मुंबई : स्वतःचे २० नगरसेवकदेखील निवडून येणार नाहीत हे माहिती झाल्यामुळे उबाठाचे काही लोक हात धुवून मनसेच्या मागे लागले आहेत, अशी टीका मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. शुक्रवार, ११ जुलै रोजी त्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला.
मंत्री उदय सामंत म्हणाले की, "ठाकरे बंधू एकत्र येतील की, नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. काही लोक उताविळ झाले आहेत. स्वतःचे २० नगरसेवकदेखील निवडून येणार नाहीत हे माहिती झाल्यामुळे उबाठाचे काही लोक हात धुवून मनसेच्या मागे लागले आहेत. ते मनसेच्या मेळाव्यात घुसले आणि विजयी मेळाव्यातसुद्धा मनसेच्या गर्दीमध्ये जाऊन भाषण केले. कदाचित स्वतःचे अस्तित्व समजल्यामुळे काही लोकांना आज मनसेची आवश्यकता लागते," अशी टीका त्यांनी केली.
"तीन वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत उठाव झाला. भाजपसोबत लढलेले असताना काही लोकांनी काँग्रेससोबत जाऊन विचारांशी गद्दारी केली. एकनाथ शिंदे साहेबांनी ती गद्दारी सुधारण्याचे काम केले आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले. या धक्क्यातून अजूनही काही लोक सावरले नाहीत. त्यांची जखम अजून भरलेली नाही, त्यांचा पोटशूळ अजून बंद झालेला नाही. त्यामुळे या सगळ्या आजारांवर एकनाथ शिंदे साहेबांनी आपला दवाखाना हे मोफत उपचारकेंद्र प्रत्येक प्रभागात काढले आहे. या सगळ्या लोकांनी तिथे तपासून घेण्याची आवश्यकता आहे," असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
उबाठाचे लोक बोलले की, आमच्या मतांमध्ये वाढ!
"रोज सकाळी उठून एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ करायची, त्यांची बदनामी करायची हे सगळे काही लोक टीआरपी वाढवण्यासाठी करत आहेत. पण ज्या माणसाने महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी मुख्यमंत्री असताना अहोरात्र मेहनत केली त्याच्याबद्दल आकसापोटी एखादी व्यक्ती रोज सकाळी टीका करत असेल तर त्यांना तुम्ही हे कधी थांबणार असे आपण विचारले पाहिजे. ते जोपर्यंत थांबत नाहीत तोपर्यंत आमची मते अजून वाढतात, हेदेखील निर्विवाद सत्य आहे. उबाठा गटाचे लोक बोलले की, आमच्या मतांमध्ये वाढ होते हे विधानसभेत जनतेने दाखवून त्यांची छोटी असलेली जखम मोठी करण्यासाठी आम्हाला आशीर्वाद दिले. एकनाथ शिंदे दिल्लीला गेले असतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा यांना भेटले असतील तर काही लोकांच्या पोटात का दुखत आहे?" असा सवालही मंत्री उदय सामंत यांनी केला आहे.