ध्येयवेडे राजहंस

    26-Mar-2024
Total Views |
Sevashram

लावणी कलावंतांचे उपेक्षित जगणे समजून घेऊन त्यांच्या मुलांना जीवनाच ध्येय दाखवणार्‍या सुरेश राजहंस यांची ही गोष्ट! सुरेश राजहंस यांचा ‘सेवाश्रम’ हा प्रकल्प अशा तमाशा कलावंतांच्या मुलांसाठी काम करतो. ‘सेवाश्रम’चा हा प्रवास लेखाच्या माध्यमातून उलगडण्याचा केलेला हा प्रयत्न...

सुरेशदादांना अगदी बालपणापासून समाजासाठी काहीतरी करायची इच्छा होती. दादांच्या लहानपणी त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती साधारण होती. त्यामुळे शाळेपासूनच सुरेशदादा खर्चासाठी छोटी-मोठी काम करू लागले. आपल्या शाळेचा खर्च स्वतः भागवू लागले. पुढे कॉलेजमध्ये असताना अनेक कामे करून त्या पैशातून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केले. पुढे जाऊन त्यांनी पत्रकारितेचा कोर्स पूर्ण केला आणि ‘बीएड’देखील केले. काही वर्षे शिक्षक म्हणून नोकरीदेखील केली. परंतु, त्यांच्या मनात कुठेतरी शिक्षणाच्या माध्यमातून समाज सेवा करण्याची उर्मी होती. त्याच काळात दादा ‘शांतीवन’चे दीपकदादा नागरगोजे यांच्या संपर्कात आले. त्यावेळी ‘शांतीवन‘ हळूहळू आकाराला येत होते. त्यांच्याबरोबर काही दिवस त्यांनी काम केले. याच कामात कलावंतांच्या तमाशाचे फड पाहिले, त्यांच्या समस्या समजून घेतल्या. अनेक हृदयद्रावक घटना ऐकल्या, पाहिल्या. त्यानंतर त्यांनी मात्र फक्त तमाशा कलावंतांच्या मुलांसाठी वेगळे काम करायचे ठरवले.

तसे पाहायला गेले, तर लावणी ही महाराष्ट्राची प्रमुख आणि लोकप्रिय कला. महाराष्ट्राच्या लोककलेचे वैभव मिरवणार्‍या या लोककलेच्या भरजरी पदराची किनार मात्र फाटकी आहे. प्रत्यक्षात या कलाकारांच आयुष्य मात्र अत्यंत अस्थिर, हलाखीचं असते, त्यातून कलावंतांच्या मुलांचे खूप हाल होतात. आयुष्याची परवड होते. आई-वडील सतत या गावातून त्या गावात, कार्यक्रम करण्यासाठी जातात. त्यामुळे मुलांना धड घर नाही, शाळा नाही, कुटुंब नाही, संस्कार नाही, अशा परिस्थितीत ही मुले जगत असतात. याच कारणाने ही मुले कधी व्यसन करतात, तर कधी गुन्हेगारी प्रवृत्तीची होतात. सुरेश राजहंस यांचा ‘सेवाश्रम’ हा प्रकल्प अशा तमाशा कलावंतांच्या मुलांसाठी काम करतो आणि ‘सेवाश्रम’च्या कामाला सुरुवात झाली. त्या सुमारास दादांच लग्नही ठरत होते. सुरेशदादांच्या या कामाबद्दल कळल्यानंतर लग्न थोडं अडचणीत आलं. पण, मयुरीताईंनी खंबीरपणे त्यांना साथ देण्याचे ठरवले. लग्नाच्या सातव्या दिवशी १५ मुलांचं मातृत्व मयुरीताईंनी आनंदाने मान्य केले.

तमाशा कलावंतांच्या कुटुंबातून आलेल्या मुलांना भावनिकदृष्ट्या खूप सांभाळावे लागते. मुलांना वागण्या-बोलण्याचे संस्कार करावे लागतात. मुख्य म्हणजे भाषेचे संस्कार करावे लागतात. संस्थेत दाखल झाल्यापासून पहिली दोन वर्ष मुलांवर खूप काम करावे लागते. ही मुले अत्यंत वेगळ्या परिस्थितीतून आलेली असतात. त्यामुळे त्यांच्यावर विशेष मेहनत घेऊन त्यांना सक्षम केले जाते. मुलं संस्कारक्षम झाल्यानंतर त्यांना शाळेत पाठवले जाते. ही सगळी मेहनत मयुरीताई आणि सुरेशदादा अत्यंत संयमाने आणि चिकाटीने करतात. या प्रकल्पाची सुरुवात एका अगदी छोट्या पत्र्याच्या शेडमध्ये झाली. २०१५ मध्ये परतीचा पाऊस खूप जोरात पडला आणि त्या पत्र्याच्या शेडचा एक पत्रा खाली पडला. सुदैवाने दुर्घटना टळली, पण पुन्हा निवार्‍याचा प्रश्न पुढे आला आणि डोक्यावर सुरक्षित छप्पर असले पाहिजे, असे प्रकर्षाने जाणवले. याच वेळेला सुरेश जोशी यांनी पाच लाख रुपये देऊन मदतीचा हात पुढे केला. त्याच काळात बीडमधील ’जाणीव’ नावाच्या ग्रुपने भेट दिली आणि त्यांनी या ग्रुपच्या मदतीने आमदार विनायक मेटे यांची मदत मिळवून दिली आणि एका छोट्या इमारतीचा श्री गणेशा झाला. त्यानंतर प्रकल्पात मुलांसाठी सहावीपर्यंतची शाळा सुरू केली.

तू बुद्धी दे, तू शक्ती दे, नवचेतना, विश्वास दे...

अशी सकारात्मक भावना ठेवत संस्थेची वाटचाल प्रगतिपथावर आहे. या प्रगतीत अनेक लोकांचा सहभाग आहे. ‘वुई टुगेदर फाऊंडेशन’ ही संस्था नियमितपणे धान्य रूपाने पाठीशी उभी आहे. ‘वुई टुगेदर फाऊंडेशन’ (धान्य बँक कन्सेप्ट) यांच्या मदतीमुळे संस्थेचे ओझे हलके होते व मुलांसाठी इतर भौतिक सुविधा निर्माण करण्यात वेळ देता येतो. त्यामुळे त्यांची मदत म्हणजे आम्हाला कामासाठी प्रेरणा देणारी आहे. तसेच संस्थेमुळे मूलं स्वावलंबी होतात. मुलांना स्वतःच्या पायावर उभे राहिलेले बघताना खरच आनंद आणि समाधान मिळते, अशी भावना दादा व्यक्त करतात. दादा म्हणतात की, अडचणीच्या वेळेला कायमच सर्व प्रकारची मदत करणारे सुरेश जोशी आणि दीपकदादा नागरगोजे हे संस्थेचे आधारस्तंभ आहेत. यांच्या आणि असंख्य हितचिंतकांमुळे आज ‘सेवाश्रम’ उत्तम काम करत आहेत.

११-१२ मुलांबरोबर चालू झालेल्या शाळेत आज १२८ मूलं शिकत आहेत. ‘सेवाश्रम’चा एक विद्यार्थी ‘डीएड’ करून पुन्हा शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाला आहे, हे या कामाचे यश म्हटले पाहिजे. आज या संस्थेने मोठ्या मुलांच्या उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून छत्रपती संभाजीनगर येथेदेखील काम सुरू केले आहे. याठिकाणी १५ मुले उच्च व तंत्र शिक्षण घेत आहेत, तर नुकतीच एका मुलाला चांगल्या पगारावरमोठ्या कंपनीमध्ये नोकरी लागली आहे. पुढील दोन वर्षांत दहा मुले स्वतःच्या पायावर उभी राहतील. प्रकल्पाच्या पुढच्या टप्प्यात जून २०२४ पासून मुलींसाठीचे काम सुरू होते आहे. ५० मुलींची राहण्याची आणि शिक्षणाचीव्यवस्था जूनपासून सुरू होईल.



-कल्याणी काळे