हृदयी वसंत फुलताना...

    13-Feb-2024
Total Views |
Article on spring season

आज माघ शुद्ध पंचमी. हा दिवस म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाचा दिवस मानला जातो. ऋतुराजाच्या स्वागताचा हा सण ‘वसंत पंचमी’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने ‘सुवसंतक’, ‘वसंतोत्सव’, ‘मदनोत्सव’ साजरा करण्याची प्रथा होती, असे संस्कृत साहित्यातून दिसते. त्याविषयीचा या लेखात घेतलेला सविस्तर आढावा...

प्रफुल्लचूताङ्कुरतीक्ष्णसायो
द्विरेफमालाविलसद्धनुर्गुणः।
मनांसि वेद्धुम् सुरतप्रसङ्गिनां
वसन्तयोद्धा समुपागतः प्रिये॥ ऋतुसंहार (६.१)
आंब्याच्या मोहराचे बाण आणि त्याच्याभोवती गुंजारव करणार्‍या भुंग्याचे जणू धनुष्य घेऊन हा वसंत योद्धा आता अवतरला आहे. ऋतूसंहार काव्याच्या शेवटच्या सर्गात ऋतूराज वसंताची महती सांगताना महाकवी कालिदास यांचे हे शब्द खरंच वसंताच्या आगमनाची द्वाही पिटतात.
 
पृथ्वीच्या साडेतेवीस अंशांनी कललेल्या अक्षामुळे पृथ्वीवर विलक्षण ऋतूचक्र निर्माण झाले आहे. पाश्चात्य देशात स्प्रिंग, समर, ऑटम, विंटर हे चारच ऋतू मानले जात असले, तरी भारतीयांनी मात्र निसर्गातील सूक्ष्म बदलांचे अवलोकन करत वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर अशा सहा ऋतूंचे ऋतूचक्र मानले आहे. सहाही ऋतूंमधला अनभिषिक्त राजा म्हणजे वसंत! भौगोलिकदृष्ट्या सूर्य वसंत संपात बिंदूवर येण्याच्या सुमारास उत्तर गोलार्धात वसंत ऋतू बहरायला लागतो. दिनदर्शिकेप्रमाणे फाल्गुन आणि चैत्र हे वसंतांचे महिने मानले गेले आहे. पण, हा विलक्षण ऋतू अशा कृत्रिम बंधनांमध्ये अडकत नाही. एखाद्या राजाप्रमाणे तो आपल्याच मर्जीने येतो आणि आपल्या आगमनाची दवंडी पिटायला आपल्या सेवकांना जणू पुढे पाठवतो. माघ महिन्यामध्ये उत्तरायणाबरोबर वसंताची चाहूल लागते. वातावरणातील थंडी कमी होत उबदारपणा वाढू लागतो.

पानगळीमुळे बोडक्या दिसणार्‍या झाडांना नवी पालवी फुटू लागते. कोवळ्या पानांतून कोकिळेचा पंचम स्वर ऐकू येऊ लागतो. नवी पालवी, फुलांचा बहर, पक्ष्यांचा किलबिलाट निर्धारित वेळेआधीच वसंत ऋतू आल्याचे चाहूल देतात. माघ महिन्यापासूनच वसंताची लक्षणे दिसण्याबाबत संस्कृत कवींनी सुंदर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या मते, हा ‘ऋतूंचा राजा’ असल्याने त्याच्या सन्मानार्थ इतर पाच ऋतूंनी आपले आठ दिवस काढून एकूण ४० दिवसांचा नजराणा त्याला जणू भेट दिला आहे आणि म्हणून ‘माघ शुद्ध पंचमी’ हा वसंताच्या आगमनाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. ऋतूराजाच्या स्वागताचा हा सण ‘वसंतपंचमी’ म्हणून साजरा केला जातो.

वसंत म्हणजे सृष्टीचे रसरशीत, वसंत म्हणजे सळसळते चैतन्य, वसंत म्हणजे नवनिर्मितीची चाहूल. शिशिराच्या कडाक्याच्या थंडीमुळे सृष्टी गारठली असते. पर्णहीन झाडे वठलेल्या म्हातारपणासारखी निस्तेज दिसतात. सूर्याचे उत्तरायण सुरू होताच दिवस मोठे होत उबदारपणा वाढू लागतो. उदासीनतेचे मळभ दूर होत चैतन्याची चाहूल लागते आणि महिन्या दीड महिन्यांतच आतुरलेली सृष्टी वसंत तारुण्य ल्यायला सज्ज होते. थंडी ओसरून उन्हाचा ताप वाढण्यापूर्वीचा हा सुखकर काळ. या सुमारास अर्जुन, ताह्मण, सीताअशोक, कुसुंब, बेल अशा बहुतांश झाडांना नवी पालवी फुटू लागते. ऋतुराजाच्या आगमनाने मोहरून जाऊन फळांच्या राजा आंब्याला मोहोर फुटतात.

पळस आणि पांगार्‍याची झाडं अंगभर केशरी फूलं माळून त्याच्या स्वागताला नटूनथटून तयार होतात. पिवळ्या धमक फुलांच्या पताका फडकवत अमलतास बहरू लागतो. या केशरी पिवळ्या रंगांच्या उधळणीत नीलमोहोर, ताह्मणी, अंजनी यांचे निळसर फूल लक्ष वेधून घेतात. एरवी रुक्ष वाटणारी काटेसावर लाल फुलांनी सजते. सृष्टीच्या या तारुण्याची किमया फक्त दिसतच नाही, तर चक्क ऐकूदेखील येते. वसंत हा बर्‍याच पक्ष्यांचा विणीचा हंगाम. वसंताच्या कामबाणांनी विव्हळ नर पक्ष्यांनी माद्यांना घातलेली वनात गुंजत राहते. फुलाफुलांवर फिरणार्‍या भुंग्यांचा गुंजराव गुंजत राहतो. या सृष्टीसौंदर्याला ‘वनश्री’, ‘वासंती’, ‘वसंतश्री’, ‘वसंतशोभा’ अशी सार्थ नावे आहेत. माऊलींच्या शब्दात वर्णन करायचे, तर

जैसे ऋतुपतीचे द्वार। वनश्री निरंतर। वोळगे फळभार। लावण्येसी॥
निसर्ग असा चिरतरुण झाल्यावर याचे तरंग मानवी मनावर उमटल्याशिवाय राहणार नाहीच. वसंत हा कामदेवाचा परममित्र मानला जातो. मुद्गल पुराण अनुसार वसंत ऋतूत फुलांचा बहार, सुगंधी वातावरण, पक्ष्यांचे कूजन, फुललेली उपवने-उद्याने यांच्यात मदनाचा वास असतो. वसंतातील अशोक, अरविंद (पांढरे कमळ), आम्रमंजरी (आंब्याचा मोहोर), नवमल्लिका (चमेली), नीलोत्पल (निळे कमळ) ही पाच प्रमुख फुले म्हणजे जणू मदनाचे पाच पुष्पबाण आहेत. या बाणांनी मदन तरुणांचे मन घायाळ करतो. वसंताचे सुंदर रंग आणि मधाळ गंध अनुभवत मानवी मनदेखील झुलू लागते. कवियत्री इंदिरा संत म्हणतात, तसं

आला वसंत, वसंत आला, तनमनाचा झाला हिंदोळा
रंग नहाळी गंध जिव्हाळी, कोर्‍या फांदीला धुंद कोवळी॥
माणसाचं कशाला, स्वतः भगवंतानाही या ऋतूची मोहिनी पडलेली दिसते. गीतेचे गहन तत्वज्ञान सांगताना ‘ऋतुनां कुसुमाकर:’ असे सांगत ‘वसंत म्हणजे मी स्वतः आहे,’ असे श्रीकृष्ण ठणकावून सांगतात.
 
वसंत ऋतूत शरीरात होणार्‍या बदलांची दखल घेत आयुर्वेदाने आहार-विहाराची पथ्येही सांगितली आहेत. पचायला जड, आंबट आणि अति गोड पदार्थ टाळावेत. दिवसा झोप घेऊ नये. रोज हलका व्यायाम करावा. कोमट पाण्याने स्नान करून शरीरावर चंदन, अगरू यांचा लेप लावावा, असे सांगितले आहे. वसन्ते निचितः श्लेष्मा दिनकृद्भाभिरीरितः। कायाग्निं बाधते रोगांस्ततः प्रकुरुते बहून्॥-चरक संहिता. वसंत ऋतूमध्ये थंडीत शरीरात साचलेला कफ सूर्याच्या उष्णतेने वितळू लागतो आणि शरीरात साठून राहतो. परिणामी, सर्दी, दमा, अपचन, आम्लपित्त असे विकार बळवतात. यावर वमन हे पंचकर्म अत्यंत प्रभावी ठरते.

भारतीयांना अगदी वैदिक काळापासूनच वसंताने भूरळ घातली आहे. वसंत ऋतूतील मासांना ‘मधू’ आणि ‘माधव’ अशी सार्थ नावे वैदिक वाङ्मयात आढळतात. ‘मधु वाता ऋतायते मधुं क्षरन्ति सिन्धवः’ असे म्हणत वसंतऋतूत फुलांवरून वाहत गोड झालेल्या हवेच्या झुळकीची कामना केली आहे. वसंतात मधाळ झालेल्या नद्या, मधाळ वातावरण इतकंच काय तर गाईचं मधाळ दूध यांच्या इच्छेतून या मधुमासाचे गुणगान केलेले आढळते.

या ऋतूचे रसभरीत वर्णन जवळपास सगळ्याच संस्कृत साहित्यिकांनी केलेले आढळते. महाकवी कालिदास तर वसंतवेडा. आपल्या सगळ्याच कलाकृतीत वसंताचे वर्णन केल्याशिवाय जणू त्याला चैन पडत नाही. ’मालविकाग्निमित्र’ नाटकाच्या तिसर्‍या अंकात राजा अग्निमित्र वसंतोत्सवाच्या सौंदर्याने भारावून जाताना दिसतो. ‘मेघदूत’ हे खरं तर वर्षाऋतूचे काव्य. पण, त्यातही अलकापुरीचे वर्णन करताना वसंत डोकावून जातो. ‘कुमारसंभवम’ध्ये विरक्त शंकराच्या मनात पार्वतीविषयी प्रेम निर्माण करण्याच्या कामगिरीवर आलेला मदनाला साहाय्य करायला मदनसखा वसंत अवतरतो. ऋतूसंहारमध्ये पाच ऋतूंचे वर्णन केल्यावर शेवटी ऋतुराजाचे वर्णन करताना कालिदासाची लेखणी अधिक बहरते.

द्रुमाः सपुष्पाः सलिलं सपद्मम् स्त्रियः सकामाः पवनः सुगन्धिः।
सुखाः प्रदोषाः दिवसाश्च रम्याः सर्वं प्रिये चारुतरं वसन्ते॥ ऋतुसंहार (६.२)॥
या पंक्तीचा धनंजय बोरकर यांनी केलेल्या ऋतूसंहारमधील स्वैर अनुवाद म्हणजे,

पानोपानी फुले डंवरली जलीजली कमळे
मुक्त खेळता वायुसंगे सुगंधही दरवळे
सुखद भासते दिवसमान अन प्रसन्न तिन्हिसांजा
भाव मनीचे उत्कट करि तो प्रसन्न ऋतुराजा
अशा या ऋतुराजाच्या स्वागतासाठी वसंतपंचमीपासून फाल्गुन पौर्णिमेपर्यंत वसंतोत्सव साजरा केला जातो. प्राचीन साहित्यात ‘सुवसंतक’, ‘वसंतोत्सव’, ‘मदनोत्सव’, ‘अशोकोत्सव’, ‘अनंगोत्सव’, ‘दोलोत्सव’ अशा वसंत उत्सवांचे उल्लेख वारंवार आढळतात. सुवासिक जलाने रस्ते सुगंधित केले जात असत. तोरणे माळा यांनी नगर सुशोभित केले जात असे. नगरातील सगळे नागरिक सर्वांगाला चंदनाची उटी लावून, अंगावर तलम वस्त्रे लेऊन, आम्रमंजिरी आणि वसंतातील इतर फुले माळत एकत्र जमत असत. उपवनात वनविहार, तलावात जलक्रीडा असे मनोरंजनात्मक कार्यक्रम केले जात. उन्हे उतरणीला आली की रम्य संध्याकाळी सौधावर सुगंधित जलाचे सडे घालून पांढर्‍या शुभ्र बैठकी मांडल्या जात. इथे बसून नाट्य, गायन, वादन, नृत्य यांचा आस्वाद घेतला जात असे. अशा वसंतोत्सवात सुंदर स्त्रीच्या डाव्या पायाच्या लत्ता प्रहाराने तांबड्या अशोकाचा वृक्ष बहरतो आणि तिच्या मुखातल्या मद्याच्या चुळीने बकुळीचे झाड अधिक फुलून येते, अशी मान्यता होती. परिणामी अशोक वृक्षाला लत्ताप्रहार करण्याचा खास सोहळा पार पाडला जात असे. ‘भारवी’, ‘वात्स्यायन’, ‘माघ’, ‘भवभूती’ इत्यादींच्या ग्रंथांतही वसंतोत्सवाचे उल्लेख आढळतात.
 
आजच्या आपल्या धकाधकीच्या जीवनशैलीत ऋतूंचे हे सोहळे अनुभवण्यासाठी वेळ मिळत नाही.सिमेंटच्या जंगलात बंद दाराआड वसंत कधी येऊन जातो, हे ही कळत नाही. अशा वेळी प्राचीन साहित्यातील वसंतोत्सवाची रसाळ वर्णनं वाचताना आपल्यापेक्षा आपले पूर्वज अधिक रसिक आणि अभिरुचीसंपन्नच होते, याची जाणीव होते. निसर्गाशी जवळीक साधत प्रत्येक ऋतूचे स्वागत जेव्हा अशा सोहळ्यांनी साजरे केले जाते, तेव्हा मनात चैतन्याचा, उत्साहाचा वसंत कायम बहरत राहतो, हेदेखील उमगते. वसंतपंचमीपासून निसर्गात वसंताचे आगमन होत असताना हृदयातही वसंत फुलवा, यानिमित्ताने शुभेच्छा!!!

विनय जोशी
९३७२८०७४२१
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.