, मेहरमशिवाय एकटी प्रवास करणार. त्यामुळे सना अन्सारीने शरिया कायद्याचे उल्लंघन करून प्रवास एकटीने करू नये, यासाठी समाजमाध्यमांवर तिला सूचना आदेश वगैरे दिले जात आहेत. तरी बरे ज्या देशात मक्का मदिना आहे, त्या सौदी अरेबियाने २०२२ साली हजला जाण्यासाठी महिलांसोबत पुरुष असणे गरजेचे आहे, हा कायदा रद्द केला. मात्र, तरीही सना हजसाठी एकटी प्रवास का करते, यावर जिंकू किंवा मरूच्या आवेशात भारतीय मुस्लीम जगत चर्चा करत आहे. ‘मेरी मर्जी’ आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याने अभिभूत झालेल्या हिंदूंना हे सगळे अनाकलनीय वाटू शकते. पण, भारतातील बहुसंख्य मुस्लीम शरिया कायदा सर्वोच्च मानतात, असे चित्र आहे. मात्र, ‘जय भीम, जय मीम’ बोलणार्‍यांना इथे ‘संविधान खतरे मे’ वाटत नाही!


योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.