दोडामार्ग - तिलारीत 'ब्लॅक पॅंथर'चे दर्शन: 'या' 'नेचर स्टेच्या आवारात वावर

    28-Mar-2024   
Total Views |
tillari black panther


मुंबई (अक्षय मांडवकर) -
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यामधील 'वाईल्डवन फिल्ड स्टेशन अॅण्ड नेचर स्टे'च्या आवारात दुर्मीळ 'ब्लॅक पॅंथर'चे दर्शन झाले आहे (tillari black panther). या आठवड्यात निसर्ग भ्रमंतीदरम्यान नेचर स्टेमधील कर्मचाऱ्यांना 'ब्लॅक पॅंथर'चे दर्शन झाले (tillari black panther). तिलारीचा हा संपूर्ण परिसर जैवविविधतेने संपन्न असून याठिकाणी दुर्मीळ आणि प्रदेशनिष्ठ जीवांचा अधिवास आढळतो. त्यामुळे दोडामार्ग तालुक्याचे पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यासंबंधीचा निर्णय तातडीने घेणे गरजेचे आहे. (tillari black panther)
तिलारीतील जैवविविधतेचे दर्शन घडवण्यासाठी ओळखले जाणारे 'वाईल्डवन फिल्ड स्टेशन अॅण्ड नेचर स्टे' हे निसर्गप्रेमी पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. निसर्ग भ्रमंतीखेरीच वन्यजीवांआधारित वेगवेगळ्या स्वरुपाच्या कार्यशाळा याठिकाणी आयोजित केल्या जातात. घनदाट अरण्यात राहण्याचा अनुभव आणि दुर्मीळ वन्यजीवांचे दर्शन यासाठी हा नेचर स्टे प्रसिद्ध आहे. या नेचर स्टेकडून वन्यजीवांसंबंधी जनजागृती करण्यासाठी देखील निरनिराळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात. नेचर स्टेच्या आवारात या आठवड्यात 'ब्लॅक पॅंथर'चे दर्शन घडले आहे. नेचर स्टेचे संचालक महेश मांगोरे आणि प्रियंका पालकर हे निसर्ग भ्रमंती करत असताना त्यांना या बिबट्याचे दर्शन झाले. त्यांनी लागलीच या बिबट्याचे छायाचित्रण मोबाईलमध्ये टिपले. पूर्वीपासूनच या भागात ब्लॅक पॅंथरचा वावर आहे. 




'ब्लॅक पॅंथर' हा बिबट्या असून शरीराचे रंग ठरवणारे 'मेलानीन' रंगद्रव्य वाढल्यामुळे त्याच्या शरीरावरील काळे ठिपके (राॅझेट पॅटर्न) पूर्णतः शरीरभर काळे किंवा अधिक काळे होतात. उलटपक्षी 'मेलानीन' कमी झाल्यामुळे 'ल्युकिझम' (Leucism) म्हणजेच पांढरा बिबट्या ही दिसू शकतो. जरी काळा रंग जास्त प्रमाणात असला तरी ठिपके बऱ्याच वेळेला दिसतात. ही एक अनुवांशिक अवस्था आहे. हा कोणत्याही प्रकारचा रोग नाही. 'ब्लॅक पँथर' या नावाचा विचार केला, तर ती एक संयुक्तिक संकल्पना म्हणता येईल. यात भारत आणि आफ्रिकेत मिळणारा काळा बिबट्या, साऊथ अमेरिकेतले काळे जग्वार यांचा समावेश होतो. यांचे लॅटिन भाषेतील कुळ 'पॅंथेरा' असल्यामुळे ही व्याख्या रूढ झाली असावी. मात्र, प्रत्यक्षात ही वेगळी प्रजाती नसून काळया रंगाचे प्रमाण जास्त असणारा बिबट्या किंवा जग्वार हाच 'ब्लॅक पँथर' नावाने ओळखला जातो. भारतात फक्त बिबट्याच आढळत असल्याने आपल्याकडचा काळया रंगाचा बिबट्या म्हणजेच 'ब्लॅक पँथर' होय.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.