विकास, हिंदुत्वाला कौल

    23-Nov-2024   
Total Views |
 
 Hinduism
 
पालघर जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ असून त्यापैकी डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर हे चार विधानसभा क्षेत्र अनुसूचित जमातींसाठी राखीव, तर नालासोपारा आणि वसई हे खुल्या प्रवर्गातील मतदारसंघ आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि प्रचारादरम्यानही पालघर जिल्ह्यात विविध घटना घडल्या. त्यामुळे या पालघर जिल्ह्यातील या सहा जागांवर नेमके कोण जिंकून येणार, याबाबत चुरस आणि उत्सुकताही होती.
 
पालघर जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ असून त्यापैकी डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर हे चार विधानसभा क्षेत्र अनुसूचित जमातींसाठी राखीव, तर नालासोपारा आणि वसई हे खुल्या प्रवर्गातील मतदारसंघ आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि प्रचारादरम्यानही पालघर जिल्ह्यात विविध घटना घडल्या. त्यामुळे या पालघर जिल्ह्यातील या सहा जागांवर नेमके कोण जिंकून येणार, याबाबत चुरस आणि उत्सुकताही होती.
 
पालघर जिल्ह्यातीही आपण दोन भागात विभागणी करू शकतो. डहाणू, पालघर आणि विक्रमगड हा एक पट्टा, तर बोईसर, वसई आणि नालासोपारा हा दुसरा भाग.
 
डहाणू, पालघर, विक्रमगड या अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या विधानसभा क्षेत्रांचा मागोवा घेतला तर जाणवते की, अनेक दशकांपासून रा. स्व. संघाचे आणि संबंधित समविचारी संघटनांचे कार्य इथे सुरु आहे. तसेच स्व. चिंतामन वनगा तसेच स्व. विष्णू सवरा यांनीही त्यांच्या कारकिर्दीमध्ये या क्षेत्रात ‘राष्ट्रहित सर्वोपरी’चे विचार रूजवले होते. त्यामुळे कम्युनिस्ट पक्ष डहाणू सोडून इतरत्र तसा काही फोफावला नाही. केंद्रातील मोदी सरकारच्या योजना तसेच ‘लाडकी बहीण योजना’ यामुळेही जिल्ह्यातील मतदारसंघांत महायुतीचे वातावरण होते. तसेच पालघर जिल्ह्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना साधूंचे हत्याकांड घडले होते. त्यामुळेही इथले जनमत महाविकास आघाडीच्या विरोधात होते. नालासोपारा, वसई आणि बोईसर येथे पाणी, वीज आणि मूलभूत विकास करण्यात ठाकूरांची बहुजन विकास आघाडी हा पक्ष अयशस्वी ठरला आहे.
 
तसेच विकासाच्या मुद्द्याऐवजी बविआने सत्तेत असलेल्या पक्षासोबत जाण्याची धरसोड वृत्ती अवलंबली. त्यामुळेही त्यांचे हक्काचे मतदार नाराज झाले. बविआने 2019 साली महाविकास आघाडीला, तर 2022 साली महायुतीला समर्थन दिले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून बविआ महायुतीच्या विरोधात गेल्याचे चित्र होते. या सगळ्या काळात बविआची कोणतीही ठाम भूमिका जनतेला दिसली नाही.
 
तसेच काही महिन्यांपूर्वी हितेंद्र ठाकूर यांचे आतेभाऊ आणि बविआचे नेते उद्योजक राजेश ठाकूर हे सुद्धा हितेंद्र ठाकूर यांची साथ सोडून भाजपचे समर्थक झाले. त्यामुळेही बविआला खिंडार पडले.
 
तसेच या विधानसभा क्षेत्रामुळे अवघ्या महाराष्ट्राचे नव्हे, तर देशाचे वातावरण तापले. भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांच्यावर बविआच्या हितेंद्र ठाकूर यांनी मतदारांना पैसे वाटल्याचे आरोप केले. प्रत्यक्षात त्यांनी केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे निदर्शनास आले. मात्र, या सगळ्यामुळे वातावरण तापले आणि ते बविआच्या विरोधात गेले. दुसरीकडे महायुती सरकारच्या योजनांनी या मतदारसंघात जादू दाखवली. या भागात देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत बविआला आव्हान दिले. त्यामुळेही इथले जनमत महायुतीच्या समर्थनार्थ गेले. या सगळ्यामुळे 1990 सालापासून बविआचे जे ज्या या भागातील साम्राज्य होते, ते या निवडणुकीत उद्ध्वस्त झाले. या निवडणुकीमध्ये मनसेला तिसर्‍या, चौथ्या क्रमांकावर पसंती मिळाली आहे. तसेच डहाणू, पालघर आणि व्रिकमगड येथे ‘नोटा’लाही लक्षणीय मते मिळाली आहेत.
तपशिलवार सहा जागांचा आढावा घेऊ.
 
डहाणू
 
डहाणूमध्ये कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले दुसर्‍यांदा विजयी झाले आहेत. 2019 साली ही ते विजयी झाले होते. भाजपचे विनोद मेढा हे दुसर्‍या क्रमांकावर आहेत. या मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने यापूर्वीही अनेकदा विजय मिळवला आहे. देशभरातील आदिवासीबहुल परिसरात जल, जंगल, जमीन याची भीती दाखवून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने त्यांची पाळेमुळे रोवली आहेत. निकोले हेसुद्धा तो वारसा डहाणूमध्ये चालवत आहेत. त्यामुळे दुसर्‍यांदा ते जिंकले आहेत. विनोद निकोले पुन्हा जिंकले.
 
विक्रमगड
 
विक्रमगडमध्ये भाजपचे उमेदवार हरिश्चंद्र भोये हे विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनिल भुसारा यांचा पराभव केला. या मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवसेनेचे प्रकाश निकम यांनी बंड पुकारले होते. या निवडणुकीत ते तिसर्‍या क्रमांकावर आहेत.
 
पालघर
 
शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र गावित हे विजयी झाले असून त्यांनी उबाठा गटाचे उमेदवार जयेंद्र दुबला यांचा पराभव केला आहे. पालघरची निवडणूक गाजली ती श्रीनिवास वनगा यांच्यामुळेच. 2024 सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाने त्यांना उमेदवारी न देता राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली. यावर श्रीनिवास वनगा यांनी प्रचंड आक्षेप घेतला. या सगळ्याचा वापर करत महाविकास आघाडीने महायुतीला लक्ष केले. मात्र, काही काळानेच श्रीनिवास वनगा हे राजेंद्र गावित यांचा प्रचार करताना दिसले. राजेंद्र गावित हे यापूर्वीही काँग्रेस पक्षातून आमदार म्हणून विजयी झाले होेते.
 
बोईसर
 
बोईसर येथे शिवसेना शिंदे गटाचे विलास तरे हे भरघोस मते घेऊन जिंकले आहेत, तर उबाठा गटाचे विश्वास वाळवी हे तिसर्‍या क्रमांकावर आहेत. या मतदारसंघात शिवसेना आणि बहुजन विकास आघाडी यांच्यामध्ये चुरस पाहायला मिळाली. सध्याचे शिवसेना शिंदे गटाचे विजयी आमदार विलास तरे हे 2009 आणि 2014 या दोन्ही वर्षी बहुजन विकास आघाडीतर्फे विजयी झाले होते. यावेळी बविआच्या राजेश पाटील हे दुसर्‍या क्रमांकावर आहेत.
 
नालासोपारा
 
नालासोपारा येथे 2009, 2014 ते 2019 या काळात सातत्याने बविआचे क्षितीज ठाकूर जिंकून आले. परंतु या निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजन नाईक हे आघाडीवर आहेत, तर बविआचे क्षितीज ठाकूर हे दुसर्‍या क्रमांकावर आहेत. मनसेचे विनोद मोरे हे तिसर्‍या क्रमांकावर व काँग्रेसचे उमेदवार संदिप पांडे हे चौथ्या क्रमांकावर निवडून आले आहेत.
 
वसई
 
या विधानसभा क्षेत्रावर बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व होते. बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर हे या क्षेत्रातून तब्बल सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले. हितेंद्र ठाकूर यांना 1990 साली काँग्रेस पक्षातून पहिल्यांदा उमेदवारी मिळाली आणि ते जिंकले. पुढे 2004 सालापर्यंत ते सलग आमदार राहिले. मात्र, 2009 साली अपक्ष उमेदवार विवेक पंडित हे जिंकले. पुढे दहा वर्षे हितेंद्र ठाकूर आमदार झाले. मात्र, 2024 साली विवेक पंडित यांच्या कन्या स्नेहा पंडित आघाडीची मते मिळवत जिंकून आल्या आहेत. हितेंद्र ठाकूर यांना दुसर्‍या क्रमांकाचे स्थान प्राप्त झाले आहे, तर काँग्रेसचे विजय पाटील तिसर्‍या क्रमांकावर आहेत.
 
90च्या दशकापासून वसई, नालासोपारा, बोईसर या क्षेत्रात एकहाती सत्ताकेंद्र असलेल्या बहुजन विकास आघाडी आणि हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत दारूण पराभवाची ठरली. एकंदर 2024 सालच्या निवडणुकीचा निकाल पालघरसाठी विकास आणि हिंदुत्वाचा निर्णायक कौल देणाराच म्हणता येईल.
 
पक्ष जिंकलेल्या जागा
भाजप 03
शिवसेना (शिंदे) 02
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया 01
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.