कल्याण : ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला राज्यभरात सुरुवात झालेली आहे. कल्याण केंद्रात २७ नोव्हेंबर पासून आचार्य अत्रे रंगमंदिरात या स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झालेली आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी सुकांत जावडेकर व सुप्रिया जावडेकर यांनी सुस्वर अशी नांदी गात नटराज पूजनाचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी व्यासपीठावर आचार्य अत्रे रंगमंदिराचे माजी व्यवस्थापक व ज्येष्ठ रंगकर्मी गजानन कराळे, नाट्यपरिषद उपाध्यक्षा व ज्येष्ठ रंगकर्मी डोंबिवलीच्या भारती ताम्हणकर, अखिल भारतीय नाट्य परिषद कल्याण शाखेचे अध्यक्ष रवींद्र सावंत, कल्याण शाखेच्या बालरंगभूमी परिषद अध्यक्षा व अभिनेत्री सुजाता कांबळे, गायन क्षेत्रातील नामवंत कलाकार व सुरताल कराओके क्लबच्या संचालिका लीना घोसाळकर, दैनिक जनमतचे ज्येष्ठ पत्रकार व नाट्य समीक्षक बबलू दळवी, राज्य नाट्य स्पर्धेचे समन्वयक शिवाजी शिंदे, सांस्कृतिक कार्य संचालनाचे अधीक्षक संदीप वसावे तसेच यंदा नाट्य स्पर्धेचे परीक्षक म्हणून असलेले अमरावतीचे नाट्यदिग्दर्शक, नाटककार, नेपथ्यकार, नाट्य व्याख्याता सुरेश बारसे, राजा राजेशचंद्र, शोभना मयेकर, ज्येष्ठ रंगकर्मी श्रीमती मंगला जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
या उद्घाटन सोहळ्यात स्पर्धेचे समन्वयक शिवाजी शिंदे यांनी प्रेक्षक, नाट्य स्पर्धक व नाट्य संस्था यांना संबोधताना “कलाकार व संस्थांनी बक्षीस मिळणार नाही म्हणून नाट्यप्रयोग करायचे नाही हा विचार खोडून टाका कारण ही नाट्यस्पर्धा रंगकर्मींसाठी एक महोत्सव आहे, त्याकडे स्पर्धा म्हणून पाहू नका तर महोत्सव म्हणून पहा” असे मत व्यक्त केले.