या ‘ललित कले’मागे दडलंय तरी काय?

    06-Feb-2024
Total Views |
Pune Lalit Kala Kendra Incident

पुण्याच्या ललित कला केंद्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली रामायणाच्या विडंबनाचा झालेला लज्जास्पद प्रयोग हा सर्वस्वी निषेधार्हच! पण, समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करता, हे असे प्रकार नेमके का घडतात? त्यामागचा मूळ हेतू तरी काय? समाजमानस याकडे नेमके कसे बघते आणि त्याकडे कसे बघायला हवे? याची समीक्षा करणारा हा लेख...
 
पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात राम-सीतेची पात्रं घेऊन त्यांच्या तोंडी बीभत्स शिव्या, व्यसनं व त्यांना नकारात्मक व्यक्तिछटेत दाखविण्याचा प्रयत्न विद्यापीठातील एका नाटकात काहीजणांनी केला. काही रसिक प्रेक्षकांनी त्यांच्या या प्रयोगाला प्रोत्साहन दिले नाही. कारण, कोणत्याही कलाकृतीत ‘निगेटिव्हिटी’चा एका मर्यादेपलीकडे आस्वाद घेणं कोणाला आवडेल? ते असो. तो प्रयोग बंद झाला व त्याच्या बातम्या सर्वांनी सोशल मीडिया, वृत्तपत्रात वाचल्या असतील, वृत्तवाहिन्यांवर पाहिल्याही असतील. या घटनेच्या निमित्ताने पुणे हे सुविद्य, सकारात्मक लोकांचं शहर आहे, असा ज्या सुविद्य जनांना अभिमान आहे, तो नष्ट करून इथे भरपूर नकारात्मकता विद्यापीठाचा आश्रय घेऊन आनंदाने नांदते, याचा प्रत्यय आला.

पण, ही काही पहिलीवहिली घटना नव्हे. हा प्रसंग पाहिल्यानंतर सामान्य माणसाला रामाला काल्पनिकतेचं राष्ट्रीय स्तरावर प्रतिज्ञापत्र देणारे, शूर्पणखेला सहानुभूतीने पाहणारे, महिषासुराचा उत्सव करायला प्रोत्साहन देणारे अशी अनेक मंडळी नक्कीच आठवतील. जर आठवत नसतील, तर ते आठवावेत म्हणून त्यांची जंत्री दिली आहे. कारण, ललित कला केंद्रातील घटनेत व वरील लोकांत एक ठळक साम्य आहे. ते हे की, या लोकांच्या सर्वसाधारण भावनेच्या पुष्कळ विरोधी व वेगळंच ’असं काही तरी’ यांच्या मांडणीत असतं. त्यांना व त्यांच्या चळवळीला ‘प्रबोधन’, ‘विवेकाचे जागले’, ‘परिवर्तनाच्या पालखीचे भोई’, ‘संवेदनशील कलाकार’, ‘मुक्त विचारस्वातंत्र्याचे पुरस्कारकर्ते’ अशा विविध नावांनी समाजात ओळखलं जातं किंवा तशा शब्दांत त्यांची ओळख करून दिली जाते.

सामान्य लोकांना वाटतं, काय हे वेगळंच, विचित्र बोलतायंत हे, आम्हाला आजपर्यंत माहीत नसलेलं? यांना अशी विरोधी मतं एवढ्या तीव्रतेने का बरं वाटत असवीत? त्यावर त्याचं उत्तम प्रकारे तर्कयुक्त स्पष्टीकरण त्यांच्याकडे असतं. पण, एवढ्यावर हे संपत नाही. तितक्यात दुसरी बाजू सरसावते. ती यांना संस्कृतीविरोधी, भाडोत्री कलाकार/पत्रकार, बुद्धी विकलेले विचारवंत, परकीय ताकदीने फूस लावलेले इत्यादी म्हणते. त्यांची तशी पार्श्वभूमी, त्यांचे विविध वादग्रस्त संस्थांशी असलेले संबंध वगैरे समोर आणते. दोन्ही बाजूंना समाजातील मोठे, वजनदार, प्रभावी, विचारवंत व्यक्ती असतात. एक बाजू त्या सर्व गोंधळाला ‘प्रबोधनाची चळवळ’ म्हणवते, तर दुसरी बाजू त्याच गोंधळाला ‘विचारसरणीचं युद्ध’ म्हणते. पण, या सर्व धुमश्चक्रीचं कारण काय, हे सामान्य माणसाला कळत नाही. कारण, तो ’जगा व जगू द्या’ या उक्तीनुसार चालणारा असतो. त्याचं स्वरूप काय, हेही त्याला समजत नाही. पण, एवढं मात्र त्याला समजतं की, हे दुर्लक्ष करण्यासारखं लहान प्रकरण नक्कीच नाही आणि मग अशा घटना दुखरी नस जशी विशिष्ट ताण पडल्यावर त्रास देते, तशी विशिष्ट प्रसंग घडल्यावर परत आठवते आणि तेव्हा ’पाहू तरी या त्रासाच्या मुळाशी काय आहे’ अशा विचाराने त्याच्या मूळ कारणाचा आपण शोध घेऊ लागतो.
 
पुणे ललित केंद्रातील कार्यक्रमाच्या बातमीने, ज्यांची तुखरी नस दाबली गेली आहे, त्यांच्यासाठी पुढील लेखन आहे.
हे वैचारिक, कलाविश्वातील वादविवाद निरागस कलाधिष्ठित, तात्विक असण्याची वर्षं फार पूर्वी संपली. त्यामुळे हे वाद व याच्या दोन्ही बाजू निव्वळ कला कशी प्रदर्शित करावी, यासाठी अजिबात भांडत नाहीयेत, हे सर्वप्रथम समजून घ्यायला हवं. हे तर कलाक्षेत्र - इथे तर रंग, कुंचला, लेखणी, कल्पकतेचं, धुंद, तरल भावनांचं काम. पण, त्यातही जेव्हा इरेला पेटलेली भांडणं चालतात, तेव्हा ती परिवर्तनाची निव्वळ वैचारिक चळवळ नसते, कलेच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याची मुक्तीही नसते, हे १०० टक्के लक्षात घेतलं पाहिजे. पण, तिला धड ‘संघर्ष’ किंवा ‘युद्ध’ही म्हणता येत नाही. कारण, हातात तर केवळ लेखणी, कुंचला, रंग. मग याचा अर्ध नेमका कसा लावायचा? शास्त्रीय विचाराने याचा काही निर्णय लावता येणार नाही का? जर तसा करता आला तर त्याला आपण भावनिक न होता केलेला विज्ञानाधिष्ठित, योग्य निर्णय म्हणता येईल. त्यासाठी हे सर्व कशासाठी, हे जाणून घेऊ - हे सर्व घडतं बदलासाठी, बदल घडवण्यासाठी. काही कलावंत, विचारवंतांना (सोप्या भाषेत, माणसं) वाटतं की अमुक प्रकारचा बदल समाजात, आजूबाजूला व्हायला हवा व ते अगदी तीव्रतेने वाटतं.
 
एखाद्या व्यक्तीला जेव्हा समाजात कोणताही बदल घडवावासा वाटतो व ती त्यासाठी प्रयत्न करते, तेव्हा समाजात अस्वस्थता येतेच. एखादी व्यक्ती किंवा संस्था किंवा विचारसरणी (बदलाचं केंद्र) जेव्हा अशा बदलाचे प्रयत्न करते, तेव्हा ते वैचारिक व प्रत्यक्ष दोन्ही स्तरांवर असतात. समाजातील भावनिक, वैचारिक बदल हे कला चळवळी, शिक्षण, वैचारिक साहित्य, काव्य, चित्रकला, शिल्प, ललित साहित्य, फिल्म्स, नाटके यातून घडतात, तर प्रत्यक्ष बदल विविध संस्थांची कार्य, उपक्रम, कायदेशीर, राजकीय, आर्थिक चळवळी, आंदोलनं यातून घडतात.
 
बदल करणार्‍या विचारसरणीप्रमाणे ज्यात बदल होत आहेत, त्या समाजाची स्वतःचीही एक विचारसरणी असते. हे बदल स्वीकारताना समाज आपल्या विचारसरणीनुसार प्रतिक्रिया देतो. या प्रतिक्रियाही प्रतिक्षिप्त (नकळत दिल्या गेलेल्या) असतात किंवा जाणीवपूर्वक दिल्या गेलेल्या. हे बदलाचे प्रयत्न सातत्यपूर्णरित्या होत राहिले, तर ते बदल समाजाकडून स्वीकारले जातात किंवा पूर्णत: नाकारले तरी जातात. या सर्व घडामोडी कागदावर लिहायला सोप्या वाटल्या, तरी समाजासाठी व त्या बदल घडवणार्‍या केंद्रकासाठी त्या घर्षणयुक्त अर्थात संघर्षमय असतात. तो संघर्ष वैचारिकही असतो व कधी कधी प्रत्यक्षसुद्धा! अशा वेळी हे विचारांमधील घर्षणच पुढे सुरू राहीलं की व्यक्तींमधील, संस्थांमधील, समाजांमधील प्रत्यक्ष संघर्षाचं रूप घेतं व त्यातील सीमारेषा दिसायला फार धूसर असते. जसा युद्धातील माजलेल्या धूळ, गोंगाट, गोंधळात आपला कोण व शत्रूसैनिक कोण, हे दिसत नाही, त्याप्रमाणे या वैचारिक संघर्षातील समाजाला कल्याणकारक विचार कोणता व विरोधी कोणता? हे कळत नाही. ज्या दोन्ही बाजू आहेत, त्यातील कोणाचा हेतू चांगला, कोणाचा वाईट? समाजाचं कल्याण कोणत्या बाजूने होणार, हे ठरवणं सामान्य माणसासाठी अतिकठीण होतं आणि समाजातील बहुसंख्य लोक हा संघर्ष नुसता पाहत बसतात. ते कोणती एक ठाम भूमिका घेऊ शकत नाहीत. कारण, भारतीय लोक अब्राहमिक धर्मीयांप्रमाणे पोधीवादी कर्मठ नाहीत आणि म्हणून ते विचार केल्याशिवाय (नुसतं धर्मगुरूने सांगितलंय म्हणून) या संघर्षात भाग घेऊ इच्छित नाहीत.
 
आता मानसशास्त्राप्रमाणे विचार करून पाहू. व्यक्तींचाच समाज बनतो व त्यांच्या भावनांचं समाजमन बनतं, हे सर्व जाणतात. व्यक्तीच्या बाबतीत काय किंवा समाजाच्या, जेव्हा चांगला बदल घडवून आणायचा असतो, तेव्हा त्या ’बदला’बद्दल व्यक्ती किंवा समाज सकारात्मक असावा लागतो, हे ही आपण जाणतो. त्याचबरोबर ’स्वतः’बद्दलही व्यक्ती किंवा समाज आत्मविश्वासपूर्ण असावा लागतो, तर ते बदल घडतात, नाहीतर ते नाकारले जातात. ज्या बदल घडवणार्‍या व्यक्तींना खरी कळकळ असते, ते व्यक्तीचा/समाजाचा आत्मविश्वास व सकारात्मकता तोडत, नासत नाहीत. उदाहरणार्थ आई. आपल्या मुला/मुलीचा आत्मविश्वास तोडून त्याच्यात ‘मला हवा तो’ बदल घडवायचा हट्ट कोणतीही चांगली आई धरणार नाही. कारण, त्यामागे मुलाच्या कल्याणाची प्रामाणिक कळकळ असते. ती आपल्या बाळाला त्या बदलाबद्दल सकारात्मक गोष्टी सांगते. त्याचा भाव दुखावत नाही. ’तुला ते जमेल’ असा आत्मविश्वास देते व मग तो बदल घडवते. हीच स्थिती आपल्या समाजात संतांनी केलेल्या परिवर्तनाची दिसेल. भारतीय संतांनी कधीही समाजाचा भाव दुखवून, आत्मविश्वास, समाजातली चांगली प्रतीकं तोडून सुधारणा केलेल्या नाहीत, म्हणून त्यांनी केलेले बदल टिकाऊ बनले.

दुसरे म्हणजे बदल घडवण्यामागे असलेला अहंकार. ‘मी जे म्हणेन तेच विचार बरोबर, बाकीचे चूक’ हा अहंकार जितका तीव्र तितकी बदल घडविण्यामागील दांभिकताही मोठी.

तिसरे म्हणजे, विचारांची संलग्नता - म्हणजे व्यक्ती ज्या स्व-प्रत ज्या आदर्श प्रतीकांचं, स्वविषयक जाणिवांचं चिंतन करते, त्या विचारांतूनच तिला उन्नत बदल घडवायला मदत करणे. तिचं वैचारिक विश्व नाकारून तिसरीच विचारसरणी व्यक्ती, समाजावर लावणे हे प्रामाणिक बदलांचं लक्षण नव्हे.

सारांश
 
बदलांचा प्रकार - १) समाजाचा आत्मविश्वास वाढवणारा, व सकारात्मकता वाढवणारा २) समाजाचा भाव न दुखावणारा ३) अहंकार नसलेला व ४) समाजाची स्वतःचं जगण्याचं नैसर्गिक मॉडेल, रचनेमध्येच त्याला उन्नत बनवणारा असेल तर-
ते बदल, कलाकृती, विचार, चळवळी, कार्य बाहेरून संघर्षमय दिसलं, तरीसुद्धा समाजासाठी खरं परिवर्तन असतं. उदा. छत्रपती शिवाजी महाराजांची राज्यस्थापना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात अनेक युद्ध दिसतील. पण, त्यांनी जे बदल घडवले, त्यात वरील गुण असल्यामुळे ते युद्धाचं, धामधुमीचं कार्यसुद्धा भारतीय समाजासाठी प्रबोधन, परिवर्तन ठरलं.

बदलांचा प्रकार - १) समाजाचा आत्मविश्वास तोडणारा व नकारात्मकता वाढवणारा २) समाजाचा भाव सतत दुखावणारा असेल, ३) अहंकारी असलेला व ४) समाजाची स्वतःचं जगण्याचं नैसर्गिक मॉडेल, रचना, प्रतीकं सोडायला लावणारा.

ते बदल, कलाकृती, विचार, चळवळी, कार्य बाहेरून प्रबोधनमय दिसलं तरीसुद्धा समाजासाठी तो संघर्ष, युद्ध असतं. उदा. ब्रिटिशांनी निर्माण केलेली शिक्षणपद्धती. ब्रिटिशांनी आधुनिक पाश्चात्य शिक्षण भारतात रूजवलं, ते स्थानिक समाजाचा आत्मविश्वास खच्ची करून, त्यांची संस्कृती हीन ठरवूनच. म्हणजे, समाजासाठी बाह्यरूपाने त्या सुधारणा, प्रबोधन वाटलं तरी, ते प्रत्यक्षात भारतीय समाजाविरूद्ध ब्रिटिशांनी पुकारलेलं गुप्त युद्ध, संघर्षच होता.

पुणे विद्यापीठातील ललित केंद्रात दाखवलेल्या नाटकाला वरील निकषांत बसवून पाहिलं पाहिजे. ते नाटक घडवू इच्छित असलेल्या वैचारिक बदलाचं निरीक्षण केले, तर तो बदल खालील प्रकारचा असेल. -

१) समाजाचा आत्मविश्वास तोडणारा (दैवतं पळपुटी दाखवणे), व नकारात्मकता वाढवणारा (बीभत्स शिव्या, व्यसनं दाखवणे)
 
२) समाजाचा भाव दुखावणारा (उपास्य दैवताची हेटाळणी करणारा)

३) समाजाची स्वतःचं जगण्याचं नैसर्गिक मॉडेल (धार्मिक संवेदना), प्रतीकं (राम-सीता) सोडायला प्रवृत्त करणारा
हे तीन पैलू स्पष्ट दिसताहेत. याचा समाजशास्त्रीय अर्थ स्वच्छ आहे. त्यातील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक कितीही भाबडे असतील तरीही या कलाकृतीमुळे होणारे बदल सामाजिक नुकसान करणारे आहेत, हे सिद्ध होतं. हे लक्षात घेऊन प्रत्येक विचारी माणसाने या नाटकाला, त्याच्या समर्थकांना व त्यातील कलाकारांना प्रतिसाद दिला पाहिजे.
 
पण, हे सगळं इथे या नाटकासोबत संपत नाही. एक एक नाटक, कलाकृती, पुस्तक, चित्रपट, लेख चांगला किंवा वाईट मानसशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय बदल घडवत असतो. त्याची काळजीपूर्वक समीक्षा-विश्लेषण करणं, त्यातील बदलाचा रोख समजून घेणं व त्यानुसार त्यातील ‘कंटेंट’ ग्रहण करणं, त्यावर शक्ती-बुद्धीनुसार योग्य तिथे (किमान आपल्या कुटुंबात, मित्रमैत्रिणींत) व्यक्त होणं हे जाणत्या विचारी मनुष्याचं सामाजिक नैतिक कर्तव्य आहे. लवकरच विचारांची धूळ खाली बसेल व आपल्याला कळू लागेल की, साहित्य-ललित कलेच्या विंगेमागे कधी समाजकल्याणरूप प्रबोधन आहे आणि कधी प्रबोधनरूप लढाई?

अमित देवधर 
(लेखक समाजशास्त्र अभ्यासक आहेत.)
९०११०२५७१०
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.